सहज मनात आलेलं
पावसाळा चालू झाला म्हणून म्हटलं वॉटरफॉल ची सहल तर झालीच पाहिजे. मागच्या आठवड्यात नेरळ ला गेलो होतो. तिकडून माथेरान च्या वॉटरफॉल ला भेट दिली. माथेरान चा वळणावळणाचा रास्ता, तिकडून जस जसे वर जाऊ तस खूपच उंच अशा टेकडी वर आल्यासारखे वाटत होतं. उंच असल्यामुळे तिथे शुद्ध हवा होती त्यांमुळे मन अगदी प्रसन्न होत होतं. शुद्ध हवेमुळे मनातील बरेचसे नकारात्मक विचार आपोआप कमी होत होते व मन प्रफुल्लित होत होतं.
थोड्या वेळाने मी थोड्या उंच अशा दगडावर शांत बसण्या- साठी गेले आजूबाजूला देखील छोटे छोटे दगड होते. त्यांचं थोडं निरीक्षण मी करत होते. त्या उंच टेकडीवरून ज्यांवेळी माझी नजर टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या माणसांकडे गेली त्या टेकडीवरून ती सर्व माणसं खूप लहान लहान दिसत होती.
मी शांत बसून माझ्या मनात येणाच्या विचारांचं निरीक्षण करत होते, त्यांवेळी माझ्या मनात त्या टेकडीवरून निरीक्षण करतांना एक गोष्ट लक्षात आली की, आपण ज्या विश्वात आहोत ते विश्वसुद्धा अतिविशाल आहे. कितीतरी आकाशगंगा था विश्वात आहेत त्यामध्ये कितीतरी ग्रह आहेत त्यात आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर कितीतरी प्रजाती आहेत त्यात आपणही एक आहोत. मग या एवढ्या मोठ्या विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्त्व पाहिलं तर ते मुंगीपेक्षासुध्दा कितीतरी छोट आहे; परंतू आपल्याला याची जाणीवच नाहीये. आपण किती छोट्या छोट्या गोष्टींच दुःख, ओझं घेऊन जगत आहोत. आपल्याला कोणी मान-सन्मान दिला नाही तर आपल्याला दुःख होतं, राग येतो, आपला कोणी अपमान केला तर आपण तो कितीतरी दिवस लक्षात ठेवतो, मी उगाच कोणीतरी मोठा आहे हा अहंकार ठेवून जगत राहतो व दुःखी होतो, अपयश वाट्याला आलं की त्याचाही ताणतणाव येत राहतो मग अशा कितीतरी असंख्य गोष्टींच ओझं घेऊन आपण जगत आहोत.
या विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्व खरंच छोटं आहे म्हणून "मी कोणीच नाही" हा भाव ठेवून आपण काम करत राहुया...आपल्याला कोणत्याच गोष्टींच ओझं घेऊन आयुष्य जगायचं नाहीये, ते ओझं आज या क्षणाला उतरून टाकूया. मग पाहा मन हलकं होईल; कारण नको त्या अनेक गोष्टींना आपण कवटाळून बसलो आहोत, त्याचा आपल्याला त्रास होतो आपण अस्वस्थ होतो, तरीही आपण काही गोष्टी सोडायला तयार नाही. आज मात्र आपण या सर्व गोष्टी सोडून देऊन एक सुंदर आयुष्य जगूया.
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment