Showing posts with label आयुष्य. Show all posts
Showing posts with label आयुष्य. Show all posts

Wednesday, November 5, 2025

आयुष्य

 आयुष्य 


आयुष्य कोणाचंच सोप्पं नसत... फरक फक्त एवढाच असतो, कोणी आवाज करून रडतं, कोणी शांत हसत हसत सगळं सहन करतं. काहींना तुटण्याची संधी मिळते, तर काहींना तुटायला पण वेळ नसतो.. जगायचं, निभवायचं, उभं राहायचं... हाच कार्य तो आयुष्याचा नियम... 


बाहेरून सगळं छान दिसतं, पण आतून प्रत्येकजण लढतोच.. काहींशी जग लढतं, आणि काही स्वतःशीच. काही आपल्या माणसांशी..


म्हणून कोणाचं आयुष्य सोपं असतं, असं कधीच समजू नका.. फक्त त्यांची वेदना ते उघड करत नाहीत इतकंच.. ती ते घेऊन जगतात, आणि त्या वेदनेलाच स्वतःची ताकद बनवतात..


व. पू काळे च एक सुंदर वाक्य आहे....

अत्यंत महागडी, न परवडणारी 

खऱ्या अर्थाने

ज्याची हानी भरून येत नाही,

अशी गोष्ट किती उरली आहे

याचा हिशोब नसताना आपण जी 

वारेमाप उधळतो ती म्हणजे

‘आयुष्य’🫰🏻

Tuesday, March 25, 2025

थोड मनातलं

 थोडं मनातलं

आयुष्याने आपल्याला खूप काही शिकवलंय, शिकवतय आणि शिकवत राहील, आपण त्याचे all time student आहोत आणि असायला हवंच!


पण शिकताना परीक्षा नुसती attempt नाही करायची तर पास व्हायचं, जमलं तर direct 1st rank काढायचा आणि हे ही नाही जमलं आणि fail झालो तर fine पुन्हा आहेच ना आयुष्य शिकवायला, कारण तुमच्या चुकांतून सुद्धा तुम्ही काही तरी शिकत असता आणि शिकलच पाहिजे, आयुष्य तुम्हाला ते शिकवत राहील !! जोवर तुम्ही ही exam crack करत नाही तोवर !! चलो, let's crack it!!

Sunday, July 30, 2023

थोडसं रिलेशनशिपबद्दल.

 "थोडसं रिलेशनशिपबद्दल.."



सध्याच्या तरुणाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो मानसिक त्रासाचा सुध्दा विषय होत चालला आहे. "एखाद्या मुलाच्या आयुष्यात असलेली ती किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात असलेला तो" याही पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे आपण विसरूनच जात आहोत.


प्रेम हे जरी चेहरा पाहून होत असलं तरीही ते टिकतं मात्र चांगल्या स्वभावामुळे व एकमेकांचा एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळे. सुरुवातीला एकमेकांचे स्वभावगुण माहित नसल्यामुळे नात आनंदात राहत; परंतू काही दिवसांनी जेव्हा एकमेकांचे गुण, सवयी अशा एक एक गोष्टी माहित व्हायला लागतात, तेंव्हा नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात होते. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आपण त्या व्यक्तीवर जरा जास्तच अधिकार गाजवायला लागतो. तिने आपण जसं म्हणतो अगदी तसचं वागायला पाहिजे. असं आपल्याला वाटतं. आणि इथूनच खर नातं बिघडायला सुरुवात होते. अशा स्वभावामुळे नात्यांमधील जीवंतपणा कमी होतो; कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र असते. आपल्यावर अधिकार गाजवणे हे कोणालाच आवडत नसते.


यांपुढे जर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढपण अडकून पडू नका, की ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला आपलं जगणच नकोसं वाटेल. त्यांपेक्षा एकाच व्यक्तीवर एवढं प्रेम करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करायला शिकूया. आपल्याला आजपासून प्रेमाची व्याप्ती वाढवायला शिकायचं आहे. तसेच आयुष्य हा एक प्रवास आहे ज्या व्यक्तीचं स्टेशन आलं तो व्यक्ती उतरणारच आहे भलेही तो व्यक्ती कितीही आवडत असला तरीही.म्हणूनच जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर एवढं पण वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वतंत्र आयुष्य आहे. हे मान्य करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया.



