Showing posts with label आठवा महिना. Show all posts
Showing posts with label आठवा महिना. Show all posts

Wednesday, January 7, 2026

स्टेशन क्रमांक आठ… आईपणाच्या प्रवासातील एक अविस्मरणीय थांबा

 

स्टेशन क्रमांक आठ… आईपणाच्या प्रवासातील एक अविस्मरणीय थांबा


आईपणाचा प्रवास हा फक्त नऊ महिन्यांचा नसतो, तर तो प्रत्येक क्षणात, प्रत्येक वेदनेत आणि प्रत्येक आनंदात आकार घेत असतो.

कधी त्या प्रवासात भीती असते, कधी उत्सुकता, तर कधी नकळत डोळ्यांत पाणी आणणारा भावनांचा पूर.

पोटात वाढणाऱ्या त्या छोट्याशा जीवासोबत आईदेखील रोज नव्याने घडत असते.

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात आलेला हा अनुभव माझ्या आयुष्यातील असा एक थांबा आहे, जिथे वेदना, श्रद्धा, संस्कार आणि अपार प्रेम एकत्र नांदत होते.





आज आमच्या गरोदरपणाच्या यात्रेचा आठवा महिना सुरू झाला होता.

जणू आमची गाडी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर—स्टेशन नंबर आठ—येऊन थांबली होती.

सुरुवातीला ज्या हलक्या, हळुवार हालचालींची मी आतुरतेने वाट पाहायचे, त्या आता थांबायचं नाव घेत नव्हत्या. पोटातील बाळाला जणू बाहेर यायची खूपच घाई झाली होती.

रात्र रात्र झोप लागत नव्हती. बाळाची हालचाल इतकी वाढली होती की कधी कधी वेदनांमुळे डोळ्यांत पाणी यायचं. पोटात कळा यायला लागल्या आणि मनात भीतीची सावली दाटू लागली.

असेच दोन-तीन दिवस गेले. वेदना वाढतच होत्या. अखेर ठरवलं—आता डॉक्टरकडे जायलाच हवं.

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी पोट तपासताच गंभीर स्वरात सांगितलं,

“तू आत्ताच्या आत्ता ॲडमिट हो.”

कारण मला Preterm contractions सुरू झाले होते. त्या क्षणीसुद्धा डिलिव्हरी होऊ शकली असती.

पण डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार केले. जणू एखाद्या जादूच्या छडीने वेदना कमी झाल्या. अजून नऊ महिने पूर्ण व्हायचे होते.

मी मनोमन बाळाला सांगत राहिले—

“थोडं थांब… अजून वेळ आहे… आतच सुरक्षित राहा.”

इंजेक्शन, गोळ्या आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर बाळाला नऊ महिने पूर्ण होईपर्यंत पोटातच ठेवण्यासाठी मी स्वतःलाच धीर देत राहिले.

बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दुसऱ्यांदा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ‘गर्भ मंगल संस्कार विधी’ घरी ठेवला.

भंतेजींनी येऊन बाळाला आशीर्वाद दिले, चिवरदान करण्यात आलं.

मन खूप शांत, प्रसन्न झालं. घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा भरून राहिली.





असेच दिवस सरत होते… बाळाच्या आगमनाच्या चाहुलीने प्रत्येक क्षण खास वाटत होता.

आणि मग आली आंबेडकर जयंती.

रात्री बारा वाजता फटाक्यांचा आवाज, ढोल-डिजेचा गजर सुरू झाला. खाली लोक नाचायला जमले.

ते आवाज सुरू होताच, माझं बाळही पोटात गाण्याच्या ठेक्यावर हालचाल करू लागलं—जणू तोही आनंदात सामील झाला होता.

मी आणि अहो खिडकीत बसून सगळं पाहत होतो… मनातल्या मनात नाचत होतो.

भीम जयंतीची गाणी वाजली की कोणालाही नाचावंसं वाटतंच—आणि मला तर ते खासच वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी विहारात जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला नतमस्तक झालो.

संध्याकाळी घरात सगळ्यांनी मिळून छान वंदन केलं.

त्या क्षणी जाणवलं—

हे केवळ गरोदरपण नव्हतं, तर संस्कार, श्रद्धा, आनंद आणि आईपणाचा एक पवित्र प्रवास होता.


निष्कर्ष (Conclusion)

आठवा महिना माझ्यासाठी केवळ काळाचा एक टप्पा नव्हता, तर तो धीर, विश्वास आणि आईपणाच्या परिपक्वतेची कसोटी होता.

वेळेआधी सुरू झालेल्या वेदनांनी घाबरवले, पण डॉक्टरांची काळजी, बाळावरचा विश्वास आणि मनातील सकारात्मकता यामुळे तो काळ पार करता आला.

गर्भ मंगल संस्कार, बाबासाहेबांची जयंती, ढोल-डिजेच्या आवाजात पोटात नाचणारं बाळ—हे सगळं केवळ आठवणी नाहीत, तर त्या बाळाच्या आयुष्याला मिळालेले पहिलं संस्कार होते, असं आजही वाटतं.

आज मागे वळून पाहताना असं जाणवतं की,

आईपण म्हणजे फक्त जन्म देणं नाही,

तर जन्माआधीच त्या जीवासाठी जगायला शिकणं आहे.


✍🏻वसुधा इंगळे 

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...