Wednesday, September 10, 2025

माझा नटखट टीटू

 माझा नटखट टीटू 


आता आपली गाडी स्टेशन नंबर 5 वर आली आहे. म्हणजे आपल्या गर्भयात्रेचा पाचवा महिना सुरु झाला आहे. वेळ पुढे जात आहे तशी तुझी समजण्याची शक्ती, चतुराई आणि नविन नविन शिकायच्या - गोष्टी यांची क्षमता सुध्दा वाढत जात आहे. आता तुझे डॅडी माझ्या पोटावर कान ठेवुन तुझ्या हृदयाचे ठोके सुध्दा ऐकतात. बर का! 



आता तुझा चांगला विकास ही झाला आहे. तुझ्या हृदयाचे ठोके माझ्या आत मला जाणवतात. आणि हाच विचार मला खूप आनंद देतो.

तुझे छोटे छोटे प्रेमळ डोळे आता पूर्णपणे विकसित झालेले आहेत. तुझे डोळे खूप सुंदर ताऱ्यांप्रमाने चमकत आहेत. लहान-लहान बोटे, लाल-लाल ओठ छोटेस नाजूक नाक! जणू काही सपूर्ण विश्वाच सौंदर्य माझ्या गर्भात उमलत आहे अस वाटत.


या महिन्यात तुझं वजन खूप चांगल्या पध्दतीनं वाढलं आहे. बघ ना ! माझा बेबीबंम दिसायला लाग‌ला आहे. ज्यामुळे सगळ्यांना कळले आहे की, मी गर्भवती आहे. लोंकाकडून मिळालेल्या शुभेच्छा तुला ऐकू येत आहेत ना? 

मला माहित आहे माझा स्पर्श आणि गोड गोड गोष्टी तुला खूप खूप आवडतात. माझ्या पोटावर हात ठेवुन मी आणि डॅडी तुला अंगाई गातो. तू पण लक्ष देऊन ऐकतो !



रोज तुझ्यासाठी नवीन काही तरी करायचं, किंवा तुला नवीन कोणत्या तरी गोष्टी ची ओळख करून द्यायची अस ठरवलं होत. जस की आज "टीटू" ही भाजी बनवली आहे. भाजी कोणत्या रंगाची आहे माहित आहे का तुला?

किंवा आज भगवंताची पूजा करताना कोणत्या कोणत्या रंगाची फुल घेतली त्या रंगाची तुला नाव सांगू का? आणि फुलांची नाव पण सांगते!!

असा रोजचा दिनक्रम होता. प्रत्येक गोष्ट तुला सांगायची. कारण तू आता मला प्रतिसाद देत होतास हलकेच पोटात हालचाल करून.


डॉक्टर ने सांगितलं होत तुम्ही थोड फार - पण जास्त लांब नाही, अस फिरायला जाऊ शकतात. 

मग आम्ही त्या संधी का सोडायचा! मग पुण्यामध्ये असल्यामुळे पुन्हा कधी संधी मिळेल "आर्मी दिवसाचे प्रदर्शन" बघण्याची, किंवा खास तेच बघण्यासाठी पुण्याला जाण्याची, मग संधी च सोन करूया या विचारणे आम्ही "आर्मी दिवसाचे प्रदर्शन" बघायला गेलो. आणि तुझ्या सोबत एक नवीन आठवण तयार केली. तू खूप सुंदर प्रतिसाद देतोस मला म्हणून हे सगळ शक्य होत. नाही तर मला पण तुला घेऊन घरीच रहाव लागलं असत. तुला फिरायला आवडल आणि तू मला तुला आवडलेल्या गोष्टी आहेत याचा वेळोवेळी संकेत देत आहेस. म्हणून मी तुझ्या सोबत माझ्या गरोदर पानाचा प्रवास अजून मजेशीर करायचा अस ठरवलं आहे.