✍️वसुधा इंगळे

Monday, July 10, 2023

आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.

 आयुष्याचा प्रत्येक क्षण जागून घ्या.



पाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत. त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत असतात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून वेगळे किंवा विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपन पृथ्वी ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.
माझा आसपास चा समाज पाहते, तेव्हा स्वत: हाला शोधात नाही. त्यांना काय अपेक्षित आहे, हे ओळखताना मला 'मी' काय हवंय याचा शोध घेत नाही, त्याची कल्पना पण करत नाही, एकाग्र होत नाही. काळावर स्वार होऊन जगण्याचा विचार करत नाही. विचार विश्व पातळीवर जात नाही. मनाचं परीघं आकाशगंगा काही सेकंदात पार करू शकतं. पण त्याला कल्पनेच्या मर्यादेत सामवून ठेवतं. बुद्धी आणि मनाची सांगड घालणं सोडून फ़क़्त बुद्धीचे ऐकूण दोघांत युद्ध लावून स्वत:ची फरपट करून घेतो. मनाचे श्लोक विसरून बुद्धीचे व्यवहार्य चातूर्याचे गोडवे गातो. मन मारतो, पिळवटतो, आणि बुद्धीवर स्वार होऊन जग जिंकायला निघतो. पण समजत नाही, बुद्धी ही मनाची रसद आहे. तिला कोमेजून शरीरात कुठलाच भाग स्थिर राहत नाही. बुद्धी काम करेनाशी होते. मग उंच उडणारा घोडा अगदी खोल जातो, ढासळतो, मनोरे पडतात. पर्यायी व्यक्तीमत्व, व्यक्ती खंगत जाते. अकार्यक्षम होते, निस्तेज होते.
मला या जगात माझ्या मनाच्या पातळीवर मुक्त विहार करायला पाठवलं आहे. मुक्त जगायला, बागडायला. बंधणाच जाळ करून त्यात अडकायला नाही. तर ते सोडवून, त्याची वीण जाणून मुक्त जगायला . .! 

तात्पर्य :- कधी कधी आपण आपल्याच्या जवळच्या व्यक्ती बद्दल काही विशिष्ट समज करून घेतो. (चांगले किंवा वाईट)
आणि आपल्याला वाटत आपण त्यांना खूप चांगलं ओळखतो हे गृहीत धरतो. आणि नेमक्या वेळी हीच जवळची माणस कच खातात. आणि आपला पुरता हिरमोड होतो. त्याचप्रेमाने मुक्त जगण्यासाठी देखील ह्याच जवळच्या व्यक्ती चा कुठे तरी मनाच्या खोल कप्यात विचार चालू असतो. की आज आपण फिरायला जाऊया अस आपण गृहीत धरतो, पण समोरची व्यक्ती अरसिक आहे हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण असा विचार करतो की ती येईल.
म्हणून च ही जी वीण आहे आपलेपानाची, समाजाची ती थोडी सैल करून आपण स्वतःच आनंद शोधला पाहिजे.

✍️वसुधा इंगळे.

Tuesday, June 13, 2023

रांगोळी

 रांगोळी




रांगोळी ही पुसली जाणार आहे, हे माहित असून देखील आपण ती मन लावून, जीव ओतून, तासभर अतिशय सुबक, सुंदर आणि रेखीव काढण्याचा प्रयत्न करतो... 

तसंच आपलं आयुष्य हे, कधीतरी संपणार आहे...

ते अधिक सुंदर बनवून जगण्याचा प्रयत्न करुयात !


✍️वसुधा इंगळे

Tuesday, May 2, 2023

सोबत

सोबत..



आपल्या आयुष्यात खुप चांगली माणसं असतात,त्यापैकी कित्येक माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात.पण त्यांच प्रेम आपल्याला समजायला खुप वेळ जातो आणि समजलं तरी आपण ते गृहीत धरतो.

यामध्ये प्रामुख्याने आपल्या घरातील माणसं,जवळचे मित्र असतात. आपले आई वडील, आज्जी आजोबा आणि घरातील इतरं सगळे. म्हणजे आपली माणसं जी आपल्यावर प्रेम करतात. ती शब्दात सांगत नाहीत त्यांच आपल्या वर किती प्रेम आहे ते आपल्यासाठी काय करतात पण ते प्रेम,काळजी त्यांच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्यासोबतच्या अनुभवातून समजत जातं आणि हे तेव्हा जास्त प्रकर्षानं समजतं आणि जाणवतं जेव्हा ती माणसं आपल्याजवळ नसतात. त्यावेळी त्यांची खरी उणीव भासत असते. त्यांच्या आठवणी दाटून येतात आणि वाटतं आपण त्या माणसांसाठी खूप काही करायला हवं होतं. पण ते राहुन गेल्याची खंत कायम मनात सल बनून राहते.

जी माणस आयुष्यात असण्यानं जितका फरक पडतो, त्यापेक्षा त्या माणसांच्या नसण्यानं फरक पडतो.

मग आता जी माणसं आपल्याजवळ आहेत, ज्याचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे.

त्यांच्याशिवायच आयुष्याची आपण कल्पना नाही करु शकत. अशा माणसांसाठी आपण काय करू शकतो??

मला वाटतं आपण या माणसांना प्रेम देऊ शकतो. त्यांच्या प्रेमाचा आदर करु शकतो. त्यांच्यासाठी खूप काही करू शकतो जे त्यांना आनंद देऊन जाईल.

ती माणसं आपल्याजवळ नसताना त्यांच्या आठवणीत खंत व्यक्त करण्यापेक्षा, ते आपल्याजवळ आहेत तोवर त्यांना निस्सीम प्रेम,आनंद आणि आदर दिला तर आपल्यातील प्रेम शब्दात व्यक्त करावं लागणार नाही, आणि खंतही राहणार नाही.


आयुष्य खूप सुंदर आहे तितकंच ते खूप छोटं आहे. ते जगताना आपण इतकं व्यस्त होतो की खरं जगणंच विसरून जातो. ज्या माणसांसाठी सगळं काही करतो.त्यांच्यासोबतचे सुंदर क्षण मिळवायचं मात्र विसरतो.


त्यामुळे जेव्हा ते आपल्यासोबत आहेत, तेव्हा त्यांच्यासोबतच जगणं भरभरून जगायला हवं


✍️ वसुधा इंगळे.

Monday, March 20, 2023

आत्मसन्मान

 आत्मसन्मान.. 


देवळाच्या बाहेर चपला काढताना अचानक एक थरथरता हात पुढे आला आणि आवाज ऐकू आला," द्या मॅडम ठेवते मी".फोन मधले लक्ष काढून मी खाली बघितले तर एक ऐशी वर्षांची बाई मला चपला द्यायला सांगत होती.

विलक्षण संकोचाने मी तिला म्हणाले," नको आजी चपला ना हात नका लावू मी तिथे पायरीवर काढेन". कसनुसे हसून ती म्हणाली," हात नाही लावला तर हाता- तोंडाची गाठ कशी पडेल? पायरीवर चपला ठेवल्या तर पैसे नाही पडणार पण चोरीला जायची भीती ना ,म्हणून म्हणते पाच नको पण दोन रुपये तरी द्या."

तिच्या स्वरातली अजिजी मला ओशाळवाणे करून गेली.न बोलता मी चपला तिच्या कडे दिल्या.दर्शन घेतानाही माझे मन का कुणास ठावूक तिचीच चाहूल घेत होते.स्वतः वरच वैतागून मी बाहेर आले .आजी कडून चपला घेऊन तिला पाच रुपये दिल्यावर तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले.घशातला आवंढा लपवत मी तिथून निघाले.घरी आल्यावर आजीच्या खोली तून "आलीस का ग " असा आवाज ऐकल्यावर माझ्या मनाची अवस्था माझ्या लक्षात आली.तिच्या पेक्षा किती तरी लहान माझी आजी ,आम्ही तिला घरातील काहीही काम करून देत नाही.काही कमी पडू देत नाही.आणि ती आजी ह्या वयात दिवसभर उन्हातान्हात बसून चपला सांभाळत बसली आहे.तिची आठवण आल्यावर न कळत माझ्या डोळ्यात पाणी आले.तेवढ्यात आजी बाहेर येऊन म्हणाली,"अरे बाप रे अवचित आषाढ का बरे आज?"

काय ग आजी म्हणत मी तिच्या कुशीत शिरले.पहिला भर ओसरल्यावर मी तिला सगळे सांगितले.शांतपणे आजी मला थोपटत राहिली ,मी शांत होण्याची वाट पाहत राहिली.आणि मग मला म्हणाली,थांबू नकोस आता रोज जात जा देवळात तिच्याशी बोल.आपण, बाकी काही नाही जमले तरी बोलून तिचे दुःख हलके करूया." "का पण ?मी देते ना तिला काहीतरी मदत म्हणून ,तुझ्या साड्या काही पैसे ,किंवा धान्य". 

आजीने शांतपणे पण निग्रहाने मला दूर लोटले ,आणि म्हणाली," मदतच हवी असती तर तिने भीक मागितली असती .म्हाताऱ्या बाईला कोणीही मदत केली असती.ती तिच्या मानात राहत आहे मग तुला का तिला मदत करून तिच्या अभिमानाला धक्का लावायचा आहे ? तुला एक सांगू मनु  ,जो माणूस मानी असतो ना तो भुकेने,गरिबीने किंवा आजाराने नाही मरत,तर मानहानी ने मरतो." 


मला पटले की नाही कळले नाही पण आजीने सांगितले म्हणून मी शांत बसले.पण डोक्यातला किडा काही शांत बसत नव्हता..दुसऱ्या दिवशी मी परत गेले ,तिच्याकडे चपला काढल्या आणि देवदर्शन करून परत येऊन चपला घालण्याच्या उद्देशाने तिच्या बाजूला बसले

."काय आजी,काय चालले आहे ? किती वाजता घरी जाता?" तिने माझ्या कडे वळून सांगितले ,आठ वाजता निघते सकाळी आठ वाजता येते.पण मग घरचे करायचे असते ना म्हणून लवकर जाते ."बारा तास ...तुम्ही इथे बसून असता? आणि जेवण ?? "."आणते ना डबा घरून .हा बघ." 

तो एवढासा डबा बघून माझ्या पोटात तुटले.पण काहीच ना बोलता मी निघाले.आजीचे शब्द कानात घुमत होते.त्यामुळे आणखी चौकस ना होता मी तिला टाटा करून निघाले.आता देवापेक्षा जास्त मला तिच्यात रस वाटत होता. 


,त्यामुळे रोज संध्याकाळी न चुकता माझी पावले देवळा कडे वळत असत.हळूहळू तिची माझी मैत्री झाली आणि ती माझ्याशी मनमोकळे बोलू लागली.दसऱ्याच्या दिवशी तिला सोन्याचे पान दिल्यावर अचानक धबधबा कोसळवा तशी ती बोलू लागली.

नाही माझ्याशी नाहीच ..

ती बोलत असताना कुणीच आजूबाजूला नव्हते ,ती फक्त स्वतःशी बोलत होती ,कदाचित पहिल्यांदाच... म्हणूनच जितके उस्फुर्त तितकेच मनस्वी...,. 


लहानपणापासून मी हुशार कलाकार होते त्याकाळी महिन्यातून एकदा आमचे वडील मला  हॉटेल मध्ये न्यायचे .जेव्हा लोकांना माहितही नव्हते बाहेर खाणे.त्यामुळे बाहेरच्या जगाशी माझा खूप लवकर संबंध आला.शाळेत नाचाचे ,गाण्याचे क्लास केले प्रावीण्य मिळवले.अकरावी झाल्यावर नोकरीला लागले.बाहेर खूप प्रगती होत होती पण घरात मला स्वयंपाक करण्यात किंवा घरातील काम करण्यात स्वारस्य नव्हते.त्यामुळे माझी आई माझ्या वर नाराज असायची.तिने ओळखीच्या कोणाकडून तरी माझ्या नवऱ्याच्या स्थळ आणले.(त्यावेळी माझी निवड आकाशवाणी वर श्रुतिका म्हणण्यासाठी झाली होती) इतकी चांगली संधी आली असताना आईच्या वागण्याचा मला प्रचंड राग आला होता . नानांना हि मनातून  माझे लग्न करणे अजीबात पसंत नव्हते .पण आईच्या दबावाला त्यांना विरोध करता आला नाही.

नवऱ्याचे घर बघायला गेलो होतो तेव्हा तो टूमदार बंगला मला खूप आवडला होता.चला ...लग्न जरी मना विरुद्ध असले तरी घर चांगले आहे .हळूहळू रमेन असे मनाला समजावत मी बोहल्यावर उभी राहिले. 

