राजमाता जिजाऊ
ज्यांनी घडविला,
महाराष्ट्राचा भाग्यविधाता,
धन्य त्या थोर,
जिजाऊ राजमाता !
आज १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस, प्रथम या थोर जिजाऊ आईसाहेबांना माझा मानाचा मुजरा ! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणा-या जिजाऊ आदर्श राजमाता होत्या.
जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयात त्यांचा विवाह शूर, पराक्रमी वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
राजमाता जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा अनमोल खजिना होता. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तत्व या तीन गुणांचा सुरेख संगम त्याच्यांत झालेला होता. त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते.
हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. लहानपणी शिवबांना रामायण तसेच महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या, शिक्षणाबरोबरच त्यांनी शिवबांना तलवार बाजी व युद्धकौशल्यही स्वतः शिकवले.
शिवरायांचे व्यक्तिमत्त्व आदर्श घडवले. राजमाता जिजाऊ, ह्या शिवरायांच्या आदयगुरू होत्या. त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी जिजाऊंनी खंबीर मार्गदर्शन केले.
शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा कैद व सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांचा सामना करण्याची प्रेरणा त्यांनी शिवाजी राजेंना दिली.
जिजाऊ गोरगरीब, सामान्य जनतेच्या माऊली आणि सावली होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना रयतेचा तसेच स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून तयार केले. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक पाहून जिजाऊ माऊली खुश झाल्या.
यानंतर १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी पाचाड या गावी आपले जीवन- कार्य संपवले व स्वर्गाची वाट धरली. राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहान रोपट्याचा वटवृक्ष झाला. अशा या थोर राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम !
धन्यवाद !
जय जिजाऊ, जय शिवराय,
जय महाराष्ट
✍️वसुधा इंगळे

No comments:
Post a Comment