Sunday, December 28, 2025

एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत

 

एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत 🌼

काही प्रवास नकाशावर आखलेले नसतात…ते मनात घडतात, भावनांतून जन्म घेतात आणि श्रद्धेपर्यंत पोहोचतात.

लहान बाळाला घेऊन पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करण्याचा विचार आला, तेव्हा आनंदापेक्षा भीतीच जास्त होती. गर्दी, गोंगाट, नवीन चेहरे—हे सगळं तिच्या लहानशा मनाला कसं झेपेल, याचीच काळजी होती. पण कधी कधी मनातल्या शंका बाजूला ठेवून फक्त विश्वासावर पाऊल टाकायचं असतं.

हा ब्लॉग अशाच एका छोट्याशा प्रवासाची कथा आहे—

आईच्या मनातल्या श्रद्धेची, बाळाच्या निरागसतेची,आणि दादर चैत्यभूमीच्या शांततेची.





एक छोटासा प्रवास… श्रद्धेपर्यंत 🌼

आम्हाला आमच्या लहानशा मुलीला घेऊन ट्रेनने प्रवास करायचा होता. पण प्रवासापेक्षा जास्त गोंधळ मनात होता.

गर्दी बघून ती रडेल का?

ट्रेनमध्ये बसल्यावर अस्वस्थ होईल का?

प्रवास अर्धवट सोडावा लागेल का?

कारण ती अजून खूपच लहान आहे. नवीन चेहेरे, नवीन जागा दिसल्या की लगेच रडते. आजवर तिने मला एकही दिवस माहेरी थांबू दिल नाही—तो विषय वेगळा, पण तिच्या स्वभावाची ओळख देणारा नक्कीच.

माझ्या प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यातली एक आठवण मात्र कायम मनात कोरली गेली आहे. सोनोग्राफी करताना स्क्रीनवर बाळाने हाताची 👌🏻 अशी मुद्रा केली होती—अगदी तथागत गौतम बुद्धांच्या मुद्रेसारखी. तो क्षण पाहून आम्ही दोघेही काही क्षण स्तब्ध झालो होतो.

त्याच काळात माहेरी झालेल्या गर्भमंगल संस्कार विधीत, मी डोळे बंद करून हात जोडले होते. त्या वेळी मला एक विलक्षण भास झाला—जणू माझं बाळ माझ्या मांडीवर बसून शांतपणे हात जोडून 🙏🏻बसलं आहे.

या दोन प्रसंगांनी मनात एक हळुवार भावना रुजली—हे बाळ कधीतरी मला पॅगोडा किंवा दादर चैत्यभूमीपर्यंत नक्की घेऊन जाईल.

ती खूप लहान असल्यामुळे हा विचार मी नेहमी मनातच ठेवला. पण अचानक एक दिवस वाटलं—जाऊया. रडली तर तिथूनच परत येऊ. श्रद्धेला वेळेची अट नसते.

आज तीर्था साडेसात महिन्यांची आहे. ती आता स्वतः बसते, पालथी पडते, खेळताना रांगते. आणि जेव्हा एका कुशीवर विसावते, तेव्हा तिची ती मुद्रा मला नेहमी तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची आठवण करून देते.

मग ठरवलं—आज तीर्थाला दादर चैत्यभूमीला घेऊन जायचंच.

ट्रेनमध्ये ती आधी शांत होती. नंतर आजूबाजूचं सगळं कुतूहलाने पाहत होती. नवीन दृश्यं, नवीन आवाज… जणू सगळं काही ती मनापासून स्वीकारत होती.

चैत्यभूमीला पोहोचताच तीर्था गाढ झोपली.

आम्ही दोघांनी शांतपणे दर्शन घेतलं. थोडी गर्दी होती, पण मनात मात्र विलक्षण शांतता, आणि सकारात्मक ऊर्जा होती. दर्शन घेऊन बाहेर आलो, थोडा वेळ थांबलो… पण तीर्था काही उठेना. शेवटी ठरवलं—आता निघूया. एखादं पुस्तक पाहू, आवडलं तर घेऊ आणि परत जाऊ.

पण ज्या साठी आलो होतो, जिच्या साठी आलो होतो, तो क्षण अपूर्ण कसा राहील?

