Wednesday, May 13, 2026

निकाल

 निकाल



हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सापडेना झालाय. तर या स्पर्धेत, सॉरी परीक्षेत.. काही विद्यार्थ्यांना.. चक्क १००% गुण मिळाले आहेत. हे सगळं पाहून मला असा प्रश्न पडतो, की आजच्या पिढीतील ही मुलं एवढी बुद्धिमान कशी काय झाली आहेत.? की.. पेपर तपासणाऱ्यांनी जाऊ द्या हो म्हणत.. मार्क देताना खिरापत वाटल्या सारखी त्यांना मदत केली आहे.? कारण.. शंभर टक्के मार्क म्हणजे, पेपर लिहिताना एकही चूक नाही, असा त्याचा अर्थ होतो, आणि.. असं खरोखरच होऊ शकतं का.? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.


कारण.. आमच्या काळात मराठीच्या पेपरमध्ये काना, मात्रा चुकला तरी अर्धा मार्क गायब व्हायचा. वेलांटी विसरली, अनुस्वार राहिला, पूर्णविराम चुकला, की शिक्षक लाल पेनाने अशी काही फटकारणी मारायचे, की जणू काही आम्ही देशद्रोहच केला असावा, शिवाय मार्क कापणी वेगळीच.. मग आजच्याला पेपर तपासताना हे नियम असतील की नाही.?

गणितात उत्तर बरोबर आलं, तरी.. मधली पायरी चुकली म्हणून मार्क कापले जायचे. इंग्रजीमध्ये स्पेलिंग चुकलं, की संपलंच समजा. विज्ञानाच्या पेपरमध्ये आकृतीत जरा इकडे तिकडे झालं, की.. मार्क होत्याचे नव्हते होऊन जायचे.


आणि आता काय.. पोरांना ९८, ९९, १०० टक्के मिळत आहेत. एवढे गुण पाहिले की वाटतं, महाराष्ट्रात सगळीकडेच.. ज्ञानेश्वर, आइनस्टाईन आणि विश्वेश्वरय्या सारख्या अभियंत्यांचा वारसा घेऊन मुलं जन्माला आले आहेत की काय.? 


पूर्वी निकालाच्या दिवशी वातावरण वेगळंच असायचं. एखाद्याला ३५% पडले, तरी हौसेणे त्याच्या घरात पेढे वाटले जायचे. कारण त्याकाळी " पास " होणं हीच फार मोठी गोष्ट होती. गावात एखादा मुलगा फर्स्ट क्लासमध्ये पास झाला, की त्याचं नाव चहाच्या टपरीपासून किराणा दुकानापर्यंत चर्चेत असायचं. ७०% मिळवणारा म्हणजे अक्षरशः विद्वान समजला जायचा. त्याच्याकडे लोक आदराने पाहायचे. किमान महिनाभर तरी गावात त्याच्या नावाची चर्चा असायची.


आणि आता.. ९०% पडले, तरी पोरं आणि त्यांचे आईबाप दोघंही शोकसभेत बसल्यासारखे चेहरे करून बसतात. फक्त ९२ टक्के आले.. हे वाक्य आजकाल इतक्या दुःखी सुरात बोललं जातं, की ऐकणाऱ्याला वाटावं, की आता त्या मुलाचं करिअर संपलं की आयुष्य उध्वस्त झालं असेल.


पूर्वी वर्गात एखादाच मुलगा हुशार असायचा, बाकीचे त्याच्याकडून गृहपाठ उतरवायचे. आता प्रत्येक गल्लीमध्ये दहा टॉपर निघत आहेत. त्यामुळे " हुशार " या शब्दाची किंमतच उरलेली नाही. गुण एवढे वाढलेत, की गुणवत्ता कुठे हरवली तेच कळेनासं झालं आहे.


आणि गंमत म्हणजे, त्या काळात कमी मार्क पडूनही लोकं जगले, नोकऱ्या केल्या, संसार उभे केले, मुलांना शिकवलं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, त्या ३५ टक्केवाल्यांनीच आजचे ९९ टक्केवाले घडवले आहेत. 

तरी सुद्धा.. या घोडे बाजारात आजही मला ही टॉपर मुलं डावीच वाटतात. कारण यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे..


