आत्मसन्मान..
देवळाच्या बाहेर चपला काढताना अचानक एक थरथरता हात पुढे आला आणि आवाज ऐकू आला," द्या मॅडम ठेवते मी".फोन मधले लक्ष काढून मी खाली बघितले तर एक ऐशी वर्षांची बाई मला चपला द्यायला सांगत होती.
विलक्षण संकोचाने मी तिला म्हणाले," नको आजी चपला ना हात नका लावू मी तिथे पायरीवर काढेन". कसनुसे हसून ती म्हणाली," हात नाही लावला तर हाता- तोंडाची गाठ कशी पडेल? पायरीवर चपला ठेवल्या तर पैसे नाही पडणार पण चोरीला जायची भीती ना ,म्हणून म्हणते पाच नको पण दोन रुपये तरी द्या."
तिच्या स्वरातली अजिजी मला ओशाळवाणे करून गेली.न बोलता मी चपला तिच्या कडे दिल्या.दर्शन घेतानाही माझे मन का कुणास ठावूक तिचीच चाहूल घेत होते.स्वतः वरच वैतागून मी बाहेर आले .आजी कडून चपला घेऊन तिला पाच रुपये दिल्यावर तिच्या डोळ्यात पटकन पाणी आले.घशातला आवंढा लपवत मी तिथून निघाले.घरी आल्यावर आजीच्या खोली तून "आलीस का ग " असा आवाज ऐकल्यावर माझ्या मनाची अवस्था माझ्या लक्षात आली.तिच्या पेक्षा किती तरी लहान माझी आजी ,आम्ही तिला घरातील काहीही काम करून देत नाही.काही कमी पडू देत नाही.आणि ती आजी ह्या वयात दिवसभर उन्हातान्हात बसून चपला सांभाळत बसली आहे.तिची आठवण आल्यावर न कळत माझ्या डोळ्यात पाणी आले.तेवढ्यात आजी बाहेर येऊन म्हणाली,"अरे बाप रे अवचित आषाढ का बरे आज?"
काय ग आजी म्हणत मी तिच्या कुशीत शिरले.पहिला भर ओसरल्यावर मी तिला सगळे सांगितले.शांतपणे आजी मला थोपटत राहिली ,मी शांत होण्याची वाट पाहत राहिली.आणि मग मला म्हणाली,थांबू नकोस आता रोज जात जा देवळात तिच्याशी बोल.आपण, बाकी काही नाही जमले तरी बोलून तिचे दुःख हलके करूया." "का पण ?मी देते ना तिला काहीतरी मदत म्हणून ,तुझ्या साड्या काही पैसे ,किंवा धान्य".
आजीने शांतपणे पण निग्रहाने मला दूर लोटले ,आणि म्हणाली," मदतच हवी असती तर तिने भीक मागितली असती .म्हाताऱ्या बाईला कोणीही मदत केली असती.ती तिच्या मानात राहत आहे मग तुला का तिला मदत करून तिच्या अभिमानाला धक्का लावायचा आहे ? तुला एक सांगू मनु ,जो माणूस मानी असतो ना तो भुकेने,गरिबीने किंवा आजाराने नाही मरत,तर मानहानी ने मरतो."
मला पटले की नाही कळले नाही पण आजीने सांगितले म्हणून मी शांत बसले.पण डोक्यातला किडा काही शांत बसत नव्हता..दुसऱ्या दिवशी मी परत गेले ,तिच्याकडे चपला काढल्या आणि देवदर्शन करून परत येऊन चपला घालण्याच्या उद्देशाने तिच्या बाजूला बसले
."काय आजी,काय चालले आहे ? किती वाजता घरी जाता?" तिने माझ्या कडे वळून सांगितले ,आठ वाजता निघते सकाळी आठ वाजता येते.पण मग घरचे करायचे असते ना म्हणून लवकर जाते ."बारा तास ...तुम्ही इथे बसून असता? आणि जेवण ?? "."आणते ना डबा घरून .हा बघ."