तीर्था जागी झाली.

मग आम्ही पुन्हा आत गेलो. तिला थोडं निवांत होऊ दिलं, खाऊ घातला. आजूबाजूच्या मुलांकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिचा मूड खुलला… आणि आमचं मनही.

दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.

आत गेल्यावर जेव्हा तिला खाली बसवलं, तेव्हा तीर्था गुडघ्यांवर येऊन स्थिर झाली—जणू तिच्या लहानशा देहबोलीतून नतमस्तक होण्याची भावना व्यक्त होत होती.

आम्ही तीन वेळा पंचांग प्रणाम करत असतानाही ती तशीच होती…

जणू तीही त्या शांततेला वंदन करत होती.

तो क्षण पाहून आम्ही दोघेही शब्दावाचून भरून आलो.

तीर्थाच्या हातून भंतेना दान दिलं.

काही आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या.

आणि मनात खोल, निर्मळ समाधान घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

काही प्रवास अंतराचे नसतात…

ते श्रद्धेचे असतात, भावनांचे असतात, आणि अंतर्मनाला स्पर्श करणारे असतात.

हा प्रवास एक लहान पावलांचा, पण फार खोलवर जाणारा. 🙏🌼


आज मागे वळून पाहिलं, तर जाणवतं—हा फक्त एक प्रवास नव्हता.

तो सकारात्मक ऊर्जेचा होता.

विश्वासाचा होता.

आणि आई–वडील आणि मुलीच्या नात्यात आणखी एक सुंदर धागा गुंफणारा होता.

तीर्थाला काही कळत नव्हतं…

पण तरीही तिच्या लहानशा हालचालींमधून, तिच्या शांततेतून, त्या जागेचा आदर व्यक्त होत होता.

आणि ते पाहताना आमचं मन नकळत नतमस्तक झालं.

कधी कधी देव, धम्म किंवा श्रद्धा मोठ्या शब्दांत नाही तर अशा छोट्या क्षणांत भेटते—

बाळाच्या झोपेत,

त्याच्या हसण्यात,

आणि आपल्या मनात उमटणाऱ्या शांततेत.

हा प्रवास आम्हाला हेच शिकवून गेला—

जेव्हा भावना खरी असते,

तेव्हा वय, वेळ किंवा परिस्थिती कधीच अडथळा ठरत नाही.


✍🏻वसुधा इंगळे.












२७ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 

"छ" अक्षरावरून सुरू होणारे शब्द 


प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द ओळखणे ही भाषा शिकण्याची एक प्रभावी आणि मनोरंजक पद्धत आहे. “छ” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना घरगुती वस्तू, ऐतिहासिक व्यक्तिरेखा, भूगोल, छायाचित्रण, आवडीनिवडी आणि संस्कृतीशी संबंधित माहिती देतात. प्रस्तुत प्रश्नसंचात छत्री, छप्पर, छाया, छावा, छत्रपती, छायाचित्र, छंद, छळ, छान, छत्रसाल अशा विविध क्षेत्रांतील शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि निरीक्षणशक्तीला चालना मिळते.


१.पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण डोक्यावर काय धरतो?

 छत्री


२.घराच्या सर्वात वरच्या भागाला (Top layer) काय म्हणतात?

 छप्पर (किंवा छत)


३.एखाद्या वस्तूची सूर्यप्रकाशामुळे जमिनीवर पडणारी काळी आकृती म्हणजे काय?

छाया (Shadow)


४.शिवाजी महाराजांच्या मुलाचे (संभाजी महाराज) टोपणनाव किंवा त्यांना प्रेमाने काय संबोधले जाते?

छावा (सिंहाचा बछाडा)


५.शिवाजी महाराज यांना राज्याभिषेकानंतर कोणती पदवी मिळाली?

छत्रपती


६.वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात जे फोटो छापलेले असतात, त्यांना काय म्हणतात?

छायाचित्र (Photograph)


७.एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी असलेली मनाची ओढ?

 छंद (Hobby)


८.एखाद्याला जाणूनबुजून त्रास देणे किंवा सतावणे याला काय म्हणतात?

छळ


९.सुंदर दिसणे ला समानार्थी शब्द काय?