खरं सांगायचं झालं तर, शिक्षणाचं रूपांतर आता ज्ञानापेक्षा आकड्यांच्या स्पर्धेत झालं आहे. मुलांच्या डोक्यावर टक्केवारीचा एवढा ताण टाकला गेला आहे, की त्यांचं बालपण, खेळ, छंद, मस्ती... सगळंच कुठेतरी हरवत चाललं आहे.


पूर्वी निकाल लागला, की आम्हा मित्रांची टोळी विहिरीवर, मैदानावर, सिनेमागृहात किंवा भेळ मिसळीच्या हॉटेलमध्ये जाऊन आनंद साजरा करायची. आणि आता निकाल लागला, की मुलं आणि पालकांसमोर पहिला प्रश्न असतो.. पुढील शिक्षणासाठीचा कटऑफ किती आहे.?


जग बदललं, शिक्षण बदललं, स्पर्धा वाढली हे मान्य आहे. पण एक गोष्ट मात्र खरी.. मार्क वाढले म्हणून बुद्धी वाढतेच असं नाही, आणि मार्क कमी पडले म्हणून आयुष्य संपतं असं देखील मुळीच नाही.


कारण शेवटी… गणिताच्या वहीतले आकडे आणि आयुष्याचं गणित, या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या असतात.


सुदैवाने की दुर्दैवाने म्हणावं तेच समजेना झालंय..पण, या आकड्यांच्या स्पर्धेत धावणाऱ्या आणि त्यात यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.!!

  

Tuesday, March 17, 2026

तीर्था: माझ्या आयुष्यातील रंगांचे इंद्रधनुष्य

 तीर्था: माझ्या आयुष्यातील रंगांचे इंद्रधनुष्य





आयुष्य म्हणजे रंगांचा एक कोरा कॅनव्हास असतो, असं म्हणतात. पण जोपर्यंत तीर्था माझ्या आयुष्यात आली नव्हती, तोपर्यंत त्या कॅनव्हासवरचे रंग इतके जिवंत असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिच्या येण्याने जणू माझ्या आयुष्यात रंगांची उधळणच झाली आहे.

या प्रवासात फक्त आनंदाचेच रंग आहेत असं नाही, तर त्यात जीवनातील प्रत्येक छटा सामावलेली आहे. कधी तिच्या निरागस हास्याचा सोनेरी रंग मनात लख्ख उजेड पाडतो, तर कधी तिच्या रडण्याचा धूसर रंग मला आई म्हणून अधिक हळवं आणि संयमी बनवतो. तिचं ते रुसणं, चिडणं आणि मग पुन्हा प्रेमाने बिलगणं... या प्रत्येक छोट्या कृतीत एक वेगळाच ममतेचा रंग दडलेला असतो.

तिच्यासोबत फिरताना जग पुन्हा नव्याने पाहण्याचा कुतूहलाचा रंग मिळतो, तर तिचं एखादं नवं पाऊल किंवा नवीन शब्द ऐकताना मिळणारा कौतुकाचा रंग मनाला तृप्त करून जातो. कधी कधी तिच्या खोड्यांवर येणारा तो क्षणिक राग आणि त्यानंतर लगेच उमलणारं तिचं हसू, हे सगळं मिळून माझं आयुष्य आता पूर्ण झालं आहे.

आता मला बाहेरच्या कोणत्याही रंगाची गरज उरलेली नाही. कारण तीर्थाच्या रूपात मला हसण्याचे, रडण्याचे, समाधानाचे आणि मज्जेचे असे सगळेच रंग मिळाले आहेत. हे रंग केवळ डोळ्यांना दिसत नाहीत, तर ते मनाच्या खोलवर रुजले आहेत. तीर्था हे फक्त एक नाव नाही, तर माझ्या आयुष्यात आलेलं ते संपूर्ण इंद्रधनुष्य आहे, ज्याने माझं जग खऱ्या अर्थाने रंगीत केलं आहे.


एक छोटी चारोळी खास:

"रंग हसण्याचे, रंग रडण्याचे,

रंग ममतेच्या त्या अथांग सागराचे...

तीर्था, तू आल्याने गरजा उरल्या नाहीत कशाच्याच,

कारण तूच केंद्र आहेस माझ्या सर्व सुखाचे!"

✍🏻 – Vasudha’s World




Teertha: The Rainbow of Colors in My Life

They say life is like a blank canvas, waiting to be painted. But until Teertha entered my life, I never imagined that the colors on that canvas could ever feel so alive. Her arrival has been like a vibrant explosion of colors in my world.

This journey isn't just painted with the bright hues of joy; it encompasses every shade of existence. Sometimes, the golden glow of her innocent laughter lights up my entire soul. At other times, the muted grey of her tears makes me a softer, more patient mother. Her pouting, her little tantrums, and then that sudden, loving embrace—each tiny gesture holds a unique shade of motherly love.

Traveling with her brings back the color of curiosity, allowing me to see the world through fresh eyes. Every new step she takes or every new word she utters brings a color of pride that deeply satisfies my heart. Even the momentary red of anger sparked by her mischief quickly fades into the warmth of her blooming smile. All these fragments together have made my life complete.

I no longer feel the need for any outside colors. In Teertha, I have found every shade—of laughter, of tears, of contentment, and of pure fun. These colors aren't just visible to the eye; they are deeply rooted in my soul. Teertha is not just a name; she is the complete rainbow of my life, making my world truly colorful in every sense.

A Short Poem for Teertha:

"Colors of laughter, colors of tears,

Colors of a mother’s love that conquers all fears...

Teertha, your presence has left me wanting for nothing,

For you are the center of my joy, my everything!"

Thursday, March 12, 2026

तीर्थाची पहिली मोठी झेप: पोगोडा ट्रिप!

 तीर्थाची पहिली मोठी झेप: पोगोडा ट्रिप! 


​"मम्मा-डॅडी, आज मी १० महिन्यांची झाले! आणि माहितीये का? आजची आपली पॅगोडा ट्रिप ही फक्त एक सहल नव्हती, तर मी तुम्हाला दिलेली एक छोटीशी 'टेस्ट' होती... ज्यात आपण सगळेच Pass झालो आहोत!




​मला माहितीये, तुम्ही दोघं मनात कुठेतरी थोडे घाबरलेले होतात. 'तीर्थाला जमेल का?', 'ती रडेल का?', 'ती तिथे नीट राहील का?' असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात होते. पण आज मी ठरवलं होतं की, माझ्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होऊ द्यायचा नाही. कारण तुम्ही आनंदी असाल, तरच मी सुद्धा खऱ्या अर्थाने खुश राहू शकते!


​ विपश्यना पॅगोडाच्या त्या शांत वातावरणात जेव्हा मी तुमच्या सोबत हसत-खेळत होते, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मला खूप भारी वाटलं. मम्मा, तू तुझ्या आई-बाबांकडे मी झाल्यापासून राहू शकली नाहीस याचं मला थोडं वाईट वाटतंय, पण लवकरच मी तुला तुझ्या माहेरी आणि माझ्या आजोळी घेऊन जाईन! मग तिथे आपण दोघी मिळून खूप धमाल करू.


​आता तुमची भीती सोडा आणि पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग करा, कारण तुमची 'टीटु'आता मोठी झालीय आणि ती फिरण्यासाठी एकदम रेडी आहे!"


"नव्या वाटा, नवी स्वप्नं, तीर्थाची पॅगोडा ला भेट,

मम्मा-डॅडी  च्या काळजाला, भिडली तिची माया थेट.

पॅगोडाचा तो शांत परिसर, अन तीर्थाचे ते हासू,

सुखाचे हे क्षण जपताना, डोळ्यात दाटले हर्षाश्रू!"



✍🏻 – Vasudha’s World




Teertha’s First Big Leap: Our Pagoda Trip!

​"Mamma-Daddy, today I am 10 months old! And guess what? Our trip to the Pagoda today wasn't just an outing; it was a little 'test' I gave you... and we all passed with flying colors!

​I know, deep down, you both were a bit nervous. Questions like 'Will Teertha manage?', 'Will she cry?', or 'Will she be comfortable there?' were swirling in your minds. But today, I had decided that I wouldn't let you worry even for a moment. Because I can only be truly happy when I see both of you smiling!

​In the serene atmosphere of the Global Vipassana Pagoda, as I played and laughed with you, seeing the joy on your faces made me feel so wonderful. Mamma, I feel a little sad that you haven’t been able to stay at your parents' place since I was born, but don’t worry! Soon, I will take you to your 'Maher' (childhood home) and my 'Aajol' (grandparents' home). We will have so much fun together there!

​So, let go of your fears now and start planning our next trip, because your 'Titu' is growing up and she is absolutely ready to explore the world!"

A Special Poem for the Memory:

​"New paths, new dreams, Teertha’s visit to the Pagoda so bright,

Her love touched Mamma-Daddy’s heart with pure delight.

The peaceful Pagoda air and Teertha’s laughter so sweet,

Happy tears filled our eyes as our joy became complete!"


​✍🏻 – Vasudha’s World


Thursday, January 22, 2026

पहिला महिना : आई, बाबा आणि बाळ – तिघांचं जुळणं

 पहिला महिना : आई, बाबा आणि बाळ – तिघांचं जुळणं



बाळ जन्माला आलं

म्हणजे सगळं लगेच जमून जातं असं नाही.


आई, बाबा आणि बाळ—

तिघांनाही एकमेकांना समजून घ्यायला

वेळ लागतो.


पहिला महिना

हा फक्त दिवसांचा नसतो,

तर नातं जुळवण्याचा काळ असतो.






बाळाचं रडणं आणि आईचं शिकणं

पहिल्या महिन्यात बाळ:

• रडतं

• झोपतं

• पुन्हा रडतं


कधी भूक असते,

कधी झोप,

कधी फक्त कुशीत हवं असतं.


सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं—

हे रडणं कोणत्या गोष्टी साठी आहे?


पण हळूहळू

त्या रडण्यातले सूर बदलायला लागले

आणि माझं मन

ते ओळखायला शिकू लागलं.



दूध पाजतानाचं आई-बाळाचं नातं

पहिल्या महिन्यात

दूध पाजणं म्हणजे फक्त आहार नव्हता.


ते क्षण

आई आणि बाळाच्या नात्याची

पहिली भाषा बनले.


बाळाचं ते घट्ट धरून पिणं,

डोळ्यांत बघणं,

आणि दूध पिऊन शांत होणं—


त्या प्रत्येक क्षणात

माझं आईपण

हळूहळू रुजत गेलं.


रात्री जागं राहणारे बाबा

पहिला महिना

फक्त आईचा नव्हता,

तो बाबांचाही होता.



रात्री उशिरा पर्यंत जागं राहणं,

बाळ रडलं की लगेच उठणं,

दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढणं—

हे सगळं बाबाच करत होते.


सुरुवातीला

मी आणि बाळ झोपायचो,

आणि अर्ध्या रात्रीनंतर

बाळ आणि बाबा निवांत झोपायचे.


त्या शांत रात्रींमध्ये

बाबा आणि बाळाचं नातं

अलगद आकार घेत होतं.


झोपेची नवी व्याख्या

पहिल्या महिन्यात

“पूर्ण झोप” हा शब्दच नसतो.


कधी दोन तास,

कधी अर्धा तास—


बाळ झोपलं की

आई झोपते.


थकवा असतो,

पण बाळाच्या श्वासाचा आवाज

आणि बाबांचा आधार

मनाला शांत करतो.


आईची मानसिक अवस्था

पहिल्या महिन्यात

आई खूप काही अनुभवते—

• आनंद

• भीती

• रडू येणं

• स्वतःवर शंका


“मी चांगली आई आहे का?”

हा प्रश्न मनात येतोच.


पण हळूहळू

हेही उमगतं की

आई परिपूर्ण नसते,

ती शिकत असते.


जबाबदारी समान, नातं घट्ट

आई आणि बाबा—दोघांची जबाबदारी

एकसमान होती.


कोणी मोठं,

कोणी लहान नव्हतं.


आई थकली की

बाबा आधार बनत होते.


आईच्या डोळ्यात अश्रू असताना

तेच धीर देणारे हात होते.


जशी आई आणि बाळाची जुळवणी होत होती,

तसंच बाबा आणि बाळाचं नातंही

तितकंच घट्ट होत चाललं होतं.


छोट्या सवयी, मोठं कुटुंब

बाळाला उचलण्याची पद्धत,

थोपटण्याचा आवाज,

झोपवण्याची चाल—


या सगळ्या छोट्या सवयींमधून

तिघांचं नातं घट्ट होत गेलं.


पहिल्या महिन्यात

आईपण, बाबापण आणि बाळपण

या तिघांनी मिळून

एक छोटीशी दुनिया तयार केली. त्यालाच आम्ही "त्रिकूट" असे नाव दिले.


निष्कर्ष (Conclusion)

पहिला महिना

आई, बाबा आणि बाळासाठी

एकमेकांना ओळखण्याचा काळ असतो.

चुका होतात, अश्रू येतात,

पण त्याचबरोबर नातं घट्ट होत जातं.

आई आणि बाबा एकत्र उभे राहिले

म्हणूनच बाळासाठी

पहिलं घर सुरक्षित झालं.



✍️ – Vasudha’s World



Month One: Mom, Dad, and Baby – The Journey of Coming Together

A baby is born,

But everything doesn’t just fall into place instantly.

Mom, Dad, and Baby—

It takes time for all three

To understand one another.

The first month

Is not just a count of days,8

But a season of weaving a bond.


Baby’s Crying and Mom’s Learning

In the first month, the baby:

Cries

Sleeps

And cries again

Sometimes it’s hunger,

Sometimes sleep,

And sometimes, she just wants to be held close.

In the beginning, I understood nothing—

Why is she crying?

But slowly,

The rhythm of those cries began to change,

And my heart

Started learning to recognize them.

The Bond of Nursing

In the first month,


Nursing was never just about feeding.

Those moments

Became the first language

Between a mother and her child.

The way she held on tight,

Looking into my eyes,

And the way she grew calm after being fed—

In every such moment,

My motherhood

Slowly began to take root.

The Father Who Stayed Awake

The first month

Didn't belong only to the mother;

It belonged to the father too.

Staying up late into the night,

Waking up the moment the baby cried,

And burping her after every feed—

Dad was doing it all.

Initially,

The baby and I would sleep,

And after midnight,

The baby and Dad would drift into a peaceful slumber together.

In those quiet nights,

The bond between Father and Daughter

Was gently taking shape.

A New Definition of Sleep

In the first month,

The phrase "full night's sleep" simply doesn't exist.

Sometimes two hours,

Sometimes thirty minutes—

Whenever the baby sleeps,

Mom sleeps.

There is exhaustion,

But the sound of the baby’s breath

And Dad’s support

Bring peace to the soul.

A Mother’s Heart

In the first month, a mother experiences so much:

Joy

Fear

Random tears

Self-doubt

The question "Am I a good mother?"

Inevitably crosses the mind.

But gradually,

One realizes—

A mother isn’t born perfect;

She is a constant learner.

Shared Responsibility, Stronger Bond


Mom and Dad—the responsibility belonged to both

In equal measure.

No one was greater,

No one was lesser.

When Mom was exhausted,

Dad became the pillar of strength.

When there were tears in Mom’s eyes,

His were the hands that gave courage.

Just as the connection between Mom and Baby was forming,

The bond between Dad and Baby

Was becoming just as unbreakable.


Small Habits, One Big Family

The way of holding the baby,

The sound of a gentle pat,

The rhythm of rocking her to sleep—

Through all these tiny habits,

The bond between the three grew stronger.

In the first month,

Motherhood, Fatherhood, and Infancy

Came together to create a tiny world.

We named this world "The Trio" (Trikut).


Conclusion

The first month

Is a time for Mom, Dad, and Baby

To truly get to know one another.

There are mistakes, there are tears,

But along with them, the bond deepens.

Because Mom and Dad stood together,

The baby’s first home

Became a sanctuary of safety.



✍️ – Vasudha’s World



Wednesday, January 21, 2026

आईपणाची खरी सुरुवात

आईपणाची खरी सुरुवात





आज बाळाला डिस्चार्ज घेऊन घरी जाणार होते.

फक्त तीन दिवसांतच हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली.


घरी बाळाचं खूप छान स्वागत करण्यात आलं.

फुलं, ओवाळणी, आशीर्वाद…

सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं.


पण बाळाला कुशीत घेऊन घरी आले,

तेव्हा तिच्याकडे पाहून क्षणभर वाटलंच नाही की

हे माझंच बाळ आहे…

माझं हक्काचं पिल्लू.


पण तिच्या त्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहताच

सगळ्या वेदना, सगळा थकवा

क्षणात विसरायला होत होता.


चौथा दिवस : आई म्हणून थोडं सोपं होणं

चौथ्या दिवशी सकाळी

अहो( नरेंद्र) माझ्यासाठी feeding pillow घेऊन आले.


बाळाला दूध पाजताना मला जास्त त्रास होऊ नये,

बाळाला आरामात झोपून दूध पिता यावं,

टाके फार दुखू नयेत,

पाठीला आणि पोटाला नीट सपोर्ट मिळावा—

या सगळ्यासाठी तो उशीसारखा आधार

खूप उपयोगी ठरला.


बाळाला दोन-दोन तासांनी दूध पाजणं,

ढेकर काढणं, झोपवणं,

सु-शी साफ करणं,

कपडे बदलणं, दुपट्यात बांधून ठेवणं…


या सगळ्यांतच दिवस कधी उजाडायचा

आणि कधी मावळायचा

कळायचंच नाही.


पाचवा दिवस : आईचं मन हादरलेलं

पाचव्या दिवशी बाळाची पाचवी होती.


आणि त्या रात्री

हे इवलंसं बाळ इतकं रडत होतं की

मला काहीच कळत नव्हतं—

तिला काय होतंय?

मी काय करू?


संपूर्ण रात्र बाळ रडत होत.

आणि पहाटे कुठेतरी चारच्या सुमारास

थोडी शांत झोपली.


आपल्याकडे एक समज असतो—

बाळ रडतंय म्हणजे आईच काहीतरी चुकलंय.

आईने उलटसुलट खाल्लंय,

आई वेळेवर जेवली नाही,

आणि मी नीट चावून खाल्ले नाही,

बाळाला गॅस झालाय,

पोटात दुखतंय…

असं कितीतरी ऐकायला मिळतं.


त्या रात्री, थोड्या रागात आणि चिडचिडीतच

अहो म्हणाले,

“आपण बाळ प्लॅन केलंय ना, आपल बाळ आहे ना,

तर आपणच बाळाची काळजी घ्यायला हवी.”


त्या रात्री घेतलेला निर्णय

आणि त्याच क्षणी

मनाशी एक गोष्ट पक्की केली—


हे बाळ माझं आहे.

आई म्हणून सगळं मला करायचं आहे.

कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही.


आजही मला छोट्या-छोट्या गोष्टींवर

रडू येतं…तेव्हा ही येत होतं.


सहावा दिवस : हळूहळू रुळणं

सहाव्या दिवसापासून

बाळाची आणि माझी दोघांची

मालिश आणि अंघोळ घालण्यासाठी

मावशी यायला लागल्या.


त्या हॉस्पिटलमधल्याच होत्या—

बाळांची काळजी घेण्याचा अनुभव असलेल्या.


त्यांच्यामुळे मला थोडा धीर मिळाला,

आणि आईपणात आत्मविश्वासही.


बारावा दिवस : नाव मिळालं ओळखीला

बाराव्या दिवशी बाळाचं बारस करण्यात आलं.

माझ्या पिल्लूचं नाव ठेवलं—

तीर्था वसुधा नरेंद्र इंगळे.




खरंतर मला नाव वेगळं काहीतरी ठेवायचं होतं.

प्रेग्नेंसीमध्ये रोज सकाळी कुणीतरी बासरी वाजवायचं, तो आवाज कानी पडायचा आणि प्रसन्न वाटायचं. पोटात स्पंदन निर्माण व्हायची. तेव्हा बाळ पोटात मस्त हालचाल करायचं.

रात्री गच्चीवर चांदण्या पाहताना

ध्रुवतारा दिसायचा, विमान दिसायची,

तेव्हा अचानक पोटात स्पंदन व्हायची.


“हिच अमुची प्रार्थना”

हे गाणं लागलं की

बाळ हलायचं.


या सगळ्या आठवणींवरून

नाव ठरवायचं होतं.


पण बारसात

मी माझ्या आवडीचा उखाणा घेतला—

"दिवस नवा आहे अनुभवही नवा,      

माझ्या लेकीसाठी तुमचा आशीर्वाद हवा,      

      

माझ्या लेकीमध्ये सामावली दुनिया सारी,       

डॅडी ची ती आहे परिराणी,      

     

पाचवी च्या दिवशी आजी ने घेतले तिला वाटी, चमचा आणि वाळे,      

आज पासून आमची लेक तीच नाव सांगणार      

मी तीर्था वसुधा नरेंद्र इंगळे,      

      

तिला राजकुमारी म्हणू की परी, सावित्री म्हणू की रमाई,     नरेंद्र रावांच नाव घेते मी तीर्था ची आई."

     

एक महिना… आणि आईपणातलं नवं वळण

असेच दिवस भरभर जात होते.

माझं पिल्लू दररोज थोडंसं मोठं होत होतं.


आणि बघता बघता

एक महिना पूर्ण झाला.


आईपणाचा तो पहिला महिना—

थकवणारा,

रडवणारा,

पण तरीही

मनभरून समाधान देणारा


✍️ – Vasudha’s World

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...