माझा नटखट टीटू
आता आपली गाडी स्टेशन नंबर 5 वर आली आहे. म्हणजे आपल्या गर्भयात्रेचा पाचवा महिना सुरु झाला आहे. वेळ पुढे जात आहे तशी तुझी समजण्याची शक्ती, चतुराई आणि नविन नविन शिकायच्या - गोष्टी यांची क्षमता सुध्दा वाढत जात आहे. आता तुझे डॅडी माझ्या पोटावर कान ठेवुन तुझ्या हृदयाचे ठोके सुध्दा ऐकतात. बर का!
आता तुझा चांगला विकास ही झाला आहे. तुझ्या हृदयाचे ठोके माझ्या आत मला जाणवतात. आणि हाच विचार मला खूप आनंद देतो.
तुझे छोटे छोटे प्रेमळ डोळे आता पूर्णपणे विकसित झालेले आहेत. तुझे डोळे खूप सुंदर ताऱ्यांप्रमाने चमकत आहेत. लहान-लहान बोटे, लाल-लाल ओठ छोटेस नाजूक नाक! जणू काही सपूर्ण विश्वाच सौंदर्य माझ्या गर्भात उमलत आहे अस वाटत.
या महिन्यात तुझं वजन खूप चांगल्या पध्दतीनं वाढलं आहे. बघ ना ! माझा बेबीबंम दिसायला लागला आहे. ज्यामुळे सगळ्यांना कळले आहे की, मी गर्भवती आहे. लोंकाकडून मिळालेल्या शुभेच्छा तुला ऐकू येत आहेत ना?
मला माहित आहे माझा स्पर्श आणि गोड गोड गोष्टी तुला खूप खूप आवडतात. माझ्या पोटावर हात ठेवुन मी आणि डॅडी तुला अंगाई गातो. तू पण लक्ष देऊन ऐकतो !
रोज तुझ्यासाठी नवीन काही तरी करायचं, किंवा तुला नवीन कोणत्या तरी गोष्टी ची ओळख करून द्यायची अस ठरवलं होत. जस की आज "टीटू" ही भाजी बनवली आहे. भाजी कोणत्या रंगाची आहे माहित आहे का तुला?
किंवा आज भगवंताची पूजा करताना कोणत्या कोणत्या रंगाची फुल घेतली त्या रंगाची तुला नाव सांगू का? आणि फुलांची नाव पण सांगते!!
असा रोजचा दिनक्रम होता. प्रत्येक गोष्ट तुला सांगायची. कारण तू आता मला प्रतिसाद देत होतास हलकेच पोटात हालचाल करून.
डॉक्टर ने सांगितलं होत तुम्ही थोड फार - पण जास्त लांब नाही, अस फिरायला जाऊ शकतात.
मग आम्ही त्या संधी का सोडायचा! मग पुण्यामध्ये असल्यामुळे पुन्हा कधी संधी मिळेल "आर्मी दिवसाचे प्रदर्शन" बघण्याची, किंवा खास तेच बघण्यासाठी पुण्याला जाण्याची, मग संधी च सोन करूया या विचारणे आम्ही "आर्मी दिवसाचे प्रदर्शन" बघायला गेलो. आणि तुझ्या सोबत एक नवीन आठवण तयार केली. तू खूप सुंदर प्रतिसाद देतोस मला म्हणून हे सगळ शक्य होत. नाही तर मला पण तुला घेऊन घरीच रहाव लागलं असत. तुला फिरायला आवडल आणि तू मला तुला आवडलेल्या गोष्टी आहेत याचा वेळोवेळी संकेत देत आहेस. म्हणून मी तुझ्या सोबत माझ्या गरोदर पानाचा प्रवास अजून मजेशीर करायचा अस ठरवलं आहे.
माझी सात वर्षा पासून सगळ्यात आवडती मालिका म्हणजे "स्वराज्य रक्षक संभाजी" मालिका जवळ जवळ मी १०ते १२ वेळा पाहिली आहे, आणि आता तू पोटात असताना देखील "सावित्री ज्योती", "डॉ.बाबासाहेब आंबेडकर", अशा वेगवेगळ्या मालिका बघते. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघताना देखील तू मला काही भावनिक प्रसंग असतील तर वेगळी हालचाल किंवा महाराजाचे काही गनिमी कावे असतील तर वेगळी हालचाल करतोस. नेमक त्या वेळी एक चित्रपट आला, "धर्मवीर संभाजी महाराज", मग हा चित्रपट न बघून कस चालेल, मग तुझे डॅडी सहज रात्री शतपावली करताना म्हणाले "टीटूराव" जायचं का महाराजांचा चित्रपट बघायला, आणि त्या क्षणापासून रात्री दोन वाजे पर्यंत तुझी पोटामध्ये "अफजलखान, शाहिस्तेखान, औरंगजेब," अजून काय माहित कोणा सोबत "लढाई" चालू झाली, ती संपता संपत नव्हती. शेवटी तुझे डॅडी आणि मी तुझ्या साठी अंगाई गीत गाऊ लागलो, " गाई गाई बाळा झोपी जाई" .
सकाळी उठून म्हटलं बाळा ला नेल पाहिजे चित्रपट बघायला, त्याला आवडेल आणि महाराजांचा इतिहास ही कळेल. मग एक दिवस आम्ही गेलो चित्रपट गृहात, चित्रपट बघायला बाळ माझं १५ मिनिट पण शांत राहील नाही, पोटात त्याची पुन्हा कोणासोबत लढाई चालू झाली हे त्यालाच माहित. शेवटी काही वेळ बाहेर आले जेणे करून बाळ शांत होईल, पण कसलं काय टीटू कदाचित "स्वराज्याचे गुप्तहेर", "बहिर्जी नाईक" यांच्यासोबत मसलती आणि खलबत करत असेल आतमध्ये. जेणे करून मी आताच कोणता तरी गनिमी कावा वापरून मम्मा च्या पोटातून बाहेर येतो.
चित्रपट बघायला आलेल्या एक काकू पण म्हणाल्या संभाजी महाराज येतील तुमच्या घरी, आम्ही आनंदाने म्हटलं हो हो...येऊ देत. आणि त्या क्षणी माझ्या मनात आलं – हो खरंच, माझ्या गर्भात वाढतंय ते माझं छोटं शूरवीर बाळ – माझा नटखट टीटू.
✍🏻वसुधा इंगळे.