छान दिसणे


१०.मस्तानी च्या वडिलांचे नाव काय?

छत्रसाल बुंदेला


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “छ” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख झाली. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित शब्द शिकल्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक व्यापक झाले. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषेचे शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.


✍🏻वसुधा इंगळे.



"छ" अक्षरावरून सुरू होणारे शब्द (२७:डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.वर्षा घेटे 

२.इंद्रजित मोरे 

३.हर्षाली चव्हाण 

४.प्रिया मोरे 

५.स्वप्नाली राऊळ 

६.स्वाती रंधे 

७.निकिता गावडे 

८.राजेश्री भोसले 

९.सविता चौगुले 

१०.संगीता शिंदे 

११.कविता पाटील 

१२.शारदा सासणे 

१३.विधी नागवेकर 

१४.स्नेहल दुर्गे 

१५.आरती सोनवणे 

१६.प्रिया महाडिक


Saturday, December 27, 2025

सावित्रीबाई फुले व स्त्री शिक्षण चळवळ

 सावित्रीबाई फुले व स्त्री शिक्षण चळवळ – प्रश्नमंजुषा (Quiz)

प्रस्तावना

आजच्या प्रश्नमंजुषेत आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्या काळात मुलींना शिकवणे हे मोठे धाडस होते, पण सावित्रीबाई फुले यांनी हे आव्हान स्वीकारून समाजात मोठा बदल घडवून आणला.

🟢 प्रश्नमंजुषा : सावित्रीबाई फुले व शिक्षण चळवळ


1️⃣ भारतातील पहिली मुलींची शाळा कधी सुरू झाली?

उत्तर: १८४८ साली


2️⃣ पहिली मुलींची शाळा कुठे सुरू झाली?

उत्तर: पुणे


3️⃣ मुलींची शाळा सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश काय होता?

उत्तर: स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे


4️⃣ सावित्रीबाई फुले दररोज शाळेत जाताना काय सोबत ठेवत असत?

उत्तर: एक अतिरिक्त साडी

👉 माहिती: लोक शेण, दगड टाकत असत म्हणून.


5️⃣ स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले?

उत्तर: सामाजिक विरोध, अपमान, बहिष्कार


6️⃣ सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण चळवळीमुळे काय बदल झाला?

उत्तर: मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली


7️⃣ सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हे तर आणखी काय होत्या?

उत्तर: समाजसुधारक


8️⃣ विधवा महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी काय कार्य केले?

उत्तर: त्यांच्यासाठी आश्रय व मदतकार्य

👉 माहिती: विधवांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी प्रयत्न केले.


9️⃣ स्त्री शिक्षणामुळे समाजात कोणता सकारात्मक बदल झाला?

उत्तर: स्त्रिया आत्मनिर्भर बनल्या


🔟 सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण चळवळीतील कार्य आजही कशासाठी प्रेरणादायी आहे?

उत्तर: समान शिक्षण हक्कांसाठी

निष्कर्ष

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. शिक्षणामुळेच समाज प्रगत होतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.


📌 ही प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.

📌 पोस्ट आवडली तर शेअर करा.

📌 तुमचं उत्तर किंवा मत comment मध्ये नक्की लिहा.


✍🏻वसुधा इंगळे.

२६ डिसेंबर २०२५ प्रश्नोत्तरे

 "क" अक्षराने सुरू होणारे शब्द


प्रस्तावना

अक्षरानिहाय शब्द ओळखणे हे विद्यार्थ्यांच्या भाषाशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. “क” अक्षराने सुरू होणारे शब्द विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील, निसर्ग, साहित्य, शैक्षणिक व शेतकरी जीवनाशी संबंधित माहिती शिकवतात. प्रस्तुत प्रश्नसंचात कविता, काजळ, कपाट, कंदील, काजवा, कुऱ्हाड, कळशी, कात्री, कापूस आणि कमळ अशा विविध शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि निरीक्षणशक्ती सुधारते.

१.ही लयबध्द वाक्यरचना करून भावना व्यक्त केली जाते?

कविता


२.डोळ्यांसाठी वापरले जाणारे सौंदर्यप्रसादन?

काजळ


३.कपडे किंवा इतर सामान ठेवण्यासाठी वापरले जाणारे?

कपाट


४.दिव्याचा एक प्रकार? पूर्वी च्या काळी खुप प्रमाणात वापरला जाणारा?

कंदील


५.रात्री उडतो पण पक्षी नाही, उजेड देतो पण दिवा नाही?

काजवा


६.शेतकरी शेतामध्ये लाकूड तोडण्यासाठी याचा वापर करतो?

कुऱ्हाड 


७.पाणी भरण्यासाठी याचा वापर केला जातो?

कळशी


८.तिला दोन डोळे असतात, आणि तिच्या डोळ्यात बोट घातलं की ती तोंड उघडते?

कात्री


९.वस्त्रनिर्मितीसाठी वापरला जाणारा नैसर्गिक तंतू कोणता?

कापूस


१०चिखलात जन्म घेणाऱ्या फुलाला काय म्हणतात?

कमळ 


निष्कर्ष

या प्रश्नसंचाद्वारे विद्यार्थ्यांना “क” अक्षराने सुरू होणाऱ्या विविध शब्दांची ओळख सहज झाली. साहित्य, सौंदर्य, घरगुती उपयोग, शेतकरी साधने, फुलं व नैसर्गिक वस्तू यांविषयीची माहिती मिळाली. अशा अक्षरनिहाय प्रश्नमंजुषा भाषा शिक्षण अधिक रंजक, उपयुक्त आणि प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि शब्दसंपत्ती वाढवतात.

✍🏻वसुधा इंगळे.



 "क" अक्षराने सुरू होणारे शब्द ( २६ डिसेंबर)

अचूक उत्तर देणारे:

१.इंद्रजित मोरे 

२.वर्षा घेटे 

३.प्रिया मोरे

४.राजेश्री भोसले 

५.सविता चौगुले 

६.कविता पाटील 

७.स्वप्नाली राऊळ 

८.निकिता गावडे 

९.प्रिया महाडिक

१०.स्वाती रंधे 

११.शारदा सासणे

११.संगीता शिंदे 

१३.विधी नागवेकर

१४. हर्षाली चव्हाण 

Thursday, December 25, 2025

सावित्रीबाई फुले यांचे जीवन

 सावित्रीबाई फुले  यांचे जीवन 

प्रश्नमंजुषा (Quiz)




प्रस्तावना

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. 

🟢 प्रश्नमंजुषा : सावित्रीबाई फुले


1️⃣ सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

उत्तर: ३ जानेवारी १८३१

👉 माहिती: हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.


2️⃣ सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावात झाला?

उत्तर: नायगाव, सातारा जिल्हा


3️⃣ सावित्रीबाई फुले यांचे पती कोण होते?

उत्तर: महात्मा ज्योतिबा फुले


4️⃣ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कोण ओळखल्या जातात?

उत्तर: सावित्रीबाई फुले


5️⃣ सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली?

उत्तर: पुणे

👉 माहिती: १८४८ साली ही शाळा सुरू झाली.


6️⃣ सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रात अग्रणी होत्या?

उत्तर: स्त्री शिक्षण आणि समाजसुधारणा


7️⃣ सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय सहन केलं?

उत्तर: लोकांकडून अपमान, दगड, शेणफेक

👉 माहिती: तरीही त्या दररोज शिकवायला जात असत.


8️⃣ सावित्रीबाई फुले या कशा प्रकारच्या लेखिका होत्या?

उत्तर: कवयित्री

👉 माहिती: त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर कविता लिहिल्या.


9️⃣ सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वाचे कार्य कोणते?

उत्तर: मुलींच्या शिक्षणाची सुरुवात, विधवांसाठी कार्य


🔟 सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले?

उत्तर: १० मार्च १८९७


✨ निष्कर्ष

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडवून आणला. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर करून शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आज महिलाना शिक्षण खऱ्या अर्थाने सावित्रीबाई मुळेच मिळत आहे.आज महिला चंद्रा वर जाऊन पोहोचल्या आहेत.

📌 ही प्रश्नमंजुषा उपयोगी वाटली तर नक्की शेअर करा.

📌 तुमच्या उत्तरांबद्दल comment करा.

📌 सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुढील प्रश्नमंजुषा वाचायला ब्लॉग follow करा.


✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...