लग्ना नंतर जेव्हा घरी आलो तेव्हा बंगल्यात न जाता त्या मागच्या आउट हाऊस मध्ये आल्यावर मला धक्का बसला.

  पण नवरा म्हणाला ,ते माझ्या मावशीचे घर आहे तिने आम्हाला कोकणातून इकडे आणले शिक्षण दिले नोकरी मिळाली.हे सगळे तिच्या मुळे झाले.पण मग मला हे आधी का नाही सांगितले असे विचारल्यावर हे म्हणाले मावशी म्हणाली," तू साधा ,तुझी नोकरी साधी, निदान घर बघून तरी मुलगी हो म्हणेल.आणि लग्नानंतर रमेल हळूहळू संसारात."

ही फसवणूक माझ्या फार जिव्हारी लागली .मला सासू सासरे नव्हते .पण बहिणी प्रमाणे  माया करणाऱ्या दोन नणंदा होत्या.आणि एक दिर. दिर माझा वकील झाला होता.यांच्यापेक्षा लहान होता पण हुशार .पेशाला जागेल असा.

लहान पणी दोघांना त्यांचे बाबा म्हणजे माझे सासरे दोन दोन आंबे द्यायचे .धाकटा लगेच आपल्यातला आंबा वडिलांना द्यायचा.आणि मग दोघे खोलीतून बाहेर पडले की ह्यांना म्हणायचा मी बाबांना आंबा दिला पण माझ्याकडे एकच राहिला.हे उदार होऊन त्याला एक आंबा द्यायचे

म्हणजे मोठ्यांसमोर नाव त्याचे झाले  वर त्याला दोन आंबे हि मिळाले आणि फसले कोण तर हे.... 


ह्या एका दाखल्यावरून मला कळले होते की माझ्या सारख्या हुशार ,कलाकार  मुलीला अतिसामान्य मुलगा मिळाला आहे ,जो आपण कसे फसवले गेलो हे नवनवीन मूर्ख पणा करून जगाला ओरडुन सांगत असे.

पहिल्या मुलाच्या वेळी मी घरी गेले तेव्हा नानांना सांगितले की मी परत जाणार नाही.नाना नेहमीप्रमाणे. माझ्या मागे उभे राहिले .....आणि आईच्या रागाला घाबरून मला सासरी सोडून आले.

खूप अपमानित होऊन मी परत आले होते.पण मग मनाशी काही ठरवून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला .

आईला तिच्याच भाषेत सांगितले की जर मुलांना सांभाळले नाहीस मला नोकरी करायला दिली नाहीस तर मी परत येईन आणि मग लोकांना उत्तर देण्याची तुझी जबाबदारी.आईने नाईलाजाने माझे ऐकले .

दुसऱ्या मुलाच्या वेळी मला आइस्क्रीम खावेसे वाटत होते .डोहाळे कडक असल्यामुळे मला माहेरी जाता येत नव्हते.म्हणून नवऱ्याला सांगितले ,त्याने आइस्क्रीम दिले ..आणि त्याचा पहिला घास घेण्याआधी सांगितले,"उद्यापासून रोज चार दिवस स्टेशन पासून घरी चालत यायचे ..हे आपल्याला परवडणारे नाही.त्यामुळे काटकसर करावी लागेल....".हातातले आइस्क्रीम खाली कधी पडले मला कळलेच नाही वर त्यावरूनही मला बोल लावले की पैसे गेले आणि खाल्लेही नाहीस.

त्यावेळी पहिल्यांदा मला कळले की बाहेर स्वतः ला  फसवून घेणारा माझा नवरा माझ्या बाबतीत वेगळा आहे आणि ते मला पटत नव्हते.नानांशी बोलल्यावर मला लक्षात आले की इथे राहण्याशिवाय मला प्रयाय नाही . साठ वर्षांपूर्वी मुलीने परत येणे लग्नानंतर ,हे कुणाला पटण्यासारखे नव्हते. मग माझा सूड मी घेतला माझ्या नवऱ्याला मी स्पष्टपणे मला स्पर्शही करायचा नाही असे सांगितले.त्याच्या तल्या पुरुषाने माझे ऐकले पण नवऱ्याने कायम माझ्याशी उभा दावा केला.

