Showing posts with label लोकल. Show all posts
Showing posts with label लोकल. Show all posts

Wednesday, March 29, 2023

लोकल ट्रेनचा प्रवास

 लोकल ट्रेनचा प्रवास



कालचीच गोष्ट आहे. पनवेल वरून ठाणे ट्रेन पकडायची होती, ट्रेन निघायचा टाईम झाल्यामुळे मी महिलांच्या डब्या पर्यंत जाण्याचे कष्ट नाही घेतले. जनरल डब्यामध्ये घेतलं चडून. दुपारची वेळ असल्याकारणाने ट्रेन बऱ्यापैकी प्रवाशांनी भरलेली नव्हती. मी खिडकीजवळ बसलेली. समोर उजवीकडे पंचवीशीच्या आसपास आयुचं एक प्रेमी युगल बसलेलं. प्रेमात आकंठ बुडालेलं.. ते त्यांच्याच दुनियेत होते. त्यांचे एकमेकांबरोबरचे लाडिक चाळे,तिचं लाजून हसणं; त्याचं तिला चिडवणं हे सगळे प्रकार अगदी व्यवस्थित नियमाप्रमाणे चाललेले. त्यांतच माझ्या धर्मपती चा फोन आला त्यांना सारांश मध्ये काय प्रकार चालू आहे ते सांगितले. "बघा किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर.तो कसं कौतुक आणि लाड करतोय बघा तिचे..! नाहीतर तूम्ही.. तुमंच तर काही प्रेमच नाही माझ्यावर.." अस म्हणत मी फोन ठेवनारच होती. तेवढ्यात पतीदेव म्हणाले झोप आता, त्याच त्यांना करू दे काही पन, मी म्हटलं लग्नाआधी तरी तूम्ही असे कोणते  रोमिओ किंवा मजनू होता. एक नंबरचे लाजरे होते. तो बघा जगाची पर्वा न करता तिचे कसे लाड करतोय. तिचं कौतुक करतोय. तर मला म्हणाले अग तुझ्यावर असं सार्वजनिक ठिकाणी प्रेम करत बसायला लागू नये म्हणून तर तुला लग्न करून घरी आणलं..आणि राहिली त्या  दोघांची गोष्ट तर त्या मुलाकडे मी लिहून देतो की त्याने फस्ट क्लास लोकल ट्रेनचं काय..? सेकंड क्लासच देखील तिकीट काढलेलं नसणार."


लोकल ट्रेनमध्ये टीसी सर्रास येऱ्याझाऱ्या घालताना दिसतात. तीन चार स्टेशन सोडल्यानंतर शेवटी टीसी उभा राहिला. टीसी आणि पोलीस पेशातले चेहरे मोहरे ओळखण्यात पारंगत असतात म्हणे..! तर मग तेथे असणाऱ्या टीसी ने त्याला अवगत असलेल्या विद्येच्या जोरावर काही मोजक्या जणांकडेच तिकीट दाखवण्यासाठी विचारले आणि ज्यात त्या जोडप्याचा देखील लकी ड्रॉ लागला. प्रथम त्या मुलाने स्वतःची बॅग चाचपडत पाहिली..मग स्वतःचे पाकीट चाचपडले. नंतर मग त्याने टीसीला सांगितलं की माझ्या मोबाईल मध्ये तिकीट आहे म्हणे ..इथे रेंज मिळत नसल्यामुळे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. त्या टीसीने त्या युवतीला देखील विचारले पण तिच्या चेहऱ्यावरचे अविर्भाव हे दीपिका पदुकोणच्या 'मै हू ही नही इस दुनिया की ..' गाण्याप्रमाणे निर्विकार होते.


त्या युवकाचा चाललेला टाईमपास हा आजूबाजूचे सगळे प्रवासी आता चार-पाच स्टेशन तरी आता मजा बघण्यात जाईल ह्या आशाने पाहू लागले. त्या मुलाचा अभिनय मात्र एखाद्या नवख्या अभिनेत्याप्रमाणे स्पष्ट दिसून येत होता.तोपर्यंत टीसी थोडं पुढे जाऊन इतर जणांचे तिकीट तपासू लागला. दोन एक मिनिटातच पुढील स्टेशन आले. आणि तो युवक प्रकाश वेगाने उठून पळून गेला. अक्षरश: शक्तिमान सारखा. आता त्या भोळ्या  प्रेयसीच्या बाजूला फक्त खेळती हवा होती. काही वेळापूर्वी त्याने तिच्याशी घेतलेल्या आणाभाका त्याच हवेत विरल्या होत्या. तिच्या भावनांशी खेळणारा तो पसार झाला होता. मला हसू आवरेना. 


