आयुष्याचा प्रवास...!
जन्म जरी एकदा होत असला तरी सूर्याचं उगवण रोज नवीन जन्म देत असतं. मरण येण्याआधीच इथं जीवंतपणी मरावं लागतं. जगण्यासाठी इथं दिवस दिवस झुरावं लागतं. येणारा प्रत्येक दिवस नवीन काही घेऊन येत असतो पण त्याची चाहूल सुद्धा लागत नाही की उद्या आपल्या पुढे काय येईल. जे काय वाट्याला येईल त्याला पदरात घेत समोर चालावं लागतं. कधी कधी परिस्थिती आयुष्याचे सगळे गणित बदलून जाते.
आयुष्य मोठं आव्हान असतं. हे आव्हान पेलताना माणसं ओळखता येणं खूप गरजेचं असतं.
अनेक माणसं आयुष्यात गरजेनुसार येतात आणि जातात. प्रत्येकाचा हेतू वेगळा वेगळा असतो तसेच त्यांची वेळ सुद्धा ठरलेली असते.
जेव्हा केव्हा खंबीरपणे साथ पाहिजे असते. तेव्हा मात्र बहुदा कुणी नसतं. मोजकी दोन चार माणसं सदासर्वकाळ कायम पाठीशी उभे असतात तेच खरे आपले असतात.
काही सोबत राहून नंतर खूप चांगला अनुभव मागे सोडून जातात. कधीकाळी ज्यांना जीवापाड प्रेम केलेलं असतं तेच अतीव दुःख देऊन जातात.
तेव्हा मात्र स्वतःलाच सावरावे लागते.
जेव्हा वाईट काळातून जाण्याचा प्रसंग येतो. तेव्हा खूप काही सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही.
सुख,दुःख,यश,अपयश,आनंद,भोग, आशा, निराशा, बरं, वाईट,प्रेम,विरह, यांच्यातलं थोडं थोडं निरंतर वाट्याला येतं. नियतीच्या मनात काय असते ते इथं आज पर्यंत कुणालाही उमगले नाही. ती जे झोळीत टाकेल त्याला मात्र स्वीकारावं लागतं. अडथळे समस्या यांना सामोरे जात स्वतःच वाट शोधत आपल्या पाऊलखुणा मागे सोडत चालाव लागतं. कधी कधी दुःखाचे डोंगर असे कोसळायला लागतात जणू आयुष्याचा शेवट जवळ आल्याचा भास तयार करतात.
विश्वास आणि घात हे आयुष्याचा वळणाची दिशा ठरवत असतात. जर विश्वासाची चार माणसं आयुष्यात असतील तर मनाला धीर लागतो. विश्वास दाखवला कि नवीन उमेद जन्माला येते. पाठीशी विश्वास दाखवणारे ठाम राहिले कि आयुष्याची अर्धी लढाई जिंकल्यात जमा असते.
घात हा कधीच अपेक्षित धरलेला नसतो पण तो
वेळोवेळी मोजक्या जवळच्या लोकांकडून भेट दिला जातो ज्याची आपण कधी अपेक्षा हि ठेवत नसतो.
आयुष्यात मित्र परिवार हा असा एक वेगळा गट असतो. जो आपण घरदार, नातलग, समाज इत्यादींना बाजूला ठेवून स्वतःच्या पायावर उभा केलेला असतो. त्याचे प्रतिबिंब न कळत आयुष्यावर उमटत असतं. शरीराला ज्याप्रमाणे श्वासांची गरज असते त्याचप्रमाणे आयुष्य जगतांना मित्र जवळ असावे लागतात.
दगडांच्या गर्दीत आपल्यासाठी हे परीस असतात.
या जगात चांगले मित्र मिळणं म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील शिंपल्यात मोती सापडल्या सारखं आहे. त्यामुळे त्यांना जपणं हे अतिशय महत्त्वाच असतं. दुःखात आधार आणि सुखात आनंद साजरा करण्यासाठी हे आयुष्यात असावेच लागतात नाहीतर आयुष्य निरर्थक वाटायला लागतं.
संधी आणि संकट आयुष्यात पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. कठीण काळात संघर्ष करतांना जी धडपड सुरू असते तेव्हा कधी कधी न कळत संधी ही हाताला लागते. मित्र, नातलग, परिवार, समाज म्हणून बहुरूपी भूमिका वाट्याला येते. चांगली पार पाडली तर कौतुक मिळतं ते पण थोड्या प्रमाणात जेव्हा भूमिकेत कसर राहिली कि अवमानाची खैरात केली जाते. माणसाला मन एकच असतं पण त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येकाला वाटतं त्यानं त्यांचा मनाप्रमाणे वागावं इथंच तर अनके नात्यांची समीकरण बदलली जातात.
जन्म-मृत्यू या दोन बिंदू मधील अंतर पार करण्यासाठी अख्खी हयात खर्ची घालावी लागते.
आयुष्य संघर्षात जगत असतांना शेवट मात्र कसा होईल हे गूढ रहस्य असतं.
शेवटी इतकचं म्हणावसं वाटतं
आयुष्य हे दिवसागणिक अनुभवांनी समृद्ध होत जावं.
जे वाट्याला आलं त्याला हसत स्वीकारता यावं.
काटा बनून रुतण्यापेक्षा फुलांपरी रोज नव्याने उमलता यावं...!
✍️वसुधा इंगळे
#आयुष्याचाप्रवास





