Tuesday, October 17, 2023

सुंदर आयुष्य

 सुंदर आयुष्य 

सुंदर आयुष्य तोच जगू शकतो ज्याला फुलासारखं फुलता येतं. आणि जीवनातील प्रत्येक वादळात टिकता येतं.फुलाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. सुंदरता आणि हास्य या दोन गोष्टी फुलाकडून शिकाव्या. 

फुलं कोणताही मेकअप न करता सुंदर दिसतात. आपल्याला कोणीतरी तोडून नेईल हे माहित असतांनाही फुलं हसतात. तोडल्यावरही ते हसतातच. ते शेवटपर्यंत लोकांना आनंद देतात. हसवतात व नव्याने जगायला शिकवतात. तस माणसानेही जगावं इतरांना आनंद द्यावा,दुःख देवू नये. त्रासही देवू नये, कारण सुख वाटण्यातच आयुष्याची मजा आहे. 

आपण लोकांना आनंद आणि सुख वाटतं गेलो की, हळूहळू आपल्याबरोबर आपल्या आसपासची माणसंही सुखी आणि आनंदी होतील. म्हणून फुलासारखं सुख आणि आनंद वाटतं रहा.आयुष्य फुलासारखं फुलून जाईल.

✍️ वसुधा इंगळे

Monday, October 16, 2023

      

 मला माणसं जोडावी वाटतात. माणसांना अजिबात दुखवावं वाटतं नाही. शक्य होईल तेवढी चांगली माणसं मी जोडतेय आणि जोडण्याचा प्रयत्न करते.


कोणासोबतही कुठल्याही कारणाने संबंध खराब करावे अस वाटतं नाही. नाईलाज झाला तरंच कधी कधी हा निर्णय घ्यावा लागतो. पण याबाबतीत सुद्धा मी पुढाकार घेत नाही. न दुखवता लांब होऊन जाते. आयुष्यात आजपर्यंत कोणासोबतही विशेष असं काही वाद झाले नाही किंवा संबंध खराब झाले नाही. मी ते पुढे सुद्धा होऊ देणार नाही. भविष्यात कधी असं काही झालंच तर मी ते सुधारण्याचा करायचं प्रयत्न नक्की करेन. माफी मागायला नि माफ करायला सुद्धा शिकेन. Ego, Attitude वगैरे बाजूला ठेऊन माणसाला किंमत देईल. कायमच कुठल्याही वाद आणि भांडणापासून लांबच राहते. भांडणा ची मला भीती वाटते.कारण लोक प्रेमाने बोलताना जेवढं हळू बोलता येईल न तेवढं हळू बोलतात,पण भाडंनात का त्याचा आवाज इतका वाढतो. 


मी प्रेम पेरायला प्राधान्य देते कारण द्वेषाची कमी नाही..!


✍️वसुधा इंगळे

Friday, October 13, 2023

साद - प्रतिसाद

साद - प्रतिसाद...!



काल बोलता बोलता हे म्हणाले.., "हल्ली तु सगळ्या गोष्टी कशा लवकर मान्य करतेस गं.. अजिबात वाद घालत नाही. आढेवेढे घेत नाही म्हणेल त्याला राजी असतेस."


या त्यांच्या वाक्यावर तेव्हा फक्त मी हसले. पण नंतर त्याचा विचार केल्यावर अनेक माझ्याच गोष्टी माझ्या समोर आल्या.


वयाच्या तिशी पर्यंत माणुस खुप जास्त हवेत असतो. वास्तविक परिस्थिती समजुन न घेता पत्त्यांचे बंगले रचत जातो. ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारी ताकद माझ्या पंखात नाही... ही गोष्ट त्याच्या भाईच नसते. कुणी जर उत्तरेला चल म्हटलं, तर याला दक्षिणेलाच जायचं असतं. तेच संसारातही होतं..


नवऱ्याला ब्राऊन सोफा घ्यायचा असला, तर आपल्याला क्रिम कलर हवा असतो. नवरा म्हणतो घराची बाल्कनी बेडरुमला हवी... तर आपण म्हणतो, नाही बैठकीला हवी. नवरा म्हणतो महाराष्ट्रीयन जेवण जेवू, तेव्हा आपल्याला बिर्याणी खायची असते. एक जण बजेट बघतो... एकजण फक्त स्टाईल. वयाच्या तिशीत जोडीदाराला समजुन घेणं हे फार क्वचित होतं आणि आक्रमकता जास्त असते.


पण जसजसा काटा वर सरकायला लागतो... तसतशी आक्रमकता कमी व्हायला लागते. आणि कितीही आदळ आपट केली, तरी आहे त्या आजुबाजुच्या गोष्टी कधिच बदलणार नाहीत... हा वस्तुस्थितीचा स्विकार मन हळूहळू करते, नी शांततेच्या मार्गाने जायला लागते.


जेव्हा उत्तरेकडे ही तोच निसर्ग... नी दक्षिणेकडेही तोच निसर्ग हे जीवाला मान्य होतं, तेव्हा "किधर भी चलो... कोई बात नही" ही भावना मनात दृढ होत जाते.


आपल्याला मनःशांती हवी असेल तर "स्वीकार" हा तीन अक्षरी मंत्र फारच प्रभावीपणे काम करतो. आहे त्या माणसांचा, आहे त्या परिस्थितीचा,स्विकार  तो ही आनंदाने. 

आज माझ्या सोबत जे काही होतंय, ते चांगल्या साठीच होतंय, जिंदगी के सफर मे जे जे भेटतय ना... ते माझ्या चांगल्या साठीच भेटतायेत... असं मनावर पक्क कोरलंना... कि मग आपण आहेत्या परिस्थितीतही अत्यानंदात रहातो.


जीवनाकडुन काही अपेक्षाच नाही ठेवली ना... तर मग झाडाला आलेलं फुल पण निर्व्याज आनंद देऊन जातं. जगण्याची उर्जा देऊन जातं.


पण वाटतं तेवढ सोपं नाही बरंका हे.... स्वतः चा "मी" पणा बाजुला ठेवुन अवास्तव अपेक्षा बाजुला ठेवून चालत रहाणं... वाटतं तेवढं नक्कीच सोपं नाही.

Wednesday, October 11, 2023

बायको

 बायको


बायको कोण असते...

कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते

कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते

कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते

कधी समजून घेणारी मित्र असते

कधी त्रास देणारी डोकेदुखी असते

कधी मस्का लावणारी असते

कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते

आणि कधी नको असताना जवळ असते

कधी न सांगता समजून घेते

कधी गैरसमज करून घेते

कधी मुलांची काळजी करते

कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते

कधी नवर्याला नावे ठेवते

कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते

कधी फिरायला नेलं कि नखरे करते

कधी हट्टउन हौस पुरवून घेते

कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते

कधी शॉपिंगने बेजार करते

कधी नवर्यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते

कधी कोणाची गुपितं सांगते

कधी कोणाला कळू न देता गुपचूप कारभार उरकते

कधी तंबी देऊनच घराबाहेर सोडते

कधी घरी यायची वाट बघत बसते

कधी सरळ सूत तर

कधी संशयाचं भूत असते

कधी नवर्याला लगाम घालू पाहते

कधी नवर्यावर प्रेमाचा वर्षाव करते

कधी शेळी तर कधी वाघ असते

कधी आंबट तर कधी गोड असते

कधी न म्हणते - आज मी दमले, 

कधी न संपणारी घराची उर्जा असते

कितीही भांडली तरी मुकाट्याने जेवायला घालते...

बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून घरची म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते..

            

Tuesday, October 10, 2023

भेट

 भेट




आयुष्यात भेटणारं कोणीच 

अकारण भेटत नसतं.


विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं

आयुष्यातलं ते एक पान असतं.


भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून

काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं.


म्हणूनच बहुदा त्याने दोघांच्या 

भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं.


मित्र असोत वा शत्रू

प्रत्येक जण जणू एक पुस्तक असतं.


ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने

आपापलं ठरवायचं असतं.


शंभर टक्के चांगलं किंवा 

शंभर टक्के वाईट कोणीच नसतं. 


प्रत्येकात चांगलं असं

काही ना काही दडलेलंच असतं.


त्यातलं चांगलं ते अधिक 

आणि वाईट ते उणे करायचं असतं.


"मीपण" पूर्ण वजा करून

"माणूसपण" तेवढं जमा ठेवायचं असतं.


स्वतःसाठी जगताना  दुसऱ्यासाठीही

जगता येतं का पाहायचं असतं.


कोणासाठी आधारवड तर कोणासाठी

श्रावणधारा होऊन बरसायचं असतं.


म्हणून मला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात

माझ्यासाठी इवलासा कोपरा असू दे.


त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं

माझ्या नावचं फक्त एक पान असू दे!👍🏻🤝🏻

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...