Friday, October 10, 2025

टीटू – माझ्या सहाव्या महिन्याची सफर

टिटू - माझ्या सहाव्या महिन्याची सफर


गर्भारपणाचा सहावा महिना सुरू झाला आहे. मागचे पाच महिने अगदी सुंदर गेले. टीटूने फारसा त्रास दिला नाही, उलट जणू पोटात मस्त खेळत, हसत आणि माझ्याशी संवाद साधत दिवस घालवत होता. डॉक्टरांनी काही गोष्टी टाळायला सांगितल्या होत्या, काही काटेकोरपणे पाळायला सांगितल्या होत्या, आणि त्या मी पूर्ण मनापासून पाळत गेले.


 


या महिन्यात टीटूच्या गुलाबीसर त्वचेवर हलका थर आला आहे. छोट्या रोमकूपांची निर्मिती होत होती. केस फुटायला लागले होते. बुद्धीचा विकास वेगाने होत होता. म्हणूनच मी रोज गणिताची कोडी सोडवत होती, विज्ञानाचे प्रयोग बघत होती सामान्यज्ञान वाचायची. मला माहीत आहे – हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचतंय.

महान व्यक्तींचं जीवनचरित्र वाचताना, त्यांच्या मालिका बघताना मी टीटूशी बोलते. “हे बाळा, तुला हे ऐकायला मजा येतेय ना? तू बुद्धिमान, विचारशील आणि विवेकी होशील.” मनातून एक वेगळीच शक्ती मिळायची. रोज भगवंताला प्रार्थना करायची, की माझं बाळ तेजस्वी बुद्धीचं, शुद्ध मनाचं आणि धैर्यवान होवो. मी रोज सुवर्णजल प्राशन करायची, पौष्टिक आहार घेत होती – सगळं त्याच्यासाठीच.


एक दिवस आम्ही  संभाजी महाराजांचा चित्रपट बघायला गेलो होतो. पडद्यावर त्यांचा पराक्रम पाहताना माझ्या पोटात अचानक हालचाल झाली. टीटू एवढा आनंदात हलला की मला जाणवलं . त्याला महाराजांची गाथा किती आवडली आहे!

तेवढ्यात ठरवलं “आपण संभाजी महाराजांच्या समाधीला भेट द्यायला जायचंच.”


डॉक्टरांची परवानगी घेतली. आई- पप्पा आणि राणु ला मुंबईवरून बोलावलं. महाराजांच्या समाधी बरोबरच अजून काही ठिकाण फिरायच ठरवलं. ड्रायव्हरला सांगितलं प्रवास अगदी हळूहळू करायचा.


 *भीमा-कोरेगावचा विजयस्तंभ*


प्रवासाचा पहिला टप्पा होता भीमा-कोरेगाव. विजयस्तंभासमोर उभी राहिले, पोटावर हात ठेवला आणि टीटूला सांगितलं –




“ही लढाई १८१८ साली झाली. महार सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला. हा विजय त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून दरवर्षी १ जानेवारीला हजारो लोक इथे येऊन आपल्या पूर्वजांना अभिवादन करतात.”

मी आणि तुझे डॅडी पण आठ वर्षापूर्वी विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आलो होतो. 

मी बोलत असताना पोटातल्या छोट्याशा हालचालीने मला कळलं – टीटू माझं प्रत्येक शब्द ऐकत आहे. नंतर फोटो काढले आणि निघालो पुढच्या टप्प्याकडे.

 

वढू बुद्रुक आणि तुळापूर – समाधी


“टीटूराव, आता आपण वढू ला आलो आहोत. इथेच छत्रपती संभाजी महाराजांची खरी समाधी आहे.” मी पोटावर हात ठेवून हलकेच सांगितलं.




 

इतिहास आठवताच डोळ्यांत पाणी आलं. स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांचा तुळापूर येथे छळ करून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. औरंगजेबाच्या भीतीने कुणीही त्याच्या शरीराचे तुकडे उचलायला धजावलं नाही. पण गावकरी गणपत महार यांनी धाडस केलं. त्यांनी तुकडे शिवले आणि वढू बुद्रुक येथे अंत्यसंस्कार केले.




ही कहाणी सांगताना टीटू हलकेच हलला. माझ्या अंगातून शहारे आले. *जणू तोही त्या क्षणात सहभागी होत होता.*



आळंदीची प्रसन्नता


शेवटी पोहोचलो आळंदीला. तो दिवस एकादशीचा होता. संपूर्ण परिसरात भक्तिरस दाटून आला होता. आळंदी हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जात आणि इंद्रायणी नदीच्या काठी आहे. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाणारे ठिकाण आहे. आळंदी च दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी.

मनातल्या मनात प्रार्थना केली –“माझं लेकरू बुद्धिमान, एकाग्र आणि विवेकी होवो. त्याची बुद्धी तेजस्वी राहो.”


परतीच्या प्रवासातील शांतता


आळंदी च दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी. गाडी मध्ये सगळे झोपी गेले, पण आम्हाला काही झोप येत नव्हती कारण टीटू काही हालचालच करत नव्हता. फक्त महाराजांच्या समाधी च्या ठिकाणी आम्ही गेलो तेव्हाच आणि तिथेच टीटू फक्त हालचाल करत होता. त्या नंतर टीटू ने एकदम मौन च धारण केलं. इकडे मी फुल टेन्शन मध्ये....


कारण कधी कधी टीटू बद्दल फार कोणाला काही सांगितलं तर टीटू असाच शांत होतो. हे माहित होत मला...

अहो मला सारखं विचारत होते काय झाल काय झाल शांत का झालीस तू...

त्यांना हळू सांगितलं टीटू एकदम शांत आहे. ते मला म्हणाले त्याला अफ़र्मेशन देत रहा.

पण त्याला किती ही अफ़र्मेशन दिल्या तरी काही तो माझं ऐकत नव्हता.


शेवटी घरी आलो फ्रेश झालो, आणि डॅडा ने माझ्या पोटावर हाथ ठेवून समजावलं तेव्हा कुठे टीटू थोड फार हालचाल करायला लागला.. मग रात्री आम्ही जेवण झाल्यावर शतपावली करायला गच्ची वर गेलो; तेव्हा टीटू ला फार बरं वाटलं. कारण तेव्हा फक्त मम्मा डॅडी आणि टीटू होते ना. तेव्हा कुठे आमच्या दोघांच्या ही जीवात जीव आला. मग टीटू ला चांदण्या आणि विमान दाखवून आम्ही खाली आलो आणि शांत झोपलो.

 

२६ जानेवारी – सलामी


दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी. कॉलनी मध्ये, किंवा जवळपास शाळेमध्ये कुठे झेंडावंदन होत नव्हतं. मग ठरवलं – आपणच घरी राष्ट्रगीत गाऊया. आम्ही उभे राहिलो, राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली.


आणि काय आश्चर्य! पोटातल्या टीटूने सलामी दिल्यासारखी हालचाल केली. माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्या क्षणी राष्ट्रगीताची ताकद नव्याने जाणवली.


     सोनोग्राफीचा चमत्कार


दुपारी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर सोनोग्राफी करत होते. स्क्रीनवर टीटू दिसला – उजवा हात हृदयावर ठेवून निवांत झोपलेला. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते, पण हृदयाचा फोटो घेता येत नव्हता.


ते शेवटी हसून म्हणाले –

“तुम्हीच तुमच्या बाळाला समजवा, नाहीतर कठीण आहे तपासणी करणं!”

मग आम्ही रूम च्या बाहेर आलो; मी हळूच पोटावर हात ठेवून म्हणाले –

“बाळा, डॉक्टर आंटीला तुझा छान फोटो काढायचाय गं, थोडा हात बाजूला कर हा आता” अस सांगून आम्ही पुन्हा सोनोग्राफी रूम मध्ये गेलो. 


आणि खरंच! काही सेकंदांत टीटूने हात बाजूला घेतला. सोनोग्राफी पूर्ण झाली. डॉक्टर थक्क झाले.

“काय सांगितलं तुम्ही? हे बाळ तर अगदी समजूतदार आहे!”