आयुष्यभर त्याने मला मानसिक रित्या छळले.मीही ते सहन करत राहिले.वडील गेल्यावर मात्र मी कोलमडले..कारण प्रत्यक्ष नाही तरी ते माझा  मानसिक आधारस्तंभ होते.

अशा वेळी माझा मोठा मुलगा माझा आधार झाला.माझी हुशारी आणि आकांक्षा त्याने जशीच्या तशी उचलली होती. खूप लहान वयात त्याने खूप मोठी प्रगती केली होती .आणि असाच वर वर जात होता.

त्याच्या आयुष्यात अतिशय सुंदर मुलगी आली .खूप श्रीमंत सुंदर आणि साधी आम्हाला सगळ्यांनाच ती खूप आवडली.पण तिच्या घरी हे पसंत नव्हते .म्हणून मग दोघांनी पळून जावून लग्न केले.

ती ज्या दिवशी माझा उंबरठा ओलांडून आत आली.त्यादिवसा पासून मी तिची आई झाले .

पण तिला मुलगी  झाल्यावर ,तिच्या हातून इतक्या साध्यासाध्या चुका होत होत्या की आम्हाला कळतच नव्हते असे का होत आहे  .पण मग तिच्याशी अन् डॉक्टरांशी बोलल्यावर आमच्या असे लक्षात आले की तिचा जो साधेपणा आम्हाला वाटला होता तो तिच्या मनाचा हळवेपणा होता.जरुरी पेक्षा जास्त हळवी होती ती .आई झाल्यापासून आपण आपल्या आईला किती त्रास दिला ह्या विचाराने तिला अतिशय अपराधी वाटत होते.कणाकणाने ती मरत होती.तिला सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही पण ती आतून तशीच तुटलेली राहिली

.मुलाने परदेशात जाऊनही नाव काढले. 

धाकटा मात्र ह्यांच्यावर गेला होता ,कसलीही अपेक्षा नाही इच्छा नाही, आहे त्यात सुखी.त्यामुळे मोठ्याने investment करताना जागा घेताना त्याच्या आणि माझ्या नावाने घेतल्या .बायकोला त्यात रस नव्हता आणि वडील व भावात काही दम नव्हता.

नात मोठी झाली लग्न झाले लंडन ला मोठ्याने त्यांना घर घेऊन दिले सगळी मदत करत होताच . 


....वीस वर्षापूर्वी माझा नवरा गेला .जितका शांतपणे तो जगला तितक्याच शांतपणे हे जग सोडून गेला.आणि नसलेल्या नात्यातून मी जगाच्या दृष्टीतून मोकळी झाले. 


अचानक पुढच्या दोन तीन वर्षातच माझ्या मोठ्या मुलाला असाध्य रोग झालेला आम्हाला कळले ,मोठी मोठी स्वप्न बघणाऱ्या माझ्या बाळाला आजारही मोठाच झाला.अनेक घर ,अनेक investments ,दागिने असे भरपूर करून ठेवलेल्या माझ्या मोठ्याला औषधोपचार काहीच अशक्य नव्हते .जसजसे दिवस जात होते तसतसे  बचत,ठेवी  आणि दागिने मोडायला लागणार आहेत हे माझ्या लक्षात आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली.तरीही नेहमी प्रमाणे खंबीर राहून मी मला जसे जमत होते तसे पैसे उभे करत होते.पण त्या महा भयानक रोगाने माझ्या बाळालाच नाही तर त्याच्या पैशाला, आयुष्यभराच्या कमाईला पण पोखरून टाकले.सून फक्त नावाला होती ,तिला नवऱ्याची हीअवस्था बघवत नव्हती .अशातच एक दिवस तिच्याच खांद्यावर त्याने मान टाकली.

..मी खूप नॉर्मल आहे असे दाखवत होते सुनेला नातीला इतरांना सावरत होते .सगळे माझ्या धीराचे कौतुक करत होते आणि मी मात्र आतल्या आत आक्रोश करत होते रडत होते.माझे भोग इथे संपले नाहीत .मुलाने घेऊन ठेवलेल्या घरांचे जेव्हा कागदपत्र मी काढले तेव्हा जावयाने त्यांच्या वकीला कडे नेले.आणि लक्षात आले की त्याने कुठेही वारस ठेवला नव्हता ,सगळी कडे आमच्या दोघांच्या नावाने घर होती.त्यामुळे कायद्याप्रमाणे माझ्या नावाच्या भागीत माझ्या लहान मुलाचाही पन्नास टक्के हक्क होता .मोठ्या आशेने मी त्याच्या कडे बघितले पण आयते आलेले भाग्य तो असे लाथाडणार नव्हता.आपला हिस्सा दे. नाहीतर मी कोर्टात जाईन असे म्हंटल्यावर एक घर विकून त्याचे आलेले सगळे पैसे  घेऊन तो निघून गेला.

नातीने अन् जावयाने संबंध तोडले .मीच वडिलांचे कान भरून असे केले असे म्हणत परत कधीही मागे न बघता कधीही परत न येण्यासाठी ते दोघेही निघून गेले.

जागा विकल्या जात नव्हत्या ज्या गेल्या त्या चाईपाईने गेल्या त्यात झालेली वकिलाची कर्ज फिटली. 


माझी सून आता खरंच माझी मुलगी झाली होती पण नव्याने जन्माला आलेली....तिला काहीही कळत नाही .दिले तर खाते ,झोपवले तर झोपते .मध्येच कधीतरी हसते कधीतरी हुंदके देऊन रडते.काय चालू असते तिच्या मनात त्या गजाननाला माहित. 


मला जाणवले की माझ्या नवऱ्याला त्याच्या हक्काच्या सुखापासून मी लांब ठेवले त्याचे शिव्याशाप मला लागले असतील अन् मलाही त्यामुळे  सगळ्या सुखापासून लांब राहावे लागले असेल..खूप निराशा आली होती काय करावे कळत नव्हते अन् एक दिवस सुनेला जाग आली .मला म्हणाली ,"खूप भूक लागली आहे खायला दे ना".

रिकामे डबे शोधताना माझा अडगळीत पडलेला स्वाभिमान मला मिळाला अन् ठरवले परिस्थितीला शरण सामान्य लोक जातात.तू सामान्य नाहीस .उभी रहा जितके दिवस आहेत तितके दिवस मानाने जग.ह्या देवळाचा पुजारी माझ्या शेजारी राहत होता .त्याने माझी धडपड बघितली म्हणाला ,"म्हातारे ,देवळात बस अन् चपला सांभाळ बिन भांडवलाचा धंदा आहे चार पैसे मिळतील." 

भोग आहेत ते भोगायला लागणार मग ते रडत भोगण्यापेक्षा मानाने भोगुया असे ठरवले आणि जे काही थोडे पैसे मिळतात त्यात आम्ही माय लेकी जगतो आहोत.

अजूनही निघताना देवाला हेच मागणे मागते ,माझ्या माघारी माझ्या लेकीला बघणारे कोणी नाही तेव्हा तिला माझ्या आधी.......,.सुटलेला बांध कसाबसा आवरून धरत आजी वर्तमानात परत आल्या. 


डोळ्याला आलेला महापूर न आवरता मी त्यांच्या जवळ गेले आणि" मी काही मदत करू शकते का"? असे विचारले .आजीचे शब्द आठवून मला कमालीचे ओशाळवाणे वाटले.एका क्षणात आजींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले पण लगेच शांत होऊन त्या म्हणाल्या ," एक मदत कर,तुमच्या त्या सोशल की फोशाल वर माझा फोटो टाक आणि सांग त्यांना चपला सांभाळत आणखी काही बसल्या जागी काम मिळाले तर करायला तयार आहे ही आजी.एखादे हलके काम करेन ग .जास्त काही नाही जमणार."आणि आजीनी सांगितल्या प्रमाणे मी माझे काम इमाने इतबारे केले. 


आजींना रोजच्या पन्नास वाती वळायचे काम मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या  मध्ये  आनंद  झिरपायला लागला. 


घरी आल्यावर आजीच्या कुशीत शिरताना एक आत्मिक समाधान मला मिळाले होते .मनावरचे ते दडपण नाहीसे झाले होते  हा ऐशी वर्षाचा वाडा बुरुजे ढासळली तरी पायात मजबूत होता आणि म्हणूनच अभेद्य होता..त्या ऐशी वर्षाच्या जिद्दीला मानाने जगण्यासाठी  माझा हातभार लागला होता आणि म्हणून मी आज खूप खूश होते ....

आजी ही ,"आषाढ संपून श्रावण सुरू झाला वाटते " म्हणत मनमोकळे हसली होती.