माझी सात वर्षा पासून सगळ्यात आवडती मालिका म्हणजे "स्वराज्य रक्षक संभाजी"  मालिका जवळ जवळ मी १०ते १२ वेळा पाहिली आहे, आणि आता तू पोटात असताना देखील "सावित्री ज्योती",  "डॉ.बाबासाहेब आंबेडकर", अशा वेगवेगळ्या मालिका बघते. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघताना देखील तू मला काही भावनिक प्रसंग असतील तर वेगळी हालचाल किंवा महाराजाचे काही गनिमी कावे असतील तर वेगळी हालचाल करतोस.  नेमक त्या वेळी एक चित्रपट आला, "धर्मवीर संभाजी महाराज", मग हा चित्रपट न बघून कस चालेल, मग तुझे डॅडी सहज रात्री शतपावली करताना म्हणाले "टीटूराव" जायचं का महाराजांचा चित्रपट बघायला, आणि त्या क्षणापासून रात्री दोन वाजे पर्यंत तुझी पोटामध्ये "अफजलखान, शाहिस्तेखान, औरंगजेब," अजून काय माहित कोणा सोबत "लढाई" चालू झाली, ती संपता संपत नव्हती. शेवटी तुझे डॅडी आणि मी तुझ्या साठी अंगाई गीत गाऊ लागलो, " गाई गाई बाळा झोपी जाई" .


सकाळी उठून म्हटलं बाळा ला नेल पाहिजे चित्रपट बघायला, त्याला आवडेल आणि महाराजांचा इतिहास ही कळेल. मग एक दिवस आम्ही गेलो चित्रपट गृहात, चित्रपट बघायला बाळ माझं १५ मिनिट पण शांत राहील नाही, पोटात त्याची पुन्हा कोणासोबत लढाई चालू झाली हे त्यालाच माहित. शेवटी काही वेळ बाहेर आले जेणे करून बाळ शांत होईल, पण कसलं काय टीटू कदाचित "स्वराज्याचे गुप्तहेर", "बहिर्जी नाईक" यांच्यासोबत मसलती आणि खलबत करत असेल आतमध्ये. जेणे करून मी आताच कोणता तरी गनिमी कावा वापरून मम्मा च्या पोटातून बाहेर येतो.

 चित्रपट बघायला आलेल्या एक काकू पण म्हणाल्या संभाजी महाराज येतील तुमच्या घरी, आम्ही आनंदाने म्हटलं हो हो...येऊ देत. आणि त्या क्षणी माझ्या मनात आलं – हो खरंच, माझ्या गर्भात वाढतंय ते माझं छोटं शूरवीर बाळ – माझा नटखट टीटू.


✍🏻वसुधा इंगळे.

Thursday, September 4, 2025

शिक्षक दिन

 शिक्षक दिन... !



 

आजच्या वेगवान युगात, Google सगळी उत्तर देतो..! पण योग्य प्रश्न विचारायला शिकवणारे शिक्षक, शिकता शिकता उत्तरे शोधायला लावणारे शिक्षकचं असतात...! पुस्तकं ज्ञान देतात... पण ते ज्ञान आयुष्याशी जोडून जगायला शिकवणार शिक्षकच असतात...!


खरा शिक्षक तोच - जो फक्त गणित, इतिहास, विज्ञान शिकवत नाही, तर संकटात कसं उभं राहायचं, अपयश आलं तरी कसं लढायचं, आणि आयुष्य जगतांना स्वाभीमान, प्रामाणिकपणा, आणि माणुसकी कशी जपायची हे शिकवतो...


आज आपण जे काही आहोत, ते आपल्या पालकानंतर जर कोणी घडवल असेल तर ते आपले "गुरुजन"...!


म्हणूनच शिकवणारे शिक्षक कायम लक्षात राहतात... या शिक्षकदिनाला औपचारिकता नाही तर कृतज्ञतेचा दिवस म्हणून सर्व शिक्षकांना सांगायच आहे कि... "आपण फक्त विषय नाही शिकवले तर आयुष्य शिकवले.." आणि म्हणूनच तुम्ही कायम आमच्या आदरणीय व्यक्ती आहात...!


"शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..."

✍🏻 वसुधा इंगळे.

Sunday, August 24, 2025

आपलं त्रिकूट

 आपलं त्रिकूट


पहाटेचा गारवा अजून अंगावर होता. अचानक माझे डोळे उघडले आणि मी बाल्कनीत जाऊन उभी राहिले. हवेतला तो शुद्ध सुगंध, पहाटे ची शांतता, आणि समोर आकाशात इंद्रधनुष्य, पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांच्या फांद्यांवर चमकणारं कोवळं ऊन – मन अगदी प्रसन्न झालं.



"टीटू, बघ हा कावळा…" मी माझ्या पोटाला हलकेच हात लावून म्हणाले.

इतक्यात समोरच्या बाल्कनीत एक कबूतर फडफडत आलं. शेजारच्या झाडावर खारूताई खेळत होती. आणि दूरवरून कोकिळेचा गोड आवाज कानावर आला.

“हा बघ, किती सुंदर पक्षी आहे, सगळे तुला भेटायला आलेत,” मी टीटूला अस सांगत होते.


कुंडीतल्या गुलाबाच्या झाडाला लालचुटुक फुलं आली होती. मी तेही बाळाला दाखवलं. इतक्यात अहो म्हणजे, "पतीराज" बाल्कनीत आले आणि हसत म्हणाले, दोघ सकाळी सकाळी काय करत आहेत बाल्कनीत,आणि त्यांनी सुध्दा बाळाला आवाज दिला.

“गुड मॉर्निंग, टीटू!” आणि आम्ही सगळे कोवळं ऊन अंगावर घेत घरात आलो.




नाश्त्याची वेळ झाली. रोजच्याप्रमाणे "अहो"म्हणाले,

“टीटू, चल नाश्ता करायला. मम्माने इडली केली आहे, तुला आवडेल ना?”

आम्ही दोघं बसलो. नाश्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे पोटावर हात ठेवून मी बाळाशी गप्पा मारायला लागले.

“कालची सर्कस आवडली का तुला? पुन्हा जाऊया का बघायला?” अजून अशा बऱ्याच गप्पा झाल्या.


बोलता बोलता घरातली कामवाल्या ताई आल्या. तिने आपलं नेहमीचं काम केलं – भांडी, साफसफाई – आणि निघून गेली. मी पुस्तक वाचायला घेतलं, पण मन लागत नव्हतं. अहो म्हणाले,

“काय झालं? सकाळपासून शांत आहेस. काही त्रास होतोय का? डॉक्टरकडे जायचं का?”

मी हसून टाळलं, “नाही वो, सगळं ठीक आहे.”


तेवढ्यात शेजारचा लहान मुलगा "श्री" धावत आला.

“अँटी, तुम्ही बनवलेली इडली मस्त होती!” मी "थँक्यू" म्हणायला आलो. असं म्हणत गप्पा मारून तो निघून गेला.



पण माझं मन मात्र बेचैन होतं. अहो नि पुन्हा विचारलं काय झालं. कोणी काही बोलल का. आणि चटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हळू आवाजात म्हणाले,

“सकाळपासून टीटूची काहीच हालचाल होत नाहीये. किती बोलते आहे मी, किती प्रेमाने हाक मारते आहे, तरीही तो शांत आहे.”


अहो माझा हात धरून म्हणाले,

“चल, मी बोलतो त्याच्याशी.”

ते पोटावर हात ठेवून हसत म्हणाले,

“अरे टीटू, काय झालं? मम्मा किती बोलतेय तुला, आणि तू उत्तरच देत नाहीस! सर्कस आवडली नाही का? की आपण दुसरीकडे फिरायला जाऊ? चल ना रे, आमच्याशी बोल.” तू आत मध्ये ठीक आहेस ना, इडली आवडली नाही का तुला.


खूप वेळ गप्पा मारल्या नंतरही पोट शांत होतं. मी रडत म्हणाले,

“आपण बाळाबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. कुणाला काहीच माहिती नाही द्यायची बाळाची".


इतक्यात अचानक पोटात हलकासा स्पर्श जाणवला – जणू टीटूने होकार दिला. माझे डोळेच पाणावले.

अहो हसत म्हणाले,

“बघ, टीटू ऐकतोय! म्हणतोय की मम्मा-डॅडी, माझ्याबद्दल कुणाला काही सांगू नका. आपलं त्रिकूट आहे ना? मग आपले गुपित ही फक्त आपल्यातच राहू द्या.”


आम्ही दोघंही एकमेकांकडे बघून हसलो. त्या क्षणी असं वाटलं – माझ्या मनात रंगीत कारंजं उडालं. एवढ्या लहानशा हालचालीत ही किती प्रेम दडलेलं असतं!


"श्री" घरी आला की टीटू नेहमी हलके हलके हालचाल करत असतो. जणू त्याला श्रीच्या गप्पा आवडायच्या.

तो मला म्हणायचा “अँटी, तुम्ही जसं वेगवेगळं खायला बनवता तसं मम्मी नाही बनवत, मम्मी सारखी खिचडीत बनवते. खूप निरागस होता. श्री माझ्या "टीटू" चा पहिला "मित्र".


पण आम्ही मात्र निश्चय केला होता – बाळाचं गुपित फक्त आमचं. बाळाची मस्ती, हालचाल, बाळाचं रात्री जाग राहणं, याबद्दल आम्ही कुणाशीही बोलत नाही.

कारण ते आमचं छोटंसं गुपित होतं… आमचं आणि आमच्या टीटूचं.


 *हा प्रसंग मम्मा डॅडी आणि पोटातल्या बाळाच्या गोड नात्याचा आहे* – एक अदृश्य बंध ज्यात प्रेम आहे, काळजी आहे आणि एक खास गुपित ही आहे.



✍🏻वसुधा इंगळे.

Friday, August 22, 2025

आई-बाळाचं जग पाहण्याचं प्रवासवर्णन

 आई-बाळाचं जग पाहण्याचं प्रवासवर्णन


**बघता बघता…**


चौथ्या महिन्यातली सकाळ. तीन महिने डॉक्टरांनी सांगितलेलं बंधन (जास्त प्रवास नाही, आणि खूप आरामही नाही) पाळून झाली होती. घरातल्या खिडकीतून येणाऱ्या ऊन-वाऱ्याच्या साथीने पुस्तकं वाचणं, योगा करणं, डायरी लिहिणं, गर्भसंस्काराचा ऑनलाइन वर्ग, आणि रोजच्या स्वयंपाकात नवनवीन पदार्थ… सगळं चालू होतं. तरीही मनात एक गोड हुरहूर होती — *माझ्या बाळाला बाहेरचं जग दाखवायचं आहे.*



डॉक्टरांना विचारलं, “थोडं बाहेर फिरायला जाऊ का?”

ते हसले — “कंटाळा आला तर टीव्ही बघा.”

मी खट्याळ हसून उत्तर दिलं, “टीव्ही बघायला नाही आवडत.”

“मग पुस्तक वाचा,” ते म्हणाले.

“पुस्तकं तर भरपूर वाचते… पण आता मन मोकळ्या आकाशात फिरायला हवं आहे,” मी स्पष्ट सांगितलं.


डॉक्टरांनी अखेर मान डोलावली — “७-८ किलोमीटरच्या आत कुठेही जा, पण बस-रिक्षा टाळा.”

बस्स! मग पहिली सफर ठरली — **वाघेश्वर मंदिराला**.


त्या दिवशी सकाळच्या मंद उन्हात आणि वाऱ्यात मी पोटावर हात ठेवून बाळाला म्हटलं — *“आज तुला पुण्यातील एका मंदिराच पहिलं दर्शन घडवते.”* मंदिरात पोहोचल्यावर ती शांतता, घंटांचा नाद, आणि मनभरून येणारी श्रद्धा… तिथेच पिलाजीराव जाधवरावांची समाधी होती. इतिहासाचा तो ठसा पाहताना वाटलं, माझ्या बाळाच्या मनातही ही ताकद, ही निष्ठा रुजावी.

काही दिवसांनी, जवळच्या मॉलमध्ये **सर्कस** लागली होती. दोघांनाही लहानपणीच्या आठवणी उजळल्या —

“मी लहान होते तेव्हा आई आणि सगळ्या मैत्रिणींसोबत सर्कस बघायला गेले होते,” अस मी यांना सांगितलं.

तेही हसले — “मी पण मामासोबत गेलो होतो.”


सहजच मी पोटावर हात ठेवून बाळाला विचारलं — *“जायचं का सर्कस बघायला?”*

काही क्षणांनी हलकीशी हालचाल — जणू होकारार्थी उत्तर मिळालं.




सर्कसच्या रंगीबेरंगी दिव्याखाली, वेगवेगळ्या कसरती,  जोकरची गंमत बघून बाळाच्या हालचाली वाढत होत्या. जणू आतमध्येच लहानसं टाळ्यांचं कारंजं उडत होतं. मी हळूच म्हणाले, “अहो, फोटो नका काढू, इकडे पोटावर हात ठेवा… जाणवतंय ना? हा जोकर बाळाला खूप आवडला आहे बहुतेक.”


त्या रात्रीनंतर मात्र माझी झोप उडाली. कारण असं वाटत होतं — बाळ अजूनही आतल्या आत सर्कशीतल्या खेळांत रमलंय… कधी झुलतंय, कधी उड्या मारतंय, कधी टाळ्या वाजवतंय. आणि मी, आई म्हणून, त्या छोट्या खेळाडूच्या प्रत्येक हालचालीचा आनंद घेत होते.


✍🏻 वसुधा इंगळे.

Tuesday, August 12, 2025

टीटूचं आगमन

 **टीटूचं आगमन**


संध्याकाळचा गारवा अंगावर घेत मी बाल्कनीत बसली होती. हात नकळत पोटावर गेला आणि चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. अजून तिसराच महिना सुरू झाला होता, पण मनातल्या आईच्या भावना मात्र ओसंडून वाहत होत्या.







प्रत्येक सकाळ माझी एक खास सवय झाली होती – नाश्त्यानंतर मी आणि अहो पोटावर हात ठेवून बाळाशी बोलायचो.

"डियर बेबी," "आपली गाडी आता तीन नंबर प्लॅटफॉर्मवर पोहोचली आहे! तिसरा महिना सुरू आहे. आता तू हळूहळू माणसाच्या रूपात घडतो आहेस."


यांनी बाळाचं नाव ठेवलं होतं – **टीटू**.

"तू मुलगा असशील की मुलगी, हे माहिती नाही, पण तुझं नाव मात्र आता टीटूच!" तुला आता हेच म्हणायचं.


गरोदरपणाच्या त्या काळात प्रत्येक दिवस आम्ही सणासारखा साजरा केला. कधी फुलांची सजावट, कधी शांत सुरांमध्ये गायलेली गाणी, कधी डान्स, तर कधी छान तयारी करून काढले फोटोस – सगळं काही त्या बाळासाठी होतं.

मी म्हणायची, "ही वाटचाल खास असावी म्हणून आपण प्रत्येक दिवशी एक नवीन आठवण तयार करूया"


आणि एक दिवस दिवाळी आली – दिव्याचा, रंगांचा आणि आनंदाचा सण.

मी दरवाजात सुंदर रांगोळी काढली, स्वादिष्ट जेवण केलं, आणि यांनी मिठाई आणि फाटके आणले...

मला म्हणतात कसे, "बाळासाठी खास फटाके घेऊन आलो आहे".

"टीटूला दाखवायचेत फुलबाजे!" अस हसून म्हणाले.

मी लगेच म्हटल बाळाला अजून काय समजत, आणि त्याच क्षणी जणू काही बाळ आत मधून मला सांगत आहे, मम्मा मला पाहिजे फटाके.


रात्री गच्चीवर फटाके फोडायला गेलो, आणि तितक्यात बाळाची एक गोड हालचाल जाणवली –

बाळ पोटात कुशीतून जणू म्हणत होतं, *"मम्मा, मलाही मजा करायचीय!"*


मी आनंदाने ओरडली, "अहो, बाळ हलतंय!"

आणि त्यानी लगेच मोबाईल काढला, "व्हिडिओ काढूया, मोठं झाल्यावर दाखवूया!" ह्या क्षणाला तू किती मस्ती करत होता.


रोज रात्री दोघं शतपावली करत गच्चीवर जायचो. आकाशाकडे पाहत.

"हे बघ टीटू, विमान! टाटा कर," मी म्हणायची.

आणि बाळ उत्तर द्यायचं – हलकीशी हालचाल करून.


त्या क्षणांना ना शब्दांची गरज होती, ना आवाजांची. बाळाचं अस्तित्व आत जिवंत झालं होतं.


मी मनात म्हणाली –

*"टीटू, तू येशील तेव्हा आमच्या आयुष्यात चैतन्य घेऊन येशील. तू अथांग समुद्रासारखा निखळ आणि स्वच्छ असशील."*


बाहेर आकाशात एक तारा चमकला –

आणि माझ्या पोटात पुन्हा एक सौम्य हालचाल झाली. 


✍🏻वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...