Thursday, July 31, 2025

पहिली हालचाल...पहिली भेट

"पहिली हालचाल... पहिली भेट"


गरोदरपणाचे दिवस हे प्रत्येक स्त्रीसाठी एक वेगळंच जग असतं. प्रत्येक क्षणात नवीन काहीतरी घडत असतं, आणि त्या सगळ्या अनुभवांचा एक सुंदर गोफ तयार होत जातो.
ही गोष्ट आहे अशाच एका क्षणाची — जेव्हा बाळाने पहिल्यांदा हलवून मम्मा- डॅडी ना सांगितलं, "मी इथे आहे!"





त्या दिवशी माझी पहिली सोनोग्राफी होती. मनात प्रचंड उत्सुकता होती —
माझं बाळ मला पहिल्यांदा दिसणार होतं.

त्याच्या दोन दिवस आधीच, मी काहीतरी वेगळं जाणवलं होतं...
पोटात एक नाजूकशी, लाजरीशी हालचाल झाली होती.
जणू एखाद्या फुलपाखराने अलगद स्पर्श करून पळून जावं…
ते क्षणभरच होतं, पण त्यात आयुष्याचं संपूर्ण संगीत भरलेलं होतं.

माझी एक रोजची सवय होती — एक विशिष्ट गाणं ऐकायची:
"हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे..."
हे गाणं ऐकलं की मन प्रसन्न व्हायचं, घरभर आनंद भरून यायचा.

त्या दिवशी मी नेहमीसारखी माझ्या गर्भसंस्कार अ‍ॅपवरच्या ॲक्टिव्हिटीसाठी बसले.
तेव्हा काय आश्चर्य! आजच्या प्रार्थनेत तेच गाणं होतं!
मी आनंदाने लगेच माझ्या नवऱ्याला हाक मारली,
"अहो, बघा ना, आपण रोज ऐकतो तेच गाणं आज इथे प्रार्थना म्हणून आहे!"

आम्ही दोघं गाणं गुणगुणायला लागलो. आणि तेवढ्यात...
बाळाने पुन्हा हालचाल केली!
गर्भावस्थेच्या फक्त आठव्या आठवड्यात.

मी चमकून बोलले,
"अहो, पुन्हा म्हणू या गाणं… बाळ हालचाल करतंय!"
आम्ही पुन्हा गायलो… आणि पुन्हा तशीच हालचाल झाली.
हे नुसतं गाणं नव्हतं... ते बाळाशी असलेला एक अदृश्य संवाद होता.

त्या क्षणी आमच्या आनंदाला काहीच सीमा उरली नाही.
लगेच आम्ही घरच्यांना फोन करून सांगितलं —
"आज बाळाने पहिल्यांदा हालचाल केली!"

दोन दिवसांनी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. सोनोग्राफीसाठी.
मी डॉक्टर ईशा यांना विचारलं,
"माझं बाळ दिसणार ना?"
त्या हसून म्हणाल्या,
"हो, नक्कीच."

आणि मग सोनोग्राफी स्क्रीनवर अचानक बघायला मिळालं —
छोटसं बाळ, हात हलवत होतं, जणू ‘हाय’ म्हणत होतं!

डॉक्टर म्हणाल्या,
"हे बघ, तुझं बाळ तुला हाय म्हणतंय."
त्या लहानशा हातांनी दिलेली सलामती... आणि बाळाच्या हृदयाचे स्पष्ट ऐकू येणारे ठोके...
तो क्षण जणू काळ थांबवून ठेवतो.

रूमबाहेर येताच मी नवऱ्याला सांगितलं,
"बाळाच्या छोट्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते... हात हलवत होते... आपल्याला हाय केलं!"
आणि त्या क्षणी आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले —
एकमेकांकडे बघत फक्त एवढंच म्हणालो,
"आपलं बाळ... खरंच आपल्यात आलंय."

✍🏻 वसुधा इंगळे.

Friday, July 18, 2025

तीर्थाचा पहिला प्रवास

 **तीर्थाचा पहिला प्रवास**


तीर्थाला जेव्हा पहिल्यांदा फिरण्यासाठी घराबाहेर घेऊन जायचं ठरवलं, तेव्हा “कुठे नेऊ?” हा प्रश्न आमच्या दोघांच्या मनात आला. पावसाळा सुरूच होता. फार लांब जायलाही नको, कारण ती अजून खूप लहान आहे. तिला त्रास होऊ नये, उलट तिला प्रसन्न वाटेल असं शांत, हवेशीर आणि सकारात्मक वातावरण असावं, हे आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं.

पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता. एक दिवस गेला, दुसरा गेला… शेवटी आम्ही ठरवलं – तीर्थाला बुद्धविहारात घेऊन जाऊ.


हे ठिकाण निवडण्यामागे एक खास कारण होतं – तीर्था वैशाख महिन्यात झाली होती आणि जेव्हा ती हॉस्पिटलमधून आली, तो दिवस होता बुद्धपौर्णिमेचा!