✍️श्रद्धा राजेश

Thursday, February 9, 2023

आपुलकीच्या माणसासाठी

 "आपुलकीच्या माणसासाठी"

*रोज तुम्ही स्वतःमध्ये 1 टक्के जरी सुधारणा केली, तरी वर्षभरात तुमच्यामध्ये 365 टक्के सुधारणा झालेली असेल.*_


एअरपोर्टच्या जवळ लिहीलेले एक सुंदर वाक्य आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर  आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारायला लागणारे मित्र जमिनीवरच राहतात.


_*ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते! आयुष्यात व्यवहार तर खुप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही...!*_


आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडाला ही पाण्याचा एका थेंबासाठी खाली यावे लागते. परंतु खाली येणे त्यांची हार नसते तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते.


_*यशस्वी तर भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो..*_


जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते असे काही नाही. मधुर वाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते.


_*तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते, ती म्हणजे हा आपल्यापुढे निघून जाईल. नातं कोणतही असू द्या... फक्त इमानदार असलं पाहीजे.*_


जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते! साठवली जाते ती दौलत आणि जपलं जाते ती माणसं!


_*माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो... परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना...? परंतू मला वाटतं... माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं... जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..*_


प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही...!

 

Wednesday, February 8, 2023

प्रेम

 प्रेम



प्रेमाचे दिवस साजरे करून काही होत नाही , आपला जोडीदार शेवटच्या श्वासापर्यंत सोबत जपता यावा बस इतकचं .🥰❤️ सोबत वाटचाल करत आयुष्याची सांजवेळ यावी.नाते जुळले मनाशी मनाचे ,उगाच नाही जन्मलो आम्ही .फेरे आमचे गत जनमाचे, बळ मिळाले तेव्हा आम्हा संकटाशी झुंजण्याचे ,वचन दिले एकमेका जीवनभर साथ देण्याचे....कुठल प्रॉमिस,कुठला डे,कधी जाणंवलच नाही काय असत मिस यू,लव्ह यू,शेवटचा श्वासअसेपर्यंत तू माझा मी तुझी होऊ काठी आधाराची.जगू असे की मरणाला ही आव्हान देवूनी पुन्हा परतण्याची आस घेवूनी......झाली आता सांजवेळ तुझ्या माझ्या संसाराची,घेवून हात हाती चल जावू पैलथडी.......

Saturday, February 4, 2023

आता मला जमायला लागलंय

 आता मला जमायला लागलंय!


आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 

जे जे मला दुखवत गेले, त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं,

आता मला जमायला लागलयं!


संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी, वाद न घालता तेथून दूर 

निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय!


माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून, त्यात शक्ती खर्ची घालून,

आजूबाजूला जे जे उत्तम आहे, त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय

हे ही जाणवायला लागलयं!


आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत

स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आता जमायला लागलंय!


कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर

काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही!

कधी-कधी काहीही न बोलणं

किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं

खूप काही बोलून जातं,

आणि सांगूनही जातं! 

हे ही कळायला लागलंय!


आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधनं आणू शकत नाही,

पण स्वतः च्या मनावर मात्र

बांध घालू शकतो.

आपण अशा लोकांचे वागणे

किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या

आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं कां?

हे ठरवणं गरजेचं असतं

हे ही कळायला लागलयं!


कधी कधी परिस्थितीला

आहे तसच सोडून देणं,

आणि शांत राहणं सोईच ठरतं!

लोकांना कुठल्याही गोष्टीचं

स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळटपणाचं आहे हे कळल्यावर मी आता मला,

त्या दृष्टीने घडवायला लागलोय!


मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षाने शोध घेत होतो ती मन:शांती, समाधान मला मिळालं तेव्हा ठरवलं की,मी अशा लोकांपासून

लांब राहावे. ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला 

त्यांच्या साच्यात बसवणं शक्य नाही त्यांच्यापासून अंतर ठेवणं

आता मला जमायला लागलयं!


सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात.

तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणाऱ्या, वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलयं!


माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं, आणि उशीरा कां होईना पण मी आता त्या वाटेवर

समाधानानं पावलं टाकायला लागलोय! 

त्या वाटेवर स्थिर राहणं,

आता मला जमायला लागलंय!🌹🌿🌾

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...