एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत 🌼
काही प्रवास नकाशावर आखलेले नसतात…ते मनात घडतात, भावनांतून जन्म घेतात आणि श्रद्धेपर्यंत पोहोचतात.
लहान बाळाला घेऊन पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करण्याचा विचार आला, तेव्हा आनंदापेक्षा भीतीच जास्त होती. गर्दी, गोंगाट, नवीन चेहरे—हे सगळं तिच्या लहानशा मनाला कसं झेपेल, याचीच काळजी होती. पण कधी कधी मनातल्या शंका बाजूला ठेवून फक्त विश्वासावर पाऊल टाकायचं असतं.
हा ब्लॉग अशाच एका छोट्याशा प्रवासाची कथा आहे—
आईच्या मनातल्या श्रद्धेची, बाळाच्या निरागसतेची,आणि दादर चैत्यभूमीच्या शांततेची.
एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत 🌼
आम्हाला आमच्या लहानशा मुलीला घेऊन ट्रेनने प्रवास करायचा होता. पण प्रवासापेक्षा जास्त गोंधळ मनात होता.
गर्दी बघून ती रडेल का?
ट्रेनमध्ये बसल्यावर अस्वस्थ होईल का?
प्रवास अर्धवट सोडावा लागेल का?
कारण ती अजून खूपच लहान आहे. नवीन चेहेरे, नवीन जागा दिसल्या की लगेच रडते. आजवर तिने मला एकही दिवस माहेरी थांबू दिल नाही—तो विषय वेगळा, पण तिच्या स्वभावाची ओळख देणारा नक्कीच.
माझ्या प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यातली एक आठवण मात्र कायम मनात कोरली गेली आहे. सोनोग्राफी करताना स्क्रीनवर बाळाने हाताची 👌🏻 अशी मुद्रा केली होती—अगदी तथागत गौतम बुद्धांच्या मुद्रेसारखी. तो क्षण पाहून आम्ही दोघेही काही क्षण स्तब्ध झालो होतो.
त्याच काळात माहेरी झालेल्या गर्भमंगल संस्कार विधीत, मी डोळे बंद करून हात जोडले होते. त्या वेळी मला एक विलक्षण भास झाला—जणू माझं बाळ माझ्या मांडीवर बसून शांतपणे हात जोडून 🙏🏻बसलं आहे.
या दोन प्रसंगांनी मनात एक हळुवार भावना रुजली—हे बाळ कधीतरी मला पॅगोडा किंवा दादर चैत्यभूमीपर्यंत नक्की घेऊन जाईल.
ती खूप लहान असल्यामुळे हा विचार मी नेहमी मनातच ठेवला. पण अचानक एक दिवस वाटलं—जाऊया. रडली तर तिथूनच परत येऊ. श्रद्धेला वेळेची अट नसते.
आज तीर्था साडेसात महिन्यांची आहे. ती आता स्वतः बसते, पालथी पडते, खेळताना रांगते. आणि जेव्हा एका कुशीवर विसावते, तेव्हा तिची ती मुद्रा मला नेहमी तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची आठवण करून देते.
मग ठरवलं—आज तीर्थाला दादर चैत्यभूमीला घेऊन जायचंच.
ट्रेनमध्ये ती आधी शांत होती. नंतर आजूबाजूचं सगळं कुतूहलाने पाहत होती. नवीन दृश्यं, नवीन आवाज… जणू सगळं काही ती मनापासून स्वीकारत होती.
चैत्यभूमीला पोहोचताच तीर्था गाढ झोपली.
आम्ही दोघांनी शांतपणे दर्शन घेतलं. थोडी गर्दी होती, पण मनात मात्र विलक्षण शांतता, आणि सकारात्मक ऊर्जा होती. दर्शन घेऊन बाहेर आलो, थोडा वेळ थांबलो… पण तीर्था काही उठेना. शेवटी ठरवलं—आता निघूया. एखादं पुस्तक पाहू, आवडलं तर घेऊ आणि परत जाऊ.
पण ज्या साठी आलो होतो, जिच्या साठी आलो होतो, तो क्षण अपूर्ण कसा राहील?
तीर्था जागी झाली.
मग आम्ही पुन्हा आत गेलो. तिला थोडं निवांत होऊ दिलं, खाऊ घातला. आजूबाजूच्या मुलांकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिचा मूड खुलला… आणि आमचं मनही.
दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.
आत गेल्यावर जेव्हा तिला खाली बसवलं, तेव्हा तीर्था गुडघ्यांवर येऊन स्थिर झाली—जणू तिच्या लहानशा देहबोलीतून नतमस्तक होण्याची भावना व्यक्त होत होती.
आम्ही तीन वेळा पंचांग प्रणाम करत असतानाही ती तशीच होती…
जणू तीही त्या शांततेला वंदन करत होती.
तो क्षण पाहून आम्ही दोघेही शब्दावाचून भरून आलो.
तीर्थाच्या हातून भंतेना दान दिलं.
काही आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या.
आणि मनात खोल, निर्मळ समाधान घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
काही प्रवास अंतराचे नसतात…
ते श्रद्धेचे असतात, भावनांचे असतात, आणि अंतर्मनाला स्पर्श करणारे असतात.
हा प्रवास एक लहान पावलांचा, पण फार खोलवर जाणारा. 🙏🌼
आज मागे वळून पाहिलं, तर जाणवतं—हा फक्त एक प्रवास नव्हता.
तो सकारात्मक ऊर्जेचा होता.
विश्वासाचा होता.
आणि आई–वडील आणि मुलीच्या नात्यात आणखी एक सुंदर धागा गुंफणारा होता.
तीर्थाला काही कळत नव्हतं…
पण तरीही तिच्या लहानशा हालचालींमधून, तिच्या शांततेतून, त्या जागेचा आदर व्यक्त होत होता.
आणि ते पाहताना आमचं मन नकळत नतमस्तक झालं.
कधी कधी देव, धम्म किंवा श्रद्धा मोठ्या शब्दांत नाही तर अशा छोट्या क्षणांत भेटते—
बाळाच्या झोपेत,
त्याच्या हसण्यात,
आणि आपल्या मनात उमटणाऱ्या शांततेत.
हा प्रवास आम्हाला हेच शिकवून गेला—
जेव्हा भावना खरी असते,
तेव्हा वय, वेळ किंवा परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही.
✍🏻वसुधा इंगळे.




Nice
ReplyDeleteमनापासून आभारी आहे
Delete