Sunday, April 30, 2023

स्त्रीला काय हव असतं

 सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित.       

"स्त्रीला काय हव असतं?? "


एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


 प्रश्न असा होता, की ... स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजा, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."

राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली. विद्वान बराच फिरला, 

अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली, पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, "दूर जंगलात एक हडळ राहाते ती नक्की सांगू शकेल ...या प्रश्नाचं उत्तर."

विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. हडळ म्हणाली ...

 "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."

विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

तर जीव राजाच्या हातून जाणारच आहे,  म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला होकार दिला. 

लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली, "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता निर्णय घेतला आहे की ...१२ तास ... मी हडळ आणि १२ तास सुंदर परी होऊन राहीन.

आता तुम्ही मला सांगा ...दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?विद्वानांनं विचार केला ... जर ही दिवसा हडळ झाली,तर दिवस सरणार नाही, आणि रात्री झाली तर रात्र सरणार नाही . शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

"जेव्हा तुला वाटेल तेव्हा परी हो, जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो. त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, त्यामुळे मी नेहमीसाठीच परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


स्त्रीला नेहमी ....आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.जर स्त्रीला ....तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽  परी होऊन राहिल, नाहीतर हडळ.  👈🏽

◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

◆  खुशीही तुमचीच आहे  ◆सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷

आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

 कुणाच्या घरी परी आहे ?

              

Saturday, April 29, 2023

सेक्स की संभोग-भाग ३

सेक्स की संभोग - भाग ३


संभोग ही सर्वात सुंदर भावना आहे. फक्त ती न समजल्यामुळे जगात सर्वत्र वेड्यांची जत्रा आहे असंच दिसून येईल. काही साधू संन्याशी लोकं  या संभोगापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की संभोगापासून मुक्ती मिळवली की खरा परमार्थ होतो किंवा खरा संन्यासी होता येतं. पण पृथ्वीतलावरील हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपण बघितलं असेल की अशा प्रकारचे अनेक साधू संन्यासी आपल्याच आश्रमात अनेक मुली महिलांवर भक्तांवर अत्याचार करतात. कारण संभोग हे निसर्गाने बहाल केलेलं कर्म आहे याचं ज्ञान नसतं. आणि संभोग हे कर्म आहे म्हटल्यावर आपण जोपर्यंत शरीर रुपात आहोत तोपर्यंत ते कर्म लागू पडतं. पण अशा मूर्ख आणि अज्ञानी लोकांना काय बोलावं !!


हल्ली नुसत्या वासनेच्या भूकेपायी लोकं लहान लहान मुलींवर , तरुणींवर आणि महिलांवर देखील शारीरिक अत्याचार करतात. इंटरनेटच्या या युगात सर्सास सगळ्यांकडे मोबाईल आहेत. पण मोबाईल वर अश्लील व्हिडिओ, अश्लील फोटो अशा घाणेरड्या गोष्टीच जास्त बघितल्या जातात. त्याचाच हा परिणाम जास्त आहे. आताचे चित्रपट सुद्धा जवळजवळ अश्लीलच दाखवले जातात. अश्लील शिव्या देणं हा सुद्धा घाणेरडा संस्कार खूप लहान वयात अनेकांवर झालेला असतो. हल्ली जास्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी सुद्धा सोशल मीडियावर अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात. आणि शॉर्टकटच्या जमान्यात आजकाल अनेक तरुण तरुणी खूपच शॉर्ट कपडे वापरताना दिसतात. त्यामुळे अनेक लोकांची वासनामय बुद्धी झालेली आहे. खूप वेळेस असंही दिसून येईल की प्रेमाच्या नावाखाली शारीरिक सुखासाठी सगळी प्रेमाची नाटकं केली जातात. 



Friday, April 28, 2023

सेक्स की संभोग-भाग २

सेक्स की संभोग - भाग २

 या विश्वात जो जीव रूपाने जन्माला आला त्याला भूक, झोप, भीती आणि मैथुन ही चारही कर्म लागू होतात. म्हणजेच मैथुन हे प्रत्येक जीवाचं कर्म आहे. आणि हे आपलं कर्म आहे हेच खूप लोकांना माहीत नाही आणि हेच मोठ्ठं अज्ञान आहे. आणि म्हणूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. निसर्गातील माणूस सोडून इतर सर्व जीवांच्या ठिकाणी चालणारी संभोगाची प्रकिया ही निसर्गाच्या नियमानुसार ठराविक काळात आणि योग्य वेळेत होत असते. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व जीवांच्या ठिकाणी होतो तो खरा संभोग. परंतु माणसांच्या बाबतीत याच संभोगाचा आनंद घेणारे खूप कमी लोक आहेत. कारण अनेकांच्या बाबतीत सेक्स होत असतो तो म्हणजे वासनेने बरबटलेला. म्हणजेच नुसत्या शारीरिक कवायती केल्यासारखं. संभोग ही निसर्गाची सर्वांग सुंदर अशी दिव्य व्यवस्था आहे. पण आपल्याला ही व्यवस्था न समजल्यामुळे आपली अवस्था झाली आहे.


संभोग ही निर्मितीची व्यवस्था आहे. विश्वात जी जी निर्मिती झाली किंवा जे काही नवनिर्मिती होत आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संभोग. पावसाच्या पाण्याचा आणि मातीचा जेव्हा संभोग होतो तेव्हा त्यातून गवत उगवतं. झाडावरच्या फळाचा आणि निसर्गातील पोषक वातावरणाचा त्या फळाशी जेव्हा संभोग होतो तेव्हाच ते फळ परिपक्व होतं. संभोग ही निसर्गाची देणगी आहे. पण हे खूप लोकांना समजत नाही आणि त्यामुळे ते उमजायचा प्रश्नच नाही. 

Wednesday, April 26, 2023

निस्वार्थी प्रेम

निस्वार्थी प्रेम



बघ ना एकदा डोळ्यात माझ्या..

दिसतील भरलेल्या आठवणी तुझ्या..


दिसेल माझ्या नजरेत तुझेच रूप..

प्रेम आहे तुझ्यावर खूप म्हणजे खूप..


मनाच्या ओढिने तुझ्या जवळ आले..

निखळ भावनेने एकरूप झाले..


मान्य आहे थोडा हट्ट करते मी..

प्रेमाचा हा धागा घट्ट केला मी..


इतक्या दिवसाच्या ओढीने 

तुला जवळ घेतलं..

एकरूप होऊन तुझ्याशी 

जणू स्वर्ग सुखच भेटलं..


बघ पुन्हा एकदा माझं हृदय हलवुन..

बघ सार अंतरंग आतून बाहेरून झुलवून..

बघ तुला कुठे त्यात वासना दिसते का?

मग तुला कळेल, खऱ्या प्रेमाला मर्यादा असते का..


अजूनही माझं जीव तुझ्यासाठीच झुरावा..

मग का रे अबोला आणि कसला दुरावा..?


सारी नाती, सारे बंध

सगळ्या पल्याड जाऊन बघ..

होऊन धुंद-बेधुंद,

ह्या क्षणात एकदा वाहून बघ..


माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर..

आयुष्यभर ते असच राहील..

तुझं आहे का रे मझ्यावर?

की एका हट्टामुळे ते विरून जाईल?


पूर्ण झालोय आपण त्या क्षणाला

मनाने आणि तनाने ही..

याची ग्वाही दिलीय हृदयाने,

आणि शरीराच्या प्रत्येक कणानेही..


विचारातून बाहेर येऊन बघ..

पुन्हा तुझ्या मिठीत घेऊन बघ..

माझा प्रेमाचा ओलावा

तुझ्या हृदयात भिडवून बघ..


आता नाही रे शक्य..

तुझ्याशिवाय माझं जगणं

केवळ अशक्य..


काही वावग नाही केलं आपण,

आरश्यात स्वतःकडे बघून घे..

सोडून दे सगळे विचार,

ह्या क्षणात मनमुराद जागून घे..


प्रेम करणं कधीच

गुन्हा ठरत नाही..

पण खरं प्रेम पुन्हा

पुन्हा मिळत नाही..


प्रेमात आणि युद्धात

सगळं सगळं माफ असत..

शुद्ध भावनेनं एकरूप

होण्यात काहीच पाप नसत ..


✍️वसुधा इंगळे.


पूर्ण केलेली माझी पहिली कविता;

(चार वर्षा पूर्वी सहज काही ओळी लिहून ठेवून दिलेल्या चारोळ्या होत्या.  नंतर जवळ जवळ मागच्या वर्षा पर्यंत तरी ह्या चारोळ्याच होत्या. नंतर हळू हळू त्यात काही आठवणी आणि क्षणाची चारोळ्या च्या मध्यमातून भर पडत गेली. अजून 2-4 चारोळ्या लिहिल्या. त्या नंतर जसा मूड होईल किंवा काही आठवलं तर ते मनातले विचार कागदावर उमटले जाऊ लागले, आणि ह्या चारोळ्या ची कविता होत गेली, जी मी काल पूर्णत्वास नेली.)

सेक्स की संभोग-भाग१

 सेक्स की संभोग - भाग १


तुम्ही म्हणाल हा काय विषय आहे ??सोप्पं आहे!!  सेक्स म्हणजेच संभोग आणि संभोग म्हणजेच सेक्स. पण मला वाटतं सेक्स म्हणजे संभोग न्हवे. पण संभोग म्हणजेच 100% सेक्स.

खरं म्हणजे सेक्स हा विषय सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग आहे. फक्त खूप सारे लोकं उघडपणे बोलणं टाळतात किंवा बरेच लोक लाजतात सुद्धा. पण सेक्स हा जवळजवळ सगळ्यांच्या आवडीचा प्रांत. फक्त सेक्सविषयी आपल्या समजुती आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हाच मुळात चुकीचा आहे त्याचं कारण सेक्सबद्दल खूप लोकांना योग्य ज्ञान नाही. आणि जे ज्ञान आहे ते चुकीचं. म्हणून आज अनेक नात्यांमध्ये गोंधळ सुद्धा दिसून येतो.


सेक्सला मराठीत संभोग असा अर्थपूर्ण शब्द आहे. सेक्स हा शब्द उच्चारताना किंवा ऐकल्यावर तो वासनेने बरबटलेला असा वाटतो. पण संभोग हा शब्द उच्चारताना किंवा ऐकताना नैसर्गिक आनंदाचं मिलन अशी सुंदर भावना उमटते. कारण *संभोग म्हणजे समान भोग घेणं किंवा समान आनंद घेणं असा सुंदर अर्थ आहे*. पण आपल्याकडे आजही स्त्री केवळ एक भोगवस्तू , मुलांना जन्म देणारी किंवा पुरुषांच्या वीर्यपतनाचं साधन या भावनेनेचं स्त्रीकडे पाहिलं जातं. किंबहुना तसेच संस्कार लहानपणापासून तिच्यावर केले जातात.



निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...