तर तिच्या प्रियकराने प्रकाश वेगाने पळ काढून पोबारा केला होता.आजूबाजूला असणारे आम्ही सर्वजण तो प्रकार पाहून थक्क झालो होतो. सगळ्यांच्या नजरा त्या मुलीकडे वळल्या.आजूबाजूला असणाऱ्या प्रवाशांना अचानक त्या मुलीसाठी वाईट वाटू लागले.(जास्त करून पुरुषांना..)गळाला लागलेला मासा असा अनपेक्षित सुटल्यामुळे टीसी देखील चक्रावून गेला होता.पुढच्या स्टेशनला ती मुलगी देखील पळायच्या अगोदर त्याने तिच्याकडे मोर्चा वळवला.  त्या टीसीने त्या मुलीवर प्रश्नांची सरबत्ती केली. "कुठून चढलेलात मॅडम? फाईन भरावा लागेल आता आणि तुम्हाला जर त्याची तक्रार करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता.." त्या मुलीने  कोरड्या पडलेल्या कंठातून लघुस्वरात ती कुठून चढलेली वगैरे तत्सम गोष्टी टीसीला सांगितल्या.


टीसीने त्या मुलाची आणि तिची दोघांच्याही दंडाची रक्कम एकत्र करून त्या मुलीस सांगितली. जी होती सातशे रुपये. ती रक्कम ऐकताच मुलीचे डोळे पाणावले आणि ती हमसून हमसून रडू लागली. खरंतर मला तिच्या त्या प्रियकरापेक्षा त्या टीसीचाच जास्त राग येत होता. वास्तविकता जर मी टीसी असते तर तिच्यासारख्या देखण्या आणि गोंडस मुलीकडून एक रुपयाही घेतला नसता. फक्त तिला एकच मोलाचा सल्ला दिला असता की यापुढे अशा पळकुट्या,पादऱ्या फुसक्या मुलांना बॉयफ्रेंड बनवू नकोस.  


तर मग दंडाची ती रक्कम ऐकून एखाद्या कोणत्याही सामान्य स्त्रीप्रमाणे तिने काढलेल्या अश्रूंचे शस्त्र पाहून टीसी देखील नरमला आणि म्हणाला. " मॅडम तीनशे पन्नास रुपये द्या..! निदान तुमचा दंड तरी मला वसूल करावाच लागेल. असं म्हणत तो त्याच्या हातात असलेल्या पावतीवर दंडाच्या रकमेचे आकडे गिरवू लागला.आश्चर्य असं की त्या मुलीकडे तेवढे पैसे देखील नव्हते. तिने टीसीला मी Gpay केलं तर चालेल का विचारले. टीसी निक्षून नाही म्हणाला. मॅडम केवळ कॅश द्यावी लागेल.बघा इथे कोणाला विचारून. ती आजूबाजूला पाहू लागली. बाजूला बसलेल्या दोन पुरुषांना आणि एका स्त्रीला तिने मी Gpay करते, तुम्ही मला कॅश द्याल का अशी विनंती देखील केली;पण त्यांनी नाही म्हणून माना खिडकीच्या दिशेने वळवल्या.


इतक्यात ती माझ्यासमोर आली. तिने मला देखील विनंती केली. मी ठीक आहे म्हणाले, ती नम्र स्वरात तुमचा नंबर द्या. मी आता लगेच तुम्हाला Gpay करते म्हणाली. एक आज्ञाधारक सुजाण नागरिकाप्रमाणे मी तिला मदत करण्यास तयार झाले. 


इतक्यात पुढील स्टेशन ठाणे ..अगला स्टेशन ठाणे ..नेक्स्ट स्टेशन ठाणे अशी अनाउन्समेंट होऊ लागली आणि मी त्या युद्धातून तथा ट्रेन मधून काढता पाय घेतला.


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...