Sunday, January 4, 2026

एक क्षण, एक भेट… आणि आयुष्यभराची आठवण

 एक क्षण, एक भेट… आणि आयुष्यभराची आठवण


🪷 प्रस्तावना

काही आठवणी अशा असतात ज्या कोणतीही पूर्वकल्पना न देता आपल्या आयुष्यात येतात. त्या क्षणी त्या साध्या वाटतात, अगदी क्षणिक… पण काळ पुढे जातो तसे त्यांचं महत्त्व अधिकच वाढत जातं. आयुष्याच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण काही भेटी, काही चेहरे आणि काही भावना मात्र मनाच्या कोपऱ्यात कायमच्या घर करून बसतात. हा ब्लॉग अशाच एका अनपेक्षित भेटीचा आहे—प्रवासात घडलेल्या, पण मनात खोलवर रुजलेल्या एका अनुभवाचा.




२०२४ साली मी आणि माझे पती दोघंही फिरण्यासाठी गणपती पुळे येथे गेलो होतो. सोबत सिंधुदुर्ग किल्ला पाहायचा असा आमचा बेत होता. प्रवासाचा उत्साह, समुद्राची चाहूल आणि देवदर्शनाची ओढ—सगळं अगदी मनासारखं सुरू होतं.

गणपती पुळे येथे दर्शनासाठी रांगेत उभे असताना एका शाळेची सहल आमच्या समोर आली. विशेष बाब म्हणजे त्या सहलीतील सगळी मुलं मूक-बधिर होती. त्यांच्या सोबत त्यांचे शिक्षक होते. ते दृश्य पाहून नकळत मन थांबलं. ती मुलं शांतपणे, शिस्तीत उभी होती. त्यांच्या डोळ्यांत उत्सुकता होती, आनंद होता, पण शब्द नव्हते.

न राहवून मी त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधला.

कुठून आलात?

शाळा कोणती आहे?

मुलं किती आहेत?

असे अनेक प्रश्न मी विचारले. तेव्हा कळलं की ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील “मूक बधिर निवासी शाळा” आहे. त्यांच्या उत्तरांत साधेपणा होता, पण त्यांच्या कामात खूप मोठं योगदान असल्याची जाणीव होत होती.

दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि त्या मुलांच्या सोबत फोटो सुद्धा काढले. तो एक छोटासा क्षण… जणू तिथेच संपला असं वाटलं. आम्ही पुढे आमच्या प्रवासाला निघालो. आयुष्यात असे अनेक क्षण येतात आणि जातात—हा सुद्धा तसाच एक क्षण असेल, असं वाटलं होतं.

पण आज, तब्बल दोन वर्षांनंतर, अचानक इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना त्या शाळेचीच प्रोफाईल दिसली. क्षणभर थांबले. मनात जुन्या आठवणींनी गर्दी केली. न राहवून मी लगेच मेसेज केला—

की मी २०२४ साली गणपती पुळे येथे सहलीदरम्यान या मुलांना भेटले होते.

आणि योगायोग बघा…

मला लगेच रिप्लाय सुद्धा आला.

त्यांना मी मेसेज केला, याचं त्यांना खूप छान वाटलं. आणि मला सुद्धा. त्या काही ओळींच्या संवादात एक आपुलकी होती, ओळखीची भावना होती.

मग मी दोन वर्षांपूर्वी त्या मुलांच्या सोबत काढलेले फोटो शोधायला लागले. फोटो सापडले आणि पाहताच मन अक्षरशः भरून आलं. तेच चेहरे, तेच हसू, तोच क्षण… सगळं पुन्हा जिवंत झालं. मी ते फोटो लगेच त्यांना पाठवले.

त्यांचाही लगेच रिप्लाय आला—

“मी हे फोटो मुलांना दाखवले… आणि मुलांना खूप आनंद झाला.”

हे वाचून मन खूपच भरून आलं. एका साध्या भेटीची, एका क्षणाची आठवण दोन वर्षांनंतरही जपली गेली होती. ती फक्त माझ्याच मनात नव्हती, तर समोरच्याच्याही मनात तितकीच जिवंत होती.










🌿 निष्कर्ष

आजच्या धावपळीच्या आणि विसराळू जगात, माणसं माणसांना पटकन विसरतात. नातेसंबंध क्षणिक होतात आणि आठवणी सोशल मीडियाच्या गर्दीत हरवून जातात. अशा काळात दोन वर्षांपूर्वीची एक साधी भेट, काही फोटो आणि थोडासा संवाद आजही जपला गेला आहे, ही गोष्ट खूप काही सांगून जाते.

मूक असलेली ती मुलं शब्दांत बोलत नसली, तरी त्यांच्या आनंदात, त्यांच्या हसण्यात आणि त्या आठवणी जपण्याच्या भावनेत खूप काही बोलकं होतं. कधी कधी आयुष्यात भेटलेली माणसं आपली नसतात, तरीही ती आपल्या मनाची होऊन जातात.

खरंच,

काही भेटी क्षणभरासाठी असतात…

पण त्या आठवणी आयुष्यभरासाठी देऊन जा


✍🏻वसुधा इंगळे.



No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...