मी फक्त हसले. कारण मला ठाऊक होतं – गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यापासून मी रोज त्याला प्रेमळ अफर्मेशन्स देत होते. रोज गप्पा मारते. म्हणूनच टीटू आज इतका समजूतदार आहे – अजून जन्मही घेतलेला नाही, आणि आधीच मनाने किती जवळचा वाटतो.

ही होती माझ्या सहाव्या महिन्याची गोष्ट –

माझ्या पोटातील छोट्याशा जीवाशी साधलेला संवाद, इतिहासाच्या वाटेवर केलेला प्रवास, आणि प्रेमळ शब्दांनी फुलवलेली नाळ.


✍🏻 वसुधा इंगळे.

Saturday, October 4, 2025

आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली


आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली

मागच्या काही दिवसांतली एक धक्कादायक बातमी आपण सगळ्यांनीच ऐकली—एका आईने आपल्या १५ दिवसांच्या बाळाला रडत होतं म्हणून थेट फ्रिजमध्ये ठेवलं. देवाची कृपा म्हणून बाळ वाचलं. सुरुवातीला हे ऐकलं तेव्हा मन सुन्न झालं, पण नंतर जेव्हा समजलं की ती स्त्री *पोस्टपार्टम सायकॉसिस* या मानसिक आजाराशी झुंज देत होती, तेव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहिले.



आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा, कारण हा लेख माझ्या मैत्रिणीच्या आग्रहाने लिहितेय. अनुभव तिचा आहे, शब्दरचना माझी.


बाळ जन्मल्यानंतरचा काळ आईसाठी कसोटीचा असतो. बाळासाठी प्रेम, काळजी, माया या सगळ्यांची उधळण होते, पण बाळाच्या आईकडे लक्ष देण्याचं आपल्या समाजाला जणू विस्मरणच झालेलं असतं. गर्भावस्थेत जितकी आईची काळजी घेतली जाते, तितकीच प्रसूतीनंतर तिला बाजूला सारलं जातं.


आईचं शरीर शारीरिकदृष्ट्या नाजूक असतंच, पण तिचं मन अधिक अस्थिर असतं. हार्मोन्स, थकवा, झोपेची कमतरता आणि सततची जबाबदारी—या सगळ्यामुळे ती तुटत चाललेली असते. पण तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच दोष दिला जातो.


“आम्ही नाही का लेकरं केली? तुम्हालाच लेकरं झाली का?”

“बाळ आजारी आहे म्हणजे आईकडून काहीतरी चुकलं असेल.”

“बाळ बारिक दिसतंय, म्हणजे आईनं नीट काळजी घेतली नाही.”

“तू जाड झालीस, चेहऱ्यावर बदल दिसतोय.”


अशा टोमण्यांनी तिचं मन आणखी खचवलं जातं. तिची चिडचिड झाली तरी तिच्यावरच ओरडल जात. तिच्या मानसिक आरोग्याची काळजी मात्र कुणीच घेत नाही—कधी माहेरचेही तिला समजून घेत नाहीत. तिला सगळ्यात जास्त अपेक्षा माहेरून असते; कारण ते आपले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे असतात.


पण हेच खरं आहे की, अशा अवस्थेतही आई तग धरून राहते—फक्त आपल्या बाळासाठी. बाळ तिच्यासाठी पूर्ण विश्व बनतं. ती झगडते, रडते, खचते, पण शेवटी उभी राहते. आणि जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी ती कणखर होत जाते—इतकी कणखर की नंतर तिला कुठल्याही टीकेचा फरक पडत नाही.


पण एक गोष्ट ती कायम लक्षात ठेवते—त्या कठीण काळात कुणी तिची साथ दिली आणि कुणी जखम केली. हाच अनुभव तिच्या पुढच्या आयुष्याचा पाया ठरतो.


*तुम्ही आईला कशी मदत करू शकता?*


* आईला दोष देण्याऐवजी तिचं ऐका आणि समजून घ्या.

* तिच्या थकव्याला, निराशेला कमी लेखू नका. तिला बोलू द्या.

* बाळाची जबाबदारी वाटून घ्या—झोपवणं, पाजणं, डायपर बदलणं.

* तिच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबद्दल काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

* कुठलीही समस्या जास्त गंभीर वाटली तर तिला तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा.

* “तू आई झालीस म्हणजे आता सगळं तुझ्यावर” अशी अपेक्षा ठेवू नका. तिच्यासाठीही ती *नवीन भूमिका* आहे.


आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नव्हे; तर त्या काळातल्या तिच्या मानसिक प्रवासाला समजून घेणं आणि तिला जपणं हे समाजाचंही कर्तव्य आहे. कारण, बाळाला सांभाळणारी आई जर मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसेल, तर बाळाचं आयुष्यही खऱ्या अर्थानं सुरक्षित राहू शकत नाही.


✨ **प्रेरणादायी शेवट**

आई म्हणजे फक्त जीव देणारी नाही, तर जीवाला उभारी देणारी ताकद आहे. तिच्या मनाला थोडं समजून घेतलं, तिच्यावर थोडं प्रेम ओतलं, तर ती स्वतःलाही आणि बाळालाही नव्या जगाला सामोरं जाण्याची खरी शक्ती देते. 🌸



*“बाळाचं रडणं सगळ्यांना ऐकू येतं, पण आईच्या मनाचं रडणं क्वचित कुणाला जाणवतं.”*


✍🏻वसुधा इंगळे.

Tuesday, September 16, 2025

वर्षावासाचा अनुभव

 **वर्षावासाचा अनुभव**


वर्षावास महिना सुरू झाला होता. मनात खूप दिवसांपासून इच्छा होती की, या वेळी एखाद्या विहारात जाऊन कार्यक्रमात सहभागी व्हावं. माहेरी मोठा विहार आहे, तिथे वर्षावासाचे सण, प्रवचनं, कार्यक्रम उपासक-उपासिका एकत्र येऊन साजरे करतात.



लग्नानंतर पहिल्यांदाच मी माझ्या लेकीला—तीर्थाला—विहारात घेऊन जाण्याचा योग आला. प्रवास छान झाला; गाडीत तीर्था गोड झोपली सुद्धा. घरी पोहोचलो तेव्हा मस्त खेळली. शेजारी राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला ही नुकतंच बाळ झालं होतं, तिला भेटून गप्पा मारल्या. तीर्था तिथेही खेळली आणि सगळ्यांना खुश केल.


थोड्या वेळाने आम्ही—मी, तीर्था आणि वाहिनी—सगळे विहारात गेलो. तिथे पोहोचल्यावर लोकांची गर्दी पाहून तीर्था थोडी कुरकुर करू लागली. खूप लोकांमध्ये जाण्याची तिला अजून सवय नव्हती. तरीसुद्धा तिच्या हातून विहाराला "धम्मदान" दिलं, आणि सगळ्यांनी तिला गोड गोड आशीर्वाद दिले. तो क्षण मनाला अगदी भारावून टाकणारा होता.




कार्यक्रमानंतर आम्ही घरी यायला ऑनलाइन गाडी बुक केली. ड्रायव्हरला आधीच सांगितलं होतं—

*"भैया, छोटा बेबी है मेरे पास, जरा आराम से चलाना…"*


पण त्याने ऐकलं कुठं! पहिल्याच वळणावर जोरात ब्रेक मारला. मी घाबरून पुन्हा सांगितलं—

*"भैया, थोड़ा ध्यान से, बच्चा है…"*


पुढच्या काही मिनिटांत तर तो नुसता फोनवर आपल्या बायकोशी की प्रेयसीशी, देव जाणे, कुणाशी तरी सौम्य आवाजात भांडू लागला. आणि म्हणे,

*"ई तोहार टेन्शन में हम इक दिन गाड़ी ठोक देंगे!"*


हे ऐकून अंगावर सर्रकन काटा आला. मनात आलं—आता काय करू? उतरून दुसरी गाडी घ्यावी का? हा तर आपल्याला विनातिकीट विमानाशिवाय आकाशात पाठवेल ? अगदी वाटलं, की मीच गाडी चालवावी; पण सोबत तीर्था होती आणि शिवाय मला गाडी चालवता येत नाही. 

असा झाला आमचा हा गोड आणि थोडा काळजीत टाकणारा प्रवास😰


✍️ *वसुधा इंगळे*

Wednesday, September 10, 2025

माझा नटखट टीटू

 माझा नटखट टीटू 


आता आपली गाडी स्टेशन नंबर 5 वर आली आहे. म्हणजे आपल्या गर्भयात्रेचा पाचवा महिना सुरु झाला आहे. वेळ पुढे जात आहे तशी तुझी समजण्याची शक्ती, चतुराई आणि नविन नविन शिकायच्या - गोष्टी यांची क्षमता सुध्दा वाढत जात आहे. आता तुझे डॅडी माझ्या पोटावर कान ठेवुन तुझ्या हृदयाचे ठोके सुध्दा ऐकतात. बर का! 



आता तुझा चांगला विकास ही झाला आहे. तुझ्या हृदयाचे ठोके माझ्या आत मला जाणवतात. आणि हाच विचार मला खूप आनंद देतो.

तुझे छोटे छोटे प्रेमळ डोळे आता पूर्णपणे विकसित झालेले आहेत. तुझे डोळे खूप सुंदर ताऱ्यांप्रमाने चमकत आहेत. लहान-लहान बोटे, लाल-लाल ओठ छोटेस नाजूक नाक! जणू काही सपूर्ण विश्वाच सौंदर्य माझ्या गर्भात उमलत आहे अस वाटत.


या महिन्यात तुझं वजन खूप चांगल्या पध्दतीनं वाढलं आहे. बघ ना ! माझा बेबीबंम दिसायला लाग‌ला आहे. ज्यामुळे सगळ्यांना कळले आहे की, मी गर्भवती आहे. लोंकाकडून मिळालेल्या शुभेच्छा तुला ऐकू येत आहेत ना? 

मला माहित आहे माझा स्पर्श आणि गोड गोड गोष्टी तुला खूप खूप आवडतात. माझ्या पोटावर हात ठेवुन मी आणि डॅडी तुला अंगाई गातो. तू पण लक्ष देऊन ऐकतो !



रोज तुझ्यासाठी नवीन काही तरी करायचं, किंवा तुला नवीन कोणत्या तरी गोष्टी ची ओळख करून द्यायची अस ठरवलं होत. जस की आज "टीटू" ही भाजी बनवली आहे. भाजी कोणत्या रंगाची आहे माहित आहे का तुला?

किंवा आज भगवंताची पूजा करताना कोणत्या कोणत्या रंगाची फुल घेतली त्या रंगाची तुला नाव सांगू का? आणि फुलांची नाव पण सांगते!!

असा रोजचा दिनक्रम होता. प्रत्येक गोष्ट तुला सांगायची. कारण तू आता मला प्रतिसाद देत होतास हलकेच पोटात हालचाल करून.


डॉक्टर ने सांगितलं होत तुम्ही थोड फार - पण जास्त लांब नाही, अस फिरायला जाऊ शकतात. 

मग आम्ही त्या संधी का सोडायचा! मग पुण्यामध्ये असल्यामुळे पुन्हा कधी संधी मिळेल "आर्मी दिवसाचे प्रदर्शन" बघण्याची, किंवा खास तेच बघण्यासाठी पुण्याला जाण्याची, मग संधी च सोन करूया या विचारणे आम्ही "आर्मी दिवसाचे प्रदर्शन" बघायला गेलो. आणि तुझ्या सोबत एक नवीन आठवण तयार केली. तू खूप सुंदर प्रतिसाद देतोस मला म्हणून हे सगळ शक्य होत. नाही तर मला पण तुला घेऊन घरीच रहाव लागलं असत. तुला फिरायला आवडल आणि तू मला तुला आवडलेल्या गोष्टी आहेत याचा वेळोवेळी संकेत देत आहेस. म्हणून मी तुझ्या सोबत माझ्या गरोदर पानाचा प्रवास अजून मजेशीर करायचा अस ठरवलं आहे.