आम्ही बुद्धविहारात गेलो. तीर्थाला भंतेजींचा आशीर्वाद मिळाला. विशेष म्हणजे ती एकदाही रडली नाही – ती आमच्या बरोबर पूर्ण वेळ शांत होती, हसत होती. हे तिचं आमच्यासोबतचं पहिलं सहप्रवासिकपण आमच्यासाठी फारच खास होतं.


भंतेजी म्हणाले, “आज विहारात एक बाल उपासिका आली आहे. ती आपल्या आई- वडिलां प्रमाणेच तेजस्वी आणि हुशार आहे.”


आणि अशा प्रकारे तीर्था चा मम्मा आणि डॅडा सोबतचा पहिला गोड प्रवास खास आठवण बनून गेला.


✍🏻वसुधा इंगळे.








Monday, July 14, 2025

मधु हॉस्पीटल एक सुंदर प्रवास

 मधु हॉस्पीटल एक सुंदर प्रवास....!!





Madhu Hospital, Bhandup मधला आमचा अनुभव खरंच खूपच खास होता. हॉस्पिटल छोटं असलं तरी, इथल्या facilities आणि care दोन्ही top-class आहेत. Staff खूप experienced, calm आणि मदतीला सदैव तयार असतो. Rooms आणि washrooms neat & clean ठेवले जात होते – hygiene ला कुठेच compromise नाही.


आमची delivery case थोडी complicated होती आणि naturally आमचं anxiety खूप वाढलं होतं. पण Dr. Sachin Dalal sir आणि Dr. Shriya ma'am हे दोघंही खूप calm, confident आणि emotionally supportive होते. त्यांनी आम्हाला फक्त medically नाही, तर mentally सुद्धा खूप strength दिली. एक क्षणही आम्हाला एकटं वाटू दिलं नाही – त्यांची साथ म्हणजे आमच्यासाठी आश्वासक सावलीसारखी होती.


आमचं beautiful baby angel जेव्हा आमच्या कुशीत आलं, त्या क्षणामागे या two doctors आणि entire hospital team ची मेहनत होती. त्यांचे आम्ही खूप मनापासून आभार मानतो.


हॉस्पिटल मधील डॉक्टर पासून ते मावशी पर्यंत सगळे त्याची काम अगदी चोख करतात.


 • रिसेप्शन वरील निकिता, सौम्या, आणि आता ची सिद्धी सुद्धा सगळ्याच बोलणं वागणं अगदी sweet and politely आहे.


• सिस्टर काउंटर वरील सिस्टर सुद्धा समिधा सिस्टर, मनिषा सिस्टर, आरती सिस्टर, सुविधा सिस्टर, कृष्णा सिस्टर, प्रीती सिस्टर सगळे च खूप helpful आहेत. 


• हॉस्पिटल मधील मावशी आणि सफाई वाले दादा सुद्धा खूप hardworking आहेत. डिलिव्हरी च्या नंतर मावशी मुळे बेबी ला बांधून ठेवणं, अंघोळ घालणं, मला मदत करणं सगळ्या गोष्टी खूप सोप्या झाल्या. 


• हॉस्पीटल मधील RMO सुद्धा खूप co-operative, sensible आहेत.


• आणि माझी Favorite गीता हिने तर मला खूप हेल्प केली. गीता खूप पॉझिटिव्ह आहे. आणि तिच्या शी बोलून नेहमीच positive vibes निर्माण होतात.


Mediclaim ची प्रक्रिया सुद्धा इथे खूप smooth होती – no running around, no last-minute tension.


ज्यांना trustworthy doctors, clean environment आणि emotional support हवा आहे during such a delicate phase, त्यांनी एकदा Madhu Hospital ला नक्कीच consider करावं.


✍🏻 वसुधा इंगळे.

Sunday, July 13, 2025

डोहाळे जेवण

 आई होण्याच्या चाहुलीतील गोड आठवण –


आई होणं ही एक विलक्षण भावना आहे – नव्या जीवनाची चाहूल आणि एका स्त्रीच्या आयुष्यातील नवं पर्व. माझ्यासाठी या सुंदर प्रवासातला सर्वात खास दिवस म्हणजे माझं डोहाळे जेवण.


त्या दिवशीचा उत्साह अजूनही मनात तसाच ताजातवाना आहे. हिरवी साडी नेसलेली, हिरवा चुडा घातलेला, चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश – मी अक्षरशः तेजस्वी दिसत होते. त्या दिवसाची तयारी काही साधी नव्हती, कारण ही केवळ एक परंपरा नव्हती, तर माझ्या मातृत्वाच्या सुरुवातीची गोड साक्ष होती.


सगळ्यांना अजून आठवतंय – “झिंगाट” गाण्यावर माझा आणि नरेनचा एकदम धम्माल डान्स! लग्नातसुद्धा इतकी धमाल केली नव्हती, जितकी डोहाळे जेवणाला केली. आम्ही नुसतं नाचलो नाही, तर त्या क्षणाला जिवंत केलं. सगळे पाहुणे हसत होते, टाळ्या वाजवत होते – आणि आम्ही त्या आनंदात न्हालो होतो.


मग आला माझा खास उखाणा –

"रायगड किल्याचे पहिले नाव होते रायरी,

आहोन सोबत सुरू करते संसाराची पहिली पायरी,

आमच्या आनंदावर नाही राहिला ताबा,

सप्टेंबरमध्ये समजले मी होणार आई आणि हे होणार बाबा."


हा उखाणा घेताना माझ्या बाळाने पोटात मस्ती केली – आणि मी अर्धा उखाणा विसरले! पण त्या हास्यातच सगळं काही होतं – माझं आई होणं, नरेनचं बाबा होणं, आणि त्या छोट्याशा जीवाचं आमच्या आयुष्यात येणं.


"आता पर्यंत च्या प्रेमात यांनी पडू दिली नाही कसली कमी, काय माहित कोण येणार – थोर भीमबा की आमची रमाई!"


सगळ्यांना इतका मजेशीर वाटला हा उखाणा की टाळ्यांचा वर्षाव झाला. शेवटी हसत-हसत विचारलं – 

"नरेन राव सांगा आता काय उचलू – बर्फी की पेढा?"


त्या दिवसातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे – डान्स, उखाणे, मस्ती, आणि बाळाची चाहूल... सगळं एकत्र मिळून बनलं आहे माझ्या जीवनातलं एक सोन्यासारखं पान.


✍🏻वसुधा इंगळे.

Thursday, July 10, 2025

आमचं लहानसंच गोंडस विश्व


**तीर्था – आमचं लहानसंच गोंडस विश्व**



माझं लहान गोंडस बाळ, तीर्था… आज दोन महिन्यांची झाली. हे दोन महिने कधी गेले कळलंच नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण तिच्यासोबत नवीन काहीतरी शिकवून जाते.


आता ती हळूहळू आवाज काढायला शिकतेय. तिच्या डॅडीने एकदा मजेत विचारलं, “तीर्था, तुला काय ऑर्डर करायचंय?” ती मात्र निरागसपणे “ऍगो” असा आवाज काढून आमचं मन जिंकून गेली. पुन्हा विचारलं तर पुन्हा तोच आवाज! आम्ही म्हणालो, “बघ बघ, मँगो म्हणतेय!” अशा त्याच्या लाडक्या भाषेचं गोड रुप आम्हाला हसवून गेलं.


तीर्थाच पहिल प्रेम म्हणजे आमचं घरातला पंखा! कितीही उचलून घेतलं तरी ती रडते, पण खाली ठेवून पंख्याकडे बघायला मोकळी केली की लगेच शांत होते. कदाचित तिचं आणि पंख्याचं काहीतरी गुपित असेल!


हळूहळू तिच्या आवाजांची, तिच्या रडण्यामागची कारणं समजू लागलीत. आणि गंमत म्हणजे तिला प्रत्येक गोष्टी सांगून केलेली आवडते.

"तीर्था, मावशी आल्या आहे, तुला मालिश करून घेऊ का?"

"मी जेवण करून घेऊ का? तू रडणार नाहीस ना?"

या सगळ्या संवादात ती गोंडस चेहऱ्याने ऐकत असते – अगदी समजून घेतल्यासारखी.


गर्भधारणेदरम्यानचा एक आठवणीय प्रसंग अजूनही ताजा आहे. पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तो दिवस २६ जानेवारी. आणि तीर्था, म्हणजे तेव्हा अजून पोटात असलेली माझी छोटूशी प्राणसखी, उजवा हात आपल्या हृदयावर ठेवून निवांत झोपलेली. डॉक्टर काही केल्या हृदयाची सोनोग्राफी करू शकत नव्हते.


शेवटी तेच म्हणाले, “तुझ्या बाळाला समजावून सांग, नाहीतर आम्हाला तपासणी करणं कठीण होईल!”

मी आणि तिचे डॅडी बाहेर आलो. मी तिला गोड गोड अफर्मेशन्स दिल्या – "डॉक्टर अंटीला तुझा छानसा फोटो घ्यायचाय गं, तू थोडा हात बाजूला कर ना."

आणि खरंच, पुन्हा आत गेलो आणि काही मिनिटांत सोनोग्राफी पूर्ण झाली. डॉक्टर आश्चर्याने म्हणाले, “नक्की काय सांगितलंत तुम्ही तिला?”


मी गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यापासून तीर्थाला अशा प्रेमळ अफर्मेशन्स देत होते, आणि कदाचित म्हणूनच ती इतकी समजूतदार आहे – अगदी पोटात असतानाच.


**तिचं अस्तित्व माझं विश्व आहे. तीर्था माझ्या प्रत्येक दिवसाला अर्थ देणारी एक नाजूक, पण ठाम भावना आहे.**


✍🏻वसुधा इंगळे.



निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...