तो एवढासा डबा बघून माझ्या पोटात तुटले.पण काहीच ना बोलता मी निघाले.आजीचे शब्द कानात घुमत होते.त्यामुळे आणखी चौकस ना होता मी तिला टाटा करून निघाले.आता देवापेक्षा जास्त मला तिच्यात रस वाटत होता.
,त्यामुळे रोज संध्याकाळी न चुकता माझी पावले देवळा कडे वळत असत.हळूहळू तिची माझी मैत्री झाली आणि ती माझ्याशी मनमोकळे बोलू लागली.दसऱ्याच्या दिवशी तिला सोन्याचे पान दिल्यावर अचानक धबधबा कोसळवा तशी ती बोलू लागली.
नाही माझ्याशी नाहीच ..
ती बोलत असताना कुणीच आजूबाजूला नव्हते ,ती फक्त स्वतःशी बोलत होती ,कदाचित पहिल्यांदाच... म्हणूनच जितके उस्फुर्त तितकेच मनस्वी...,.
लहानपणापासून मी हुशार कलाकार होते त्याकाळी महिन्यातून एकदा आमचे वडील मला हॉटेल मध्ये न्यायचे .जेव्हा लोकांना माहितही नव्हते बाहेर खाणे.त्यामुळे बाहेरच्या जगाशी माझा खूप लवकर संबंध आला.शाळेत नाचाचे ,गाण्याचे क्लास केले प्रावीण्य मिळवले.अकरावी झाल्यावर नोकरीला लागले.बाहेर खूप प्रगती होत होती पण घरात मला स्वयंपाक करण्यात किंवा घरातील काम करण्यात स्वारस्य नव्हते.त्यामुळे माझी आई माझ्या वर नाराज असायची.तिने ओळखीच्या कोणाकडून तरी माझ्या नवऱ्याच्या स्थळ आणले.(त्यावेळी माझी निवड आकाशवाणी वर श्रुतिका म्हणण्यासाठी झाली होती) इतकी चांगली संधी आली असताना आईच्या वागण्याचा मला प्रचंड राग आला होता . नानांना हि मनातून माझे लग्न करणे अजीबात पसंत नव्हते .पण आईच्या दबावाला त्यांना विरोध करता आला नाही.
नवऱ्याचे घर बघायला गेलो होतो तेव्हा तो टूमदार बंगला मला खूप आवडला होता.चला ...लग्न जरी मना विरुद्ध असले तरी घर चांगले आहे .हळूहळू रमेन असे मनाला समजावत मी बोहल्यावर उभी राहिले.
लग्ना नंतर जेव्हा घरी आलो तेव्हा बंगल्यात न जाता त्या मागच्या आउट हाऊस मध्ये आल्यावर मला धक्का बसला.
पण नवरा म्हणाला ,ते माझ्या मावशीचे घर आहे तिने आम्हाला कोकणातून इकडे आणले शिक्षण दिले नोकरी मिळाली.हे सगळे तिच्या मुळे झाले.पण मग मला हे आधी का नाही सांगितले असे विचारल्यावर हे म्हणाले मावशी म्हणाली," तू साधा ,तुझी नोकरी साधी, निदान घर बघून तरी मुलगी हो म्हणेल.आणि लग्नानंतर रमेल हळूहळू संसारात."
ही फसवणूक माझ्या फार जिव्हारी लागली .मला सासू सासरे नव्हते .पण बहिणी प्रमाणे माया करणाऱ्या दोन नणंदा होत्या.आणि एक दिर. दिर माझा वकील झाला होता.यांच्यापेक्षा लहान होता पण हुशार .पेशाला जागेल असा.
