Sunday, July 13, 2025

डोहाळे जेवण

 आई होण्याच्या चाहुलीतील गोड आठवण –


आई होणं ही एक विलक्षण भावना आहे – नव्या जीवनाची चाहूल आणि एका स्त्रीच्या आयुष्यातील नवं पर्व. माझ्यासाठी या सुंदर प्रवासातला सर्वात खास दिवस म्हणजे माझं डोहाळे जेवण.


त्या दिवशीचा उत्साह अजूनही मनात तसाच ताजातवाना आहे. हिरवी साडी नेसलेली, हिरवा चुडा घातलेला, चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश – मी अक्षरशः तेजस्वी दिसत होते. त्या दिवसाची तयारी काही साधी नव्हती, कारण ही केवळ एक परंपरा नव्हती, तर माझ्या मातृत्वाच्या सुरुवातीची गोड साक्ष होती.


सगळ्यांना अजून आठवतंय – “झिंगाट” गाण्यावर माझा आणि नरेनचा एकदम धम्माल डान्स! लग्नातसुद्धा इतकी धमाल केली नव्हती, जितकी डोहाळे जेवणाला केली. आम्ही नुसतं नाचलो नाही, तर त्या क्षणाला जिवंत केलं. सगळे पाहुणे हसत होते, टाळ्या वाजवत होते – आणि आम्ही त्या आनंदात न्हालो होतो.


मग आला माझा खास उखाणा –

"रायगड किल्याचे पहिले नाव होते रायरी,

आहोन सोबत सुरू करते संसाराची पहिली पायरी,

आमच्या आनंदावर नाही राहिला ताबा,

सप्टेंबरमध्ये समजले मी होणार आई आणि हे होणार बाबा."


हा उखाणा घेताना माझ्या बाळाने पोटात मस्ती केली – आणि मी अर्धा उखाणा विसरले! पण त्या हास्यातच सगळं काही होतं – माझं आई होणं, नरेनचं बाबा होणं, आणि त्या छोट्याशा जीवाचं आमच्या आयुष्यात येणं.


"आता पर्यंत च्या प्रेमात यांनी पडू दिली नाही कसली कमी, काय माहित कोण येणार – थोर भीमबा की आमची रमाई!"


सगळ्यांना इतका मजेशीर वाटला हा उखाणा की टाळ्यांचा वर्षाव झाला. शेवटी हसत-हसत विचारलं – 

"नरेन राव सांगा आता काय उचलू – बर्फी की पेढा?"


त्या दिवसातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे – डान्स, उखाणे, मस्ती, आणि बाळाची चाहूल... सगळं एकत्र मिळून बनलं आहे माझ्या जीवनातलं एक सोन्यासारखं पान.


✍🏻वसुधा इंगळे.

8 comments:

  1. Khupach sundar lihtes Vasudha.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद, अभिप्राय दिल्या बद्दल, असच प्रेम असू द्या, तुम्ही दिलेल्या कमेंट्स च्या माध्यमातून, आपल्या कामाची पोचपावती मिळते.

      Delete
  2. Ukhana ek number

    ReplyDelete
  3. Congratulations 💐💐

    ReplyDelete

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...