Wednesday, February 1, 2023

मच्छिन्द्र टिंगरे

वेश्या नावाची आई......

पोरानं आईला विष पाजलं, अन आईनं पोराला अमृत.....


बारामतीतं घडलेली  सत्य घटना.... संबंधिताच्या परवानगीने शेअर करतं आहे.... याबद्दल कोणाला माहिती असल्यास कोणी.. नावं, गावं, किंवा ओळख निर्माण होईल अशी कमेंट करू नये...


गेल्या महिन्याभरापासून माझ्याकडे एक मॅटर चालु होतं काल त्याचा आनंददायी शेवट झाला.... साधारण एकमहिन्यापूर्वी एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या... त्यांनी मला सांगितले साहेब पोरगं मला सोडून गेलंय मला बोलतं नाही मी एकटी राहते ... मी सगळी घटना समजून घेतली... त्या मावशीने मला जी हकीकत सांगितली ती ऐकून शहारे आले.....त्यांनी सांगितले मला एकचं मुलगा आहे.... माझ्या नवऱ्याचा मुलगा दोन वर्षाचा अपघाती मृत्यू झाला... मी सासरीच राहत होते.. काही काळ गेल्यानंतर मी एकटी असल्याचा फायदा घेत घरातल्या सहित काही पुरुषांची वाईट नजर माझ्यावर पडत होती... मी जर आयुष्यात कोणाला तरी स्थान दिल असतं तर, माझ्या मुलाच्या अन माझ्या प्रेमात अंतर पडलं असतं... माझ्या मुलाला मला काहीतरी घडवून दाखवायचं आहे...... असं चंग बांधून घरं सोडलं अन बारामतीतं रहायला आले..... काही दिवस माहेरच्या लोकांनी साथ दिली परंतू नंतर त्यांच्या अडचणीमुळे ते फारशी मदत करू शकले नाहीत....मुलाचं शिक्षण झालं ग्रॅज्युशन झाल्यावर.. त्याला एम. पी. एस.सी.चा अभ्यास करायचा होता.... मला काही लोकांनी सांगितले त्याला पुण्याला ठेवला तर चांगला अभ्यास होईल... मी काही ओळखीच्या लोकांकडून उसणवारी चे पैसे घेऊन त्याला पाठवलं....


त्या काळात त्याची परीक्षा झाली तो पास झाला... तो लिपिक म्हणून नोकरीला लागला... पण दरम्यान च्या काळात मी बारामतीत एकटी राहत होते... मुलाला माझ्याबद्दल कोणीतरी चुकीचं सांगितले.... आईला एकांत भेटावां म्हणून तुला तिने पुण्याला पाठवलं होतं असा गैरसमज त्याच्या मनात कोणीतरी भरवला.... त्याने माझ्याशी वाद घालायला सुरवात केली.... माझे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत असा समज त्याच्या मनात घरं करून बसला होता.... आमचा वाद विकोपाला गेला.... मला तो तू वेश्या आहॆस असं ही म्हटला...एक दिवशी त्याने विषाची बाटली आणून आत्महत्या कर असे सांगितले......मला त्याने विष प्यायला भाग पाडलं.... पण काही लोकांनी दवाखान्यात घेऊन गेले..... तेथे पोलीस माझे जबाब घ्यायला आले.... मी खरं सांगितले असतं तर त्याचं करियर उधवस्त झालं असतं म्हणून मी पोलिसांना मीच आजरपणाला कंटाळले होती म्हणून मी विष घेतलं असं सांगितले..... आता तो नोकरीं करतोय.... लग्न ही झालयं...मला त्याच्याकडे जायचंय काही करुन त्याला समजून सांगा असं मला विनंती केली......

मी त्यांचा नंबर घेतला.... फोन केला.. मी मच्छिन्द्र टिंगरे बोलतोय.. मला तुम्हाला भेटायचं आहे... कधी भेट होईल.. तो म्हणाला सर मी तुम्हाला ओळखतो... काय कामं होत... मी त्याला म्हटलं भेटल्यावर बोलू म्हटलं... नवरा बायको दोघे या असं म्हटलं..... गेल्या आठवड्यात दोघेजण माझ्याकडे आले.. आम्ही माझ्या ऑफिस ला बसलो.... योगायोगाने त्याची पत्नी पण मला ओळखत होती.... ती मला म्हटली सर तुम्ही आमच्या शाळेत आला होता.. पर्यावरण विषयावर तुमच व्याख्यान होतं..... ती ओळखिची निघाल्यावर माझं कामं सोपं झालं...