लहान पणी दोघांना त्यांचे बाबा म्हणजे माझे सासरे दोन दोन आंबे द्यायचे .धाकटा लगेच आपल्यातला आंबा वडिलांना द्यायचा.आणि मग दोघे खोलीतून बाहेर पडले की ह्यांना म्हणायचा मी बाबांना आंबा दिला पण माझ्याकडे एकच राहिला.हे उदार होऊन त्याला एक आंबा द्यायचे
म्हणजे मोठ्यांसमोर नाव त्याचे झाले वर त्याला दोन आंबे हि मिळाले आणि फसले कोण तर हे....
ह्या एका दाखल्यावरून मला कळले होते की माझ्या सारख्या हुशार ,कलाकार मुलीला अतिसामान्य मुलगा मिळाला आहे ,जो आपण कसे फसवले गेलो हे नवनवीन मूर्ख पणा करून जगाला ओरडुन सांगत असे.
पहिल्या मुलाच्या वेळी मी घरी गेले तेव्हा नानांना सांगितले की मी परत जाणार नाही.नाना नेहमीप्रमाणे. माझ्या मागे उभे राहिले .....आणि आईच्या रागाला घाबरून मला सासरी सोडून आले.
खूप अपमानित होऊन मी परत आले होते.पण मग मनाशी काही ठरवून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला .
आईला तिच्याच भाषेत सांगितले की जर मुलांना सांभाळले नाहीस मला नोकरी करायला दिली नाहीस तर मी परत येईन आणि मग लोकांना उत्तर देण्याची तुझी जबाबदारी.आईने नाईलाजाने माझे ऐकले .
दुसऱ्या मुलाच्या वेळी मला आइस्क्रीम खावेसे वाटत होते .डोहाळे कडक असल्यामुळे मला माहेरी जाता येत नव्हते.म्हणून नवऱ्याला सांगितले ,त्याने आइस्क्रीम दिले ..आणि त्याचा पहिला घास घेण्याआधी सांगितले,"उद्यापासून रोज चार दिवस स्टेशन पासून घरी चालत यायचे ..हे आपल्याला परवडणारे नाही.त्यामुळे काटकसर करावी लागेल....".हातातले आइस्क्रीम खाली कधी पडले मला कळलेच नाही वर त्यावरूनही मला बोल लावले की पैसे गेले आणि खाल्लेही नाहीस.
त्यावेळी पहिल्यांदा मला कळले की बाहेर स्वतः ला फसवून घेणारा माझा नवरा माझ्या बाबतीत वेगळा आहे आणि ते मला पटत नव्हते.नानांशी बोलल्यावर मला लक्षात आले की इथे राहण्याशिवाय मला प्रयाय नाही . साठ वर्षांपूर्वी मुलीने परत येणे लग्नानंतर ,हे कुणाला पटण्यासारखे नव्हते. मग माझा सूड मी घेतला माझ्या नवऱ्याला मी स्पष्टपणे मला स्पर्शही करायचा नाही असे सांगितले.त्याच्या तल्या पुरुषाने माझे ऐकले पण नवऱ्याने कायम माझ्याशी उभा दावा केला.
आयुष्यभर त्याने मला मानसिक रित्या छळले.मीही ते सहन करत राहिले.वडील गेल्यावर मात्र मी कोलमडले..कारण प्रत्यक्ष नाही तरी ते माझा मानसिक आधारस्तंभ होते.
अशा वेळी माझा मोठा मुलगा माझा आधार झाला.माझी हुशारी आणि आकांक्षा त्याने जशीच्या तशी उचलली होती. खूप लहान वयात त्याने खूप मोठी प्रगती केली होती .आणि असाच वर वर जात होता.
त्याच्या आयुष्यात अतिशय सुंदर मुलगी आली .खूप श्रीमंत सुंदर आणि साधी आम्हाला सगळ्यांनाच ती खूप आवडली.पण तिच्या घरी हे पसंत नव्हते .म्हणून मग दोघांनी पळून जावून लग्न केले.
ती ज्या दिवशी माझा उंबरठा ओलांडून आत आली.त्यादिवसा पासून मी तिची आई झाले .
पण तिला मुलगी झाल्यावर ,तिच्या हातून इतक्या साध्यासाध्या चुका होत होत्या की आम्हाला कळतच नव्हते असे का होत आहे .पण मग तिच्याशी अन् डॉक्टरांशी बोलल्यावर आमच्या असे लक्षात आले की तिचा जो साधेपणा आम्हाला वाटला होता तो तिच्या मनाचा हळवेपणा होता.जरुरी पेक्षा जास्त हळवी होती ती .आई झाल्यापासून आपण आपल्या आईला किती त्रास दिला ह्या विचाराने तिला अतिशय अपराधी वाटत होते.कणाकणाने ती मरत होती.तिला सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही पण ती आतून तशीच तुटलेली राहिली
.मुलाने परदेशात जाऊनही नाव काढले.
धाकटा मात्र ह्यांच्यावर गेला होता ,कसलीही अपेक्षा नाही इच्छा नाही, आहे त्यात सुखी.त्यामुळे मोठ्याने investment करताना जागा घेताना त्याच्या आणि माझ्या नावाने घेतल्या .बायकोला त्यात रस नव्हता आणि वडील व भावात काही दम नव्हता.
नात मोठी झाली लग्न झाले लंडन ला मोठ्याने त्यांना घर घेऊन दिले सगळी मदत करत होताच .
....वीस वर्षापूर्वी माझा नवरा गेला .जितका शांतपणे तो जगला तितक्याच शांतपणे हे जग सोडून गेला.आणि नसलेल्या नात्यातून मी जगाच्या दृष्टीतून मोकळी झाले.
अचानक पुढच्या दोन तीन वर्षातच माझ्या मोठ्या मुलाला असाध्य रोग झालेला आम्हाला कळले ,मोठी मोठी स्वप्न बघणाऱ्या माझ्या बाळाला आजारही मोठाच झाला.अनेक घर ,अनेक investments ,दागिने असे भरपूर करून ठेवलेल्या माझ्या मोठ्याला औषधोपचार काहीच अशक्य नव्हते .जसजसे दिवस जात होते तसतसे बचत,ठेवी आणि दागिने मोडायला लागणार आहेत हे माझ्या लक्षात आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली.तरीही नेहमी प्रमाणे खंबीर राहून मी मला जसे जमत होते तसे पैसे उभे करत होते.पण त्या महा भयानक रोगाने माझ्या बाळालाच नाही तर त्याच्या पैशाला, आयुष्यभराच्या कमाईला पण पोखरून टाकले.सून फक्त नावाला होती ,तिला नवऱ्याची हीअवस्था बघवत नव्हती .अशातच एक दिवस तिच्याच खांद्यावर त्याने मान टाकली.
..मी खूप नॉर्मल आहे असे दाखवत होते सुनेला नातीला इतरांना सावरत होते .सगळे माझ्या धीराचे कौतुक करत होते आणि मी मात्र आतल्या आत आक्रोश करत होते रडत होते.माझे भोग इथे संपले नाहीत .मुलाने घेऊन ठेवलेल्या घरांचे जेव्हा कागदपत्र मी काढले तेव्हा जावयाने त्यांच्या वकीला कडे नेले.आणि लक्षात आले की त्याने कुठेही वारस ठेवला नव्हता ,सगळी कडे आमच्या दोघांच्या नावाने घर होती.त्यामुळे कायद्याप्रमाणे माझ्या नावाच्या भागीत माझ्या लहान मुलाचाही पन्नास टक्के हक्क होता .मोठ्या आशेने मी त्याच्या कडे बघितले पण आयते आलेले भाग्य तो असे लाथाडणार नव्हता.आपला हिस्सा दे. नाहीतर मी कोर्टात जाईन असे म्हंटल्यावर एक घर विकून त्याचे आलेले सगळे पैसे घेऊन तो निघून गेला.
नातीने अन् जावयाने संबंध तोडले .मीच वडिलांचे कान भरून असे केले असे म्हणत परत कधीही मागे न बघता कधीही परत न येण्यासाठी ते दोघेही निघून गेले.
जागा विकल्या जात नव्हत्या ज्या गेल्या त्या चाईपाईने गेल्या त्यात झालेली वकिलाची कर्ज फिटली.
माझी सून आता खरंच माझी मुलगी झाली होती पण नव्याने जन्माला आलेली....तिला काहीही कळत नाही .दिले तर खाते ,झोपवले तर झोपते .मध्येच कधीतरी हसते कधीतरी हुंदके देऊन रडते.काय चालू असते तिच्या मनात त्या गजाननाला माहित.
मला जाणवले की माझ्या नवऱ्याला त्याच्या हक्काच्या सुखापासून मी लांब ठेवले त्याचे शिव्याशाप मला लागले असतील अन् मलाही त्यामुळे सगळ्या सुखापासून लांब राहावे लागले असेल..खूप निराशा आली होती काय करावे कळत नव्हते अन् एक दिवस सुनेला जाग आली .मला म्हणाली ,"खूप भूक लागली आहे खायला दे ना".
रिकामे डबे शोधताना माझा अडगळीत पडलेला स्वाभिमान मला मिळाला अन् ठरवले परिस्थितीला शरण सामान्य लोक जातात.तू सामान्य नाहीस .उभी रहा जितके दिवस आहेत तितके दिवस मानाने जग.ह्या देवळाचा पुजारी माझ्या शेजारी राहत होता .त्याने माझी धडपड बघितली म्हणाला ,"म्हातारे ,देवळात बस अन् चपला सांभाळ बिन भांडवलाचा धंदा आहे चार पैसे मिळतील."
भोग आहेत ते भोगायला लागणार मग ते रडत भोगण्यापेक्षा मानाने भोगुया असे ठरवले आणि जे काही थोडे पैसे मिळतात त्यात आम्ही माय लेकी जगतो आहोत.
अजूनही निघताना देवाला हेच मागणे मागते ,माझ्या माघारी माझ्या लेकीला बघणारे कोणी नाही तेव्हा तिला माझ्या आधी.......,.सुटलेला बांध कसाबसा आवरून धरत आजी वर्तमानात परत आल्या.
डोळ्याला आलेला महापूर न आवरता मी त्यांच्या जवळ गेले आणि" मी काही मदत करू शकते का"? असे विचारले .आजीचे शब्द आठवून मला कमालीचे ओशाळवाणे वाटले.एका क्षणात आजींच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले पण लगेच शांत होऊन त्या म्हणाल्या ," एक मदत कर,तुमच्या त्या सोशल की फोशाल वर माझा फोटो टाक आणि सांग त्यांना चपला सांभाळत आणखी काही बसल्या जागी काम मिळाले तर करायला तयार आहे ही आजी.एखादे हलके काम करेन ग .जास्त काही नाही जमणार."आणि आजीनी सांगितल्या प्रमाणे मी माझे काम इमाने इतबारे केले.
आजींना रोजच्या पन्नास वाती वळायचे काम मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मध्ये आनंद झिरपायला लागला.
घरी आल्यावर आजीच्या कुशीत शिरताना एक आत्मिक समाधान मला मिळाले होते .मनावरचे ते दडपण नाहीसे झाले होते हा ऐशी वर्षाचा वाडा बुरुजे ढासळली तरी पायात मजबूत होता आणि म्हणूनच अभेद्य होता..त्या ऐशी वर्षाच्या जिद्दीला मानाने जगण्यासाठी माझा हातभार लागला होता आणि म्हणून मी आज खूप खूश होते ....
आजी ही ,"आषाढ संपून श्रावण सुरू झाला वाटते " म्हणत मनमोकळे हसली होती.
✍️श्रद्धा राजेश
No comments:
Post a Comment