माझी सात वर्षा पासून सगळ्यात आवडती मालिका म्हणजे "स्वराज्य रक्षक संभाजी"  मालिका जवळ जवळ मी १०ते १२ वेळा पाहिली आहे, आणि आता तू पोटात असताना देखील "सावित्री ज्योती",  "डॉ.बाबासाहेब आंबेडकर", अशा वेगवेगळ्या मालिका बघते. पण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघताना देखील तू मला काही भावनिक प्रसंग असतील तर वेगळी हालचाल किंवा महाराजाचे काही गनिमी कावे असतील तर वेगळी हालचाल करतोस.  नेमक त्या वेळी एक चित्रपट आला, "धर्मवीर संभाजी महाराज", मग हा चित्रपट न बघून कस चालेल, मग तुझे डॅडी सहज रात्री शतपावली करताना म्हणाले "टीटूराव" जायचं का महाराजांचा चित्रपट बघायला, आणि त्या क्षणापासून रात्री दोन वाजे पर्यंत तुझी पोटामध्ये "अफजलखान, शाहिस्तेखान, औरंगजेब," अजून काय माहित कोणा सोबत "लढाई" चालू झाली, ती संपता संपत नव्हती. शेवटी तुझे डॅडी आणि मी तुझ्या साठी अंगाई गीत गाऊ लागलो, " गाई गाई बाळा झोपी जाई" .


सकाळी उठून म्हटलं बाळा ला नेल पाहिजे चित्रपट बघायला, त्याला आवडेल आणि महाराजांचा इतिहास ही कळेल. मग एक दिवस आम्ही गेलो चित्रपट गृहात, चित्रपट बघायला बाळ माझं १५ मिनिट पण शांत राहील नाही, पोटात त्याची पुन्हा कोणासोबत लढाई चालू झाली हे त्यालाच माहित. शेवटी काही वेळ बाहेर आले जेणे करून बाळ शांत होईल, पण कसलं काय टीटू कदाचित "स्वराज्याचे गुप्तहेर", "बहिर्जी नाईक" यांच्यासोबत मसलती आणि खलबत करत असेल आतमध्ये. जेणे करून मी आताच कोणता तरी गनिमी कावा वापरून मम्मा च्या पोटातून बाहेर येतो.

 चित्रपट बघायला आलेल्या एक काकू पण म्हणाल्या संभाजी महाराज येतील तुमच्या घरी, आम्ही आनंदाने म्हटलं हो हो...येऊ देत. आणि त्या क्षणी माझ्या मनात आलं – हो खरंच, माझ्या गर्भात वाढतंय ते माझं छोटं शूरवीर बाळ – माझा नटखट टीटू.


✍🏻वसुधा इंगळे.

Thursday, September 4, 2025

शिक्षक दिन

 शिक्षक दिन... !



 

आजच्या वेगवान युगात, Google सगळी उत्तर देतो..! पण योग्य प्रश्न विचारायला शिकवणारे शिक्षक, शिकता शिकता उत्तरे शोधायला लावणारे शिक्षकचं असतात...! पुस्तकं ज्ञान देतात... पण ते ज्ञान आयुष्याशी जोडून जगायला शिकवणार शिक्षकच असतात...!


खरा शिक्षक तोच - जो फक्त गणित, इतिहास, विज्ञान शिकवत नाही, तर संकटात कसं उभं राहायचं, अपयश आलं तरी कसं लढायचं, आणि आयुष्य जगतांना स्वाभीमान, प्रामाणिकपणा, आणि माणुसकी कशी जपायची हे शिकवतो...


आज आपण जे काही आहोत, ते आपल्या पालकानंतर जर कोणी घडवल असेल तर ते आपले "गुरुजन"...!


म्हणूनच शिकवणारे शिक्षक कायम लक्षात राहतात... या शिक्षकदिनाला औपचारिकता नाही तर कृतज्ञतेचा दिवस म्हणून सर्व शिक्षकांना सांगायच आहे कि... "आपण फक्त विषय नाही शिकवले तर आयुष्य शिकवले.." आणि म्हणूनच तुम्ही कायम आमच्या आदरणीय व्यक्ती आहात...!


"शिक्षक दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..."

✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...