मी तिला बाजूला घेतलं तिला म्हटलं हा जर स्वतःच्या आईवर संशय घेतोय तरी उद्या तुझं काय चुकलं तरकाय होईल..... काही तासाच्या चर्चेनंतर मुलाला स्वतःची चूक कळाली....मला काही वेळा त्याला धमकी पण द्यावी लागली... तो आईला घेऊन जायला तयार झाला तेथूनच आई त्यांच्याबरोबर मुलाकडे चालली होती..... सगळेजण बाहेर पडले आई घाई गडबडीत माघारी आली पर्स मधून पाचशेच्या काही नोटा बाहेर काढल्या अन म्हणाली सर तुमची फी घ्या.... मी हसून म्हणालो आयुष्यात खूप कामं केलीत... आज आयुष्यातील सगळ्यात चांगल कामं हातून घडलंय फी नको पण पुण्याला आल्यावर तुमच्याकडे नक्की जेवायला येईल... डोळ्याच्या कडा पानावलेली आई.... मुलाबरोबर निघून गेली... खूप समाधान वाटलं...मी एका प्रॉब्लेम सॉल केला या पेक्षा हे आई नावाचं रसायन काय असतं हे कोडं या जन्मात तरी सुटणार नाही....


मच्छिन्द्र टिंगरे बारामती...9527547547


टीप : अनेक जन माझा लेख व्हायरल करतात परंतू नावं नंबर काढल्यामुळे.. मी जर अजून कोणाला मदत करू शकलो तर त्या लोकांना माझा संपर्क होतं नाही कृपया.. शेअर करताना... जसाच्या तसा करा...

Sunday, January 29, 2023

वपु काळे

 संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधनं ही वयानुरूप आणि काळानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही.


पण संसार टिकतो तो कसा ? तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होत, तेव्हा घर उभं राहतं


✒️ वपु काळे | वपुर्झा

रतनजी टाटा


 *“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."*


जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: "सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला ,  ती आठवण सांगाल का"?


रतनजी टाटा म्हणाले: "मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला."


पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.


मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.


त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.


चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.


पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”


मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.


मुलाने म्हटले: "मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन."


वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?


*कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

Saturday, January 28, 2023

सामाजिक नीतिमत्ता

 पहिल्या बायकोला मुलं होत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी दुसरी बायको केलेली आणि दोघी सोबत राहत असलेली उदाहरणं पाहिली,

काही ठिकाणी तर पहिल्या बायकोच्या बहिणी सोबत सुद्धा नवा संसार थाटलेला पाहिल आहे.

आणि हो आपला समाज हे सगळं मोठ्या मनाने स्वीकारतो..

बरेचदा तर बायकोशी पटत नाही म्हणून सुद्धा दुसरी करतात. म्हणजे बघा स्त्री ला काय किंमत उरली यावरून ???

याच्या उलट जर हेच कारनामे एखाद्या स्त्री ने केले, दोन-दोन नवरे एकाच घरात ???

हाच समाज तोंडात शेण घालेल ना??

स्त्री म्हणजे नेमकं काय आहे ?खेळणं असत का???

आनी असल्या पुरुषांना मात्र समाज मानाने जगायला देतो???


तेव्हा कुठे जाते सामाजिक नीतिमत्ता ??

Friday, January 27, 2023

काय चाललंय

 

काय चाललंय या जगात काहीच कळत नाही...

माणसाचं माणुसकीशी गणित कधीच का जुळत नाही...

आजकाल रक्ताच नातं कधीच आपलं का वाटतं नाही..

जे जवळ असतं त्याचं मोलचं कोणाला नसतं,

अवाक्याच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचं मात्र भलतच वेड पप्रत्येकाला असतं...

लांबच्या गोष्टीकडे बघताना जवळच्या गोष्टीकडे कधी लक्षच नसतं,

उद्याच्या चिंतेत आज हरवून बसतो याचं कोणाला भानच नसतं,

सगळं जवळ असूनही माणसाला समाधान मात्र कधीच नसतं...

हे सगळं असं का होतं माहित नाही...

काय चाललंय....या जगात काहीच कळत नाही..


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...