Showing posts with label नवीन आई. Show all posts
Showing posts with label नवीन आई. Show all posts

Saturday, October 4, 2025

आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली


आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली

मागच्या काही दिवसांतली एक धक्कादायक बातमी आपण सगळ्यांनीच ऐकली—एका आईने आपल्या १५ दिवसांच्या बाळाला रडत होतं म्हणून थेट फ्रिजमध्ये ठेवलं. देवाची कृपा म्हणून बाळ वाचलं. सुरुवातीला हे ऐकलं तेव्हा मन सुन्न झालं, पण नंतर जेव्हा समजलं की ती स्त्री *पोस्टपार्टम सायकॉसिस* या मानसिक आजाराशी झुंज देत होती, तेव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहिले.



आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा, कारण हा लेख माझ्या मैत्रिणीच्या आग्रहाने लिहितेय. अनुभव तिचा आहे, शब्दरचना माझी.


बाळ जन्मल्यानंतरचा काळ आईसाठी कसोटीचा असतो. बाळासाठी प्रेम, काळजी, माया या सगळ्यांची उधळण होते, पण बाळाच्या आईकडे लक्ष देण्याचं आपल्या समाजाला जणू विस्मरणच झालेलं असतं. गर्भावस्थेत जितकी आईची काळजी घेतली जाते, तितकीच प्रसूतीनंतर तिला बाजूला सारलं जातं.


आईचं शरीर शारीरिकदृष्ट्या नाजूक असतंच, पण तिचं मन अधिक अस्थिर असतं. हार्मोन्स, थकवा, झोपेची कमतरता आणि सततची जबाबदारी—या सगळ्यामुळे ती तुटत चाललेली असते. पण तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच दोष दिला जातो.


“आम्ही नाही का लेकरं केली? तुम्हालाच लेकरं झाली का?”

“बाळ आजारी आहे म्हणजे आईकडून काहीतरी चुकलं असेल.”

“बाळ बारिक दिसतंय, म्हणजे आईनं नीट काळजी घेतली नाही.”

“तू जाड झालीस, चेहऱ्यावर बदल दिसतोय.”


अशा टोमण्यांनी तिचं मन आणखी खचवलं जातं. तिची चिडचिड झाली तरी तिच्यावरच ओरडल जात. तिच्या मानसिक आरोग्याची काळजी मात्र कुणीच घेत नाही—कधी माहेरचेही तिला समजून घेत नाहीत. तिला सगळ्यात जास्त अपेक्षा माहेरून असते; कारण ते आपले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे असतात.


पण हेच खरं आहे की, अशा अवस्थेतही आई तग धरून राहते—फक्त आपल्या बाळासाठी. बाळ तिच्यासाठी पूर्ण विश्व बनतं. ती झगडते, रडते, खचते, पण शेवटी उभी राहते. आणि जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी ती कणखर होत जाते—इतकी कणखर की नंतर तिला कुठल्याही टीकेचा फरक पडत नाही.


पण एक गोष्ट ती कायम लक्षात ठेवते—त्या कठीण काळात कुणी तिची साथ दिली आणि कुणी जखम केली. हाच अनुभव तिच्या पुढच्या आयुष्याचा पाया ठरतो.


*तुम्ही आईला कशी मदत करू शकता?*


* आईला दोष देण्याऐवजी तिचं ऐका आणि समजून घ्या.

* तिच्या थकव्याला, निराशेला कमी लेखू नका. तिला बोलू द्या.

* बाळाची जबाबदारी वाटून घ्या—झोपवणं, पाजणं, डायपर बदलणं.

* तिच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबद्दल काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

* कुठलीही समस्या जास्त गंभीर वाटली तर तिला तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा.

* “तू आई झालीस म्हणजे आता सगळं तुझ्यावर” अशी अपेक्षा ठेवू नका. तिच्यासाठीही ती *नवीन भूमिका* आहे.


आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नव्हे; तर त्या काळातल्या तिच्या मानसिक प्रवासाला समजून घेणं आणि तिला जपणं हे समाजाचंही कर्तव्य आहे. कारण, बाळाला सांभाळणारी आई जर मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसेल, तर बाळाचं आयुष्यही खऱ्या अर्थानं सुरक्षित राहू शकत नाही.


✨ **प्रेरणादायी शेवट**

आई म्हणजे फक्त जीव देणारी नाही, तर जीवाला उभारी देणारी ताकद आहे. तिच्या मनाला थोडं समजून घेतलं, तिच्यावर थोडं प्रेम ओतलं, तर ती स्वतःलाही आणि बाळालाही नव्या जगाला सामोरं जाण्याची खरी शक्ती देते. 🌸



*“बाळाचं रडणं सगळ्यांना ऐकू येतं, पण आईच्या मनाचं रडणं क्वचित कुणाला जाणवतं.”*


✍🏻वसुधा इंगळे.

Friday, July 18, 2025

तीर्थाचा पहिला प्रवास

 **तीर्थाचा पहिला प्रवास**


तीर्थाला जेव्हा पहिल्यांदा फिरण्यासाठी घराबाहेर घेऊन जायचं ठरवलं, तेव्हा “कुठे नेऊ?” हा प्रश्न आमच्या दोघांच्या मनात आला. पावसाळा सुरूच होता. फार लांब जायलाही नको, कारण ती अजून खूप लहान आहे. तिला त्रास होऊ नये, उलट तिला प्रसन्न वाटेल असं शांत, हवेशीर आणि सकारात्मक वातावरण असावं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं.

पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. एक दिवस गेला, दुसरा गेला… शेवटी आम्ही ठरवलं – तीर्थाला बुद्धविहारात घेऊन जाऊ.


हे ठिकाण निवडण्यामागे एक खास कारण होतं – तीर्था वैशाख महिन्यात झाली होती आणि जेव्हा ती हॉस्पिटलमधून आली, तो दिवस होता बुद्धपौर्णिमेचा!


आम्ही बुद्धविहारात गेलो. तीर्थाला भंतेजींचा आशीर्वाद मिळाला. विशेष म्हणजे ती एकदाही रडली नाही – ती आमच्या बरोबर पूर्ण वेळ शांत होती, हसत होती. हे तिचं आमच्यासोबतचं पहिलं सहप्रवासिकपण आमच्यासाठी फारच खास होतं.


भंतेजी म्हणाले, “आज विहारात एक बाल उपासिका आली आहे. ती आपल्या आई- वडिलां प्रमाणेच तेजस्वी आणि हुशार आहे.”


आणि अशा प्रकारे तीर्था चा मम्मा आणि डॅडा सोबतचा पहिला गोड प्रवास खास आठवण बनून गेला.


✍🏻वसुधा इंगळे.








Wednesday, July 2, 2025

नवीन आई

 प्रिय नवीन आई


तुम्हाला ही वाटत का मुल जन्माला घालणं सोप्प नसतं!!! मला तर वाटतं!!

पुर्ण नऊ महिने गरोदर असताना जेवढा त्रास होत नाही तेवढ नंतर होतो...पण आई होताना तो त्रास विसरून जातो.

- प्रसुतीच्या वेळी येणाऱ्या कळा म्हणजे मरणाच्या दारात उभं असल्यासारखं.. तरी ती आई धीर धरते.

- प्रसुती नंतर टाके म्हणजे बसता उठता त्रास.. पण व्यक्त कस होणार, तो त्रास सहन करावाच लागतो. कारण बाळाकडे पाहुन त्या आईची सहन करण्याची क्षमता वाढलेली असते.

- नंतर आईची झोप, बाळाला पिण्यासाठी झोपेतुन जागे करणे, आपल्या बाळाला काय होत किंवा त्याच पोट भरत असेल का हे टेन्शन.

या असंख्य गोष्टींचा भार, आईची चिडचिड आणि टेन्शन वाढवतं.

ती आई बाळा कड़े पाहून सगळ विसरून जाते!! आणि उपाय शोधत असते